रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक रमेशराव गायधनी यांचे २० नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांची श्रद्धांजली सभा आज, बुधवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता शंकराचार्य संकुल, गंगापूर रोड, नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेत रा. स्व. संघाचे अखिल भारतीय धर्मजागरण समन्वय संयोजक शरदराव ढोले प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यानिमित्ताने रमेशरावांशी बंधुवत नाते असणार्या गोविंद यार्दी यांनी अर्पित केलेली ही शब्दसुमनांजली...
उत्सवे व्यसने चैव दुर्भिक्ष्ये शत्रु विग्रहे|
राजद्वारे स्मशाने च यस्तिष्ठति सः बान्धवः॥
या सुभाषितात म्हटल्याप्रमाणे सर्व प्रसंगी सर्वांबरोबर असणारे, खर्या अर्थाने बांधव आणि सखा असलेले रमेशराव गायधनी आता आपल्यात नाहीत, ही अत्यंत दुःखद बाब आहे. परंतु, हे सत्य स्वीकारण्याशिवाय आपल्याला गत्यंतरही नाही.
रमेशरावांशी माझी पहिल्यांदा ओळख कधी व कशी झाली, ते आता आठवत नाही. ६०-६५ वर्षे नक्की झाली असतील. परंतु, घट्ट मैत्री जुळली, ती १९६७ साली आम्ही संघशिक्षा वर्गाला बरोबर गेलो होतो तेव्हा! तेव्हापासून बंधुवत नव्हे, तर भावाचेच प्रेम त्यांनी मला दिले. माझ्या सर्व सुख-दुःखात ते माझ्याबरोबर होते. मीसुद्धा त्यांच्या कुटुंबातीलच एक सदस्य होऊन गेलो होतो. त्यामुळे मला त्यांचे सर्व आप्तेष्ट, नातेवाईक चांगलेच माहिती आहेत.
१९६८ मध्ये द्वितीय वर्षाच्या वर्गात आम्ही एकाच गणात (गण क्र. ६) होतो. त्या गणात असलेल्या अनेकांची नावे माझ्या आजही स्मरणात आहेत. त्यावेळी ‘दंडयुद्धा’च्या तासिकेत रमेशराव व मुंबईहून आलेले श्रीकृष्ण भिडे दोघे समोरासमोर आले असता, एकमेकांच्या वाराने दोघेही जखमी झाले होते. रमेशरावांच्या नाकाला व भिडेंच्या कानाला मोठी जखम झाली होती. त्या दोघांनाही दोन-तीन दिवस शारीरिक कार्यक्रमातून सूट दिली होती. परंतु, ते संघस्थानावर पूर्णवेळ उपस्थित राहातच होते. रमेशरावांच्या नाकावर त्या घावाची खूण ही शेवटपर्यंत होती.
संघकार्याचा वारसा त्यांना आई, वडील (दत्ता गायधनी) व काका (राजाभाऊ), काकूंकडून मिळाला होता. त्यांचे वडीलही नाशिक शहराचे शारीरिक प्रमुख/कार्यवाह होते. दुर्दैवाने १९६७च्या नागपंचमीला वडिलांचे निधन झाले व काका राजाभाऊ गायधनी व काकूंनी कुटुंबाचा भार सांभाळला. परंतु, काका, काकू वा रमेशराव व त्यांच्या मातोश्री यांच्या संघकार्यात वा ‘राष्ट्र सेविका समिति’च्या कामात कधीच खंड पडला नाही. या सर्वांनी आपापल्या आयुष्याच्या अंतापर्यंत निष्ठापूर्वक संघटनेचे कार्य केलेले आपण पाहिले आहे. राजाभाऊंचे संघातील स्थान व समर्पण इतके मोठे होते की, संघाच्या सर्व अ. भा. अधिकार्यांचे त्यांच्या घरी नित्य येणे-जाणे असे. रमेशरावांच्या मुंजीसाठी स्वतः प. पू. श्रीगुरुजी आले होते. पू. गुरुजींनी राजाभाऊंना पत्र लिहून रमेशरावांच्या वडिलांच्या तब्येतीची विचारपूस करून चिंता व्यक्त केली होती. इतके त्यांचे घनिष्ठ संबंध होते. तोच वारसा रमेशरावांनी आपल्या आयुष्यात टिकवला व पुढे नेला.
रमेशराव ‘इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅटर’चा व्यवसाय करीत होते. परंतु, हे शिक्षण त्यांनी धुळ्याला मोराणकर यांच्या ‘भाग्योदय इलेक्ट्रिकल्स’मध्ये काम करून पूर्ण केले होते. त्यावेळीही संघकाम सुरूच होते. धुळे जिल्ह्यात दोन-तीन ठिकाणी विस्तारक म्हणून १५-१५ दिवस राहिले होते. ‘सुपरवायझर’च्या परीक्षेआधी पुण्यात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात काही महिने राहून परीक्षेत यश मिळविले व व्यवसाय करण्याचा निर्णय कुटुंबातील सर्वांनी मिळून घेतला. एकदा व्यवसायाला सुरुवात केल्यावर त्यातून संघासाठी वेळ काढणे अवघड होते. त्यामुळे त्यांनी व्यवसाय सुरू करण्यापूर्वी संघशिक्षा वर्गाचे तृतीय वर्षाचे शिक्षण पूर्ण केले व नंतरच व्यवसाय सुरू केला. केवळ संघनिष्ठेमुळेच ते हा निश्चय व नियोजन करू शकले.
संघकाम करत असताना सर्वप्रकारच्या परिस्थितीला व आव्हानांना ते सहजपणे सामोरे गेले व त्यावर मातही केली. संघकार्य हेच त्यांच्या जीवनाच्या केंद्रस्थानी असल्याने कोणतेही काम करीत असताना त्यातून संघकामाला काय लाभ करून देता येईल, हाच त्यांचा दृष्टिकोन असे. त्यामुळे कोणत्याही निमित्ताने त्यांच्या संपर्कात येणार्या प्रत्येकाला संघाशी जोडण्याचा त्यांचा प्रयत्न असे. त्यांच्याकडे ‘वायरिंग’ची कामे करायला येणार्या माणसांनाही त्यांनी संघाशी जोडले. त्यातील एकजण तर निवृत्तीनंतर दोन वर्षे गोव्यातील ‘मातृछाया’ या ‘विहिंप’ने अनाथ बालकांसाठी चालविलेल्या आश्रमात सहकुटुंब पूर्णवेळ व्यवस्थापक म्हणून काम करीत होता. आणीबाणीच्या काळात पोलीस खात्याशी त्यांचा संबंध आला. त्यातून त्या खात्यातील वरिष्ठ अधिकार्यांपर्यंत त्यांनी घनिष्ठ संबंध निर्माण करून पुढे त्यांना संघानुकूल बनविले, हे आपण बघितले आहे. तसेच राजकीय विरोधक व आपल्या विचाराचे पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनाही प्रत्यक्ष संघस्थानावर व गणवेशातील संचलनासारख्या कार्यक्रमात त्यांना उपस्थित केले.
‘शुद्ध सात्त्विक प्रेम अपने कार्य का आधार हैं’ या ओळीतील भावना त्यांनी प्रत्यक्षात आणली व सर्वांना संघाशी जोडण्यात ते यशस्वी झाले. आपल्या मनातील ही शुद्ध प्रेमभावना त्यांनी कधी बोलून दाखविली नाही, तरी ती त्यांच्या वर्तनातून व कृतीतून प्रकट होत असे. दुसर्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारे रमेशराव वेळप्रसंगी स्वतः शारीरिक आणि कधी आर्थिक झीज सोसून धावून जात असत. ज्याकाळात फोन क्वचितच कोणाच्या घरी असे, त्याकाळात त्यांच्या घरी फोन आल्यावर कोणीही त्यांच्याकडे जाऊन फोन करू शकत असे. केवळ संघकामासाठीच नाही, तर वैयक्तिक कामासाठीही फोन केले जात. पण, रमेशराव वा त्यांच्या कुटुंबीयांपैकी कोणीही कधीही तक्रार सोडाच; पण अशा फोन करणार्याकडे त्रासिक मुद्रेनेही कधी बघितले नाही. त्यांच्या घरात कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त दररोज कोणी ना कोणी किमान एकजण तरी जेवायला असायचाच. अगदी आणीबाणीच्या काळातही नाशिक रोड तुरुंगातील मिसाबंदींना भेटायला आलेल्यांपैकीही कोणी तरी मुक्कामाला जेवायला असे. समाजसेवेचे जणू बाळकडूच या कुटुंबातील प्रत्येकाने घेतलेले आहे.
संघकामातील निरनिराळ्या लहान-मोठ्या कार्यक्रमांच्या वेळी रमेशरावांच्या कष्टाळूपणाचे दर्शन होत असे. तळजाईच्या ऐतिहासिक शिबिरावेळी तर त्यांनी तेथे स्वयंपाकासाठी लागणारी मोठी भांडी निरनिराळ्या संस्था, मंगल कार्यालये, मंदिरे अशांकडून मिळवलीच आणि ती ट्रक-टेम्पोत स्वतः उचलून भरलेली आम्ही बघितली आहेत. नाशकात झालेल्या संघशिक्षा वर्गांच्या वेळीही असेच कष्ट त्यांनी घेतलेले आपण बघितले आहेत. आर. पी. विद्यालयाच्या मैदानात झालेल्या धर्म संसदेच्या कार्यक्रमप्रसंगी असो वा श्रीराम जन्मभूमी आंदोलन असो वा ‘एकात्मता रथयात्रा’ असो वा पू. डॉ.हेडगेवार जन्मशताब्दी कार्यक्रमाच्या वेळी झालेली सरसंघचालकांची सभा असो वा एखाद्या निवडणुकीचे काम असो, सर्व प्रसंगी रमेशरावांची धावपळ सर्वांनी पाहिली आहे.
रमेशराव स्वतः अतिशय कमी बोलणारे होते. पण, आलेल्या कोणाचेही म्हणणे ते आत्मीयतेने नीट ऐकून घेत असत. मोजया शब्दांत आवश्यक ते मार्गदर्शन-सूचना करीत असत. आलेला कितीही रागावलेला असला व काही बोलला, तरी ते रागावत नसत वा प्रतिवादही करीत नसत. मात्र, त्याचे काम त्यावेळी वा नंतर केव्हाही अडल्यास धावून जाऊन करीत असत. रमेशराव ज्यांच्या-ज्यांच्या उपयोगी पडले आहेत, अशांची संख्या कित्येक हजारांच्या घरात जाईल.
त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची व्यावहारिक जाण व समज. एखाद्या गोष्टीचे काय परिणाम होतील, हे ते अचूक जाणत असत आणि एखाद्या अधिकार्याने सांगितलेल्या गोष्टीचा, संदेशाचा, आदेशाचा नेमका अर्थ काय, याची त्यांना उत्तम समज होती. त्यामुळे त्यांच्यावर सोपविलेले काम ते अपेक्षेप्रमाणे पूर्ण करीत असत. त्यांनी हे असे का? असा प्रश्न कधीच विचारला नाही, काम करीत राहिले. त्यामुळे संघाच्या अधिकार्यांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. कोणाशी काय बोलावे, किती बोलावे, हे ते चांगले जाणत. अटलजी म्हणत असत की, ‘बोलने के लिये वाणी की जरूरत हैं, लेकीन चूप रहने के लिये वाणी और विवेक दोनों की जरूरत होती हैं!’ या दोन्ही गोष्टी रमेशरावांकडे होत्या.
त्यांची आणखी एक विशेषतः म्हणजे, दुसर्यांना मान देणे, स्वतः मागे राहणे. कोणत्याही कार्यक्रमात जरी तो सर्वस्वी त्यांनीच घडवून आणून यशस्वी केला असला, तरी ते स्वतः कधीच पुढे गेले नाहीत. स्टेजवर तर नाहीच; पण पहिल्या रांगेतही कधी बसले नाहीत. त्यांची जागा नेहमी दारात असे. अन्य संस्थांमध्येही ते दुसर्यांना पदाधिकारी बनवत असत, स्वतः होत नसत. भगवान श्रीविष्णूंचे वर्णन आहे, ‘अमानी मानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकधृत्|’ रमेशरावांना हे लागू पडते.
सार्वजनिक जीवनात त्यांना सर्वप्रकारचे अनुभव आले. कटू प्रसंगच अधिक अनुभवाला आले. पण, त्याची खंत त्यांनी ना कधी बोलून दाखवली, ना त्याविषयीची नाराजी त्यांच्या चेहर्यावर कधी दिसली. एकदा तर एका घरात त्यांना आतही येऊ दिले गेले नाही. ‘तुम्ही यायचे नाही’ हे सांगण्यात आले. परंतु, त्यांच्याविषयीही रमेशराव कधी उणेदुणे बोलले नाहीत. हा वाणीचा संयम त्यांचा होता. त्याचा त्यांच्या काम करण्यावरही काही परिणाम झाला नाही. बा. भ. बोरकरांनी कार्यकर्त्याची मानसिकता वर्णन केली आहे, ‘जाळा अथवा उटणी लावा, क्षयवृद्धी ना अमुच्या भावा’! रमेशरावांनी हे जगून दाखविले आहे.
या जीवनप्रवासात त्यांना मोलाची साथ दिली आहे, ती सुमित्रावहिनींनी! त्यांच्या सहनशक्तीला व पतिपरायणतेला तोड नाही असेच म्हणावे लागेल. रमेशराव जे म्हणतील, ते आणि तसेच त्या वागत आल्या आहेत. लग्नानंतर काही वर्षांतच रमेशरावांना हृदयविकाराचा झटका आला. तेव्हापासून आज जवळजवळ ४० वर्षे त्या रमेशरावांची सर्वप्रकारे काळजी घेऊन सेवा करीत होत्या. त्यांच्या दुःखाची आपण कल्पना करू शकत नाही.
रमेशरावांनी जसे प्रेम समाजावर केले, तसेच आपल्या कुटुंबावरही केले. कुटुंबातील बरोबरीच्या व लहानांवर निखळ प्रेम व ज्येष्ठांविषयी आत्यंतिक आदराची भावना त्यांच्या मनात होती. राजाभाऊंचा शब्द त्यांनी कधीच खाली पडू दिला नाही. त्यांच्या फर्मचे ‘श्री वैद्युत’ हे नावसुद्धा त्यांचे मोठे काका बाळासाहेब गायधनी जे संस्कृतचे प्राध्यापक होते, त्यांनी सांगितल्यावरून ठेवलेले होते. त्यांचा नातेवाईकांचा पसारा खूप मोठा आहे. पण, त्यांपैकी प्रत्येकाच्या सुख-दुःखाच्या प्रसंगी रमेशराव उभे राहात. घरातल्या नित्य-नैमित्तिक होणार्या छोट्याछोट्या कुळधर्म-कुळाचारालासुद्धा पाचपंचवीस जण जेवायला सहज असत. सर्वांना रमेशदादा हे हवेहवेसे वाटत. गायधनी गल्लीतल्या घरात दोन भाऊ, तीन बहिणी, दोन चुलत बहिणी, काका-काकू, आई, त्याशिवाय इतर आते-मामे भावंडे या सर्वांचा ते आधार होते. हल्लीच्या काळात एवढे मोठे कुटुंब सांभाळणे, एकत्र ठेवणे हे रमेशरावच करू शकतात.
प्रेमळ वाचा आणि निर्मळ व्यवहार, यामुळे त्यांना हे जमले. आणीबाणीच्या भीषण संकटानंतर अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीतून त्यांनी पुन्हा एकदा घर सावरले. राजाभाऊ व काकूंची, तसेच आपल्या आईचीही मनःपूर्वक सेवा केली. बहिणींचे विवाह पार पाडले. हे सर्व करत असताना संघकार्यातही ते जबाबदारी घेऊन काम करीत होतेच.
आणीबाणीनंतर संघकार्याचा विविध संस्थांच्या माध्यमातून जो विस्तार नाशिक शहरात झाला, त्या सर्व संस्था ‘जनकल्याण रक्तपेढी’, ‘सक्षम’, ‘रा. शीख संगत’, ‘पूर्व सैनिक परिषद’, ‘विहिंप’, ‘श्रीगुरुजी रुग्णालय’ अशा सर्वच संस्थांच्या उभारणीत व जडणघडणीत रमेशरावांचा मोठा वाटा होता. भाजपचे तर ते मुख्य मार्गदर्शकच होते. त्यांचा उल्लेख केल्याशिवाय नाशिकचा संघाचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही, असे त्यांचे स्थान आहे.
बंधू सुरेश, भावजय सुखदा, मुलगा शौनक व स्नुषा सायली, पुतण्या कुंतक या सर्वांनी रमेशरावांच्या आजारपणात न कंटाळता उत्तम सेवा केली आहे. त्यामुळे रमेशरावांचे शुभाशीर्वाद या सर्वांना लाभणार आहेत. हे सर्वजण संघाच्या व सार्वजनिक कामात आहेतच. पुतण्या पावक हा तर चार-पाच वर्षांपासून प्रचारक म्हणून संघाचे पूर्णवेळ काम करीत आहे. मुलगी शर्वरी व जावई अमित हेसुद्धा संघकार्यात सक्रिय आहेत. त्यांचे व्याही हरहरे तर प्रांतस्तरावर काम करीत आहेत.
एका श्रद्धावान, निष्ठावान, समर्पित, व्यवहारकुशल, धोरणी, निर्भय, प्रामाणिक, कार्यक्षम, कार्यकर्त्याला आपण मुकलो आहोत. त्यांच्या निधनामुळे नाशिकच्या आधुनिक सार्वजनिक जीवनातील चारित्र्याचा आदर्श लोप पावला आहे. निःस्वार्थ बुद्धीने सर्वांच्या मदतीला धावून जाणारा बंधू, सर्वांचा सखा आपण गमावला आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाच्या मनात त्यांच्याविषयी ‘त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव...’ हीच भावना आहे. प्रत्येकाला आपल्या घरातील पितृतुल्य आधारस्तंभ नाहीसा झाल्याचे दुःख होत आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देणार आहेच. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन आणि आदरांजली!
परमेश्वर त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख पेलण्याची शक्ती देवो, ही प्रभुचरणी प्रार्थना!
-गोविंद यार्दी
९७६३७२५७२९