आधी ‘मी’, मग पक्ष!

    25-Nov-2026
 
 
Rohit Pawar Politics
 
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे दर काही दिवसांनी आंदोलनाचे अस्त्र उगारतात. मग मुद्दा ‘एमपीएससी’ विद्यार्थ्यांचा असो वा दुष्काळी परिस्थितीचा. पण, त्यांच्या आंदोलनांमध्ये, त्यांनी मांडलेल्या प्रश्नांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि अन्य नेत्यांची फळी अभावानेच दृष्टिपथास पडते. जसे भाजपमध्ये ‘आधी राष्ट्र, मग पक्ष आणि शेवटी मी’ असा सर्वच नेते-कार्यकर्त्यांचा एक प्राधान्यक्रम ठरलेला, तसे रोहित पवारांचे नेमके उलट - ‘आधी मी, मग पक्ष, नंतर देश’ असेच त्यांचे गणित! याचा पुनश्च प्रत्यय आला जेव्हा, हिवाळी अधिवेशनापूर्वी रोहित पवारांनी शेगाव ते नागपूर विधानभवनावर ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली.
 
ऐन अधिवेशनाच्या तोंडावर यासारख्या मोर्चाची घोषणा ही खरेतर त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अपेक्षित. पण, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जणू आपणच सरकारविरोधात लढणारे एकमेव ‘फायरब्रॅण्ड’ नेते आहोत, या आवेशात रोहित पवारांची कॉलर कायम ताठ दिसते. म्हणूनच, विदर्भातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांना त्यांनी परस्पर मोर्चाच्या तयारीला लागण्याचे आदेशही दिले. पण, चर्चा अशी आहे की, ‘पक्षाकडून आलेलेच आदेश ग्राह्य धरा,’ अशी त्यानंतर राष्ट्रवादीच्याच एका बड्या नेत्याने कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांना तंबी दिली. यावर शशिकांत शिंदे यांनी भूमिका मांडताना सांगितले की, "रोहित पवारांनी पक्षाची मंजुरी आणि चर्चा करून चिन्हावर आंदोलन केल्यास हरकत नाही. मात्र, चिन्हाशिवाय आंदोलन करण्याचा निर्णय त्यांचा वैयक्तिक आहे. यापूर्वीही, त्यांनी मुख्यमंत्र्यांबाबत किंवा अजित पवारांच्या अपघाताबाबत वैयक्तिक पातळीवर भूमिका मांडली होती. त्यांना स्वतंत्रपणे काम करण्याचे स्वातंत्र्य असून, त्यांच्यावर पक्षाचे बंधन नसावे.” यावरून रोहित पवार पक्षाची परवानगी न घेता, कुणाशीही चर्चा न करताच आंदोलनांचा सपाटा लावतात, हेच शिंदेंनी अप्रत्यक्षरीत्या मान्य केले. एवढेच नाही, तर शिंदेंनी रोहित पवारांना राज्य सरकारकडून आंदोलनाबाबत चर्चेचे निमंत्रण आल्यास त्यावर सकारात्मक भूमिका घेण्याचा सल्लाही दिला. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील मतभिन्नता आणि रोहित पवारांचा एककल्ली कारभार यानिमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.
 
पुन्हा ‘पवार वि. पवार’
 
म्हणा, रोहित पवारांनी एकहाती आंदोलने करणे, हा काही पहिल्यांदा घडलेला प्रकार नाहीच. अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणीही थेट मुख्यमंत्र्यांवर निराधार आरोपांच्या फैरी झाडल्यानंतर ते म्हणा, पक्षात एकाकी पडले होते. तेव्हाही विलीनीकरणाच्या चर्चा जोरात असताना, मुद्दामच रोहित पवारांकडून सरकारविरोधी आवाज बुलंद केला जात असल्याची चर्चा रंगली होती. यंदाही त्यांनी साधलेले ‘टायमिंग’ तसेच काहीसे. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ‘परिसीमन’ विधेयकाला बाहेरून पाठिंबा द्यायला तयार असल्याच्या वावड्या उठताच, रोहित पवारांनीही हिवाळी अधिवेशनात लगोलग ‘ट्रॅक्टर मोर्चा’चा इशारा दिला. कारण, प्रारंभीपासूनच राष्ट्रवादीने भाजपसोबत जाऊ नये, हीच रोहित पवारांची भूमिका. एवढेच नाही, तर भाजपसोबत जायचा पक्षाने निर्णय घेतला; तर आपण वेगळा मार्ग स्वीकारण्याची तयारीही रोहित पवारांनी बोलून दाखवली होतीच.
 
आणि तो संभाव्य वेगळा मार्ग म्हणजे, काँग्रेसप्रवेश! काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही काँग्रेसमध्ये आगामी काळात मोठ्या प्रमाणात भरतीचे संकेतही दिले. त्यात रोहित पवार म्हणे थेट राहुल गांधींच्याही संपर्कात असतात. त्यामुळे काँग्रेस फोडून राष्ट्रवादीची स्थापना करणार्‍या शरद पवारांना शह द्यायला भविष्यात रोहित पवारांसाठी काँग्रेसने ‘रेड कार्पेट’ अंथरले, तरी आश्चर्य वाटायला नको. रोहित पवारांसाठी काँग्रेसमधील प्रवेश सोपा असला, तरी त्यामुळे राज्यातील वर्तमान काँग्रेस नेत्यांच्या फळीला ते कितपत रुचेल, हा प्रश्न आहेच. शिवाय, आज रोहित यांच्यापुढे ‘पवार’ हे आडनाव असल्यामुळेच पक्षात त्यांना आपसूकच एक राजकीय स्वातंत्र्य आणि वजन आहे. पण, काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर गांधी घराण्याची ‘जीहुजुरी’ करण्याबरोबरच, तेथील पक्षशिस्त, ‘हायकमांड’च्या आदेशाला रोहित पवार कितपत बांधील राहू शकतील, ही म्हणा शंकाच! असो. त्यामुळे शरद पवार गट ‘रालोआ’त सहभागी झालाच, तर रोहित पवार ‘काँग्रेसवासी’ होतात की, आणखीन एक पुतण्या बंड करून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा तिसरा तुकडा पाडतो, हे भविष्यात स्पष्ट होईलच. पण, सत्ताधार्‍यांवर शरसंधान साधून स्वपक्षीयांवरील दबावतंत्राच्या रोहित पवारांच्या राजकारणामुळे पवार कुटुंबाचा कस लागणार, हे नक्की!
 
 




संबंधित मजकूर