वय वाढल्यानंतर रात्री दोन ते तीन वेळा लघवीसाठी जाग येणे, ही बाब अनेक ज्येष्ठ भारतीय पुरुष सामान्य वृद्धत्वाचा भाग समजून स्वीकारतात. लघवीची धार कमकुवत होणे, लघवी सुरू होण्यास त्रास होणे किंवा वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होणे, या लक्षणांकडे अनेकदा वयानुसार होणारे सामान्य बदल म्हणून पाहिले जाते. प्रोस्टेट ग्रंथीच्या सौम्य वाढीमुळे (Benign Prostatic Hyperplasia – BPH) ही लक्षणे सामान्यतः दिसून येतात. मात्र, त्याकडे नेहमीच दुर्लक्ष करणे योग्य नाही. काही प्रकरणांमध्ये ही लक्षणे प्रोस्टेट कर्करोगाच्या तपासणीची गरज असल्याचे संकेत देऊ शकतात.
प्रोस्टेट ही एक लहान ग्रंथी असून ती मूत्राशयाच्या खाली आणि मूत्रमार्गाच्या सुरुवातीच्या भागाभोवती असते. मूत्रमार्गातून लघवी शरीराबाहेर पडते. पुरुषांचे वय वाढत असताना प्रोस्टेट ग्रंथीचा आकार अनेकदा वाढतो. या स्थितीला प्रोस्टेट ग्रंथीची सौम्य वाढ (BPH) असे म्हणतात. या वाढलेल्या ग्रंथीमुळे मूत्रमार्गावर दाब येतो आणि वारंवार लघवीला जाणे, लघवीची धार कमकुवत होणे, मूत्राशय पूर्णपणे रिकामे न झाल्याची भावना निर्माण होणे तसेच रात्री वारंवार लघवीसाठी जाग येणे अशी लक्षणे दिसू शकतात.
मात्र, प्रोस्टेट कर्करोगामुळेही लघवीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, विशेषतः आजाराची अवस्था प्रगत झाल्यास. महत्त्वाचे म्हणजे, सुरुवातीच्या टप्प्यात प्रोस्टेट कर्करोगाची कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसतीलच असे नाही. त्यामुळे केवळ लघवीशी संबंधित तक्रारींच्या आधारे या आजाराचे निदान करणे दिशाभूल करणारे ठरू शकते.
भारतीय पुरुषांनी याकडे गांभीर्याने का पाहावे?
भारताच्या वाढत्या ज्येष्ठ पुरुष लोकसंख्येमध्ये प्रोस्टेट कर्करोग ही सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वाची समस्या बनत आहे. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरच्या (IARC) GLOBOCAN 2022 च्या अंदाजानुसार, भारतात प्रोस्टेट कर्करोगाचे सुमारे ५८,५५५ नवीन रुग्ण आढळले. भारतीय पुरुषांमध्ये निदान होणाऱ्या कर्करोगांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचा दुसरा क्रमांक लागतो.
नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्रामच्या विश्लेषणानुसार, नोंदणी झालेल्या प्रोस्टेट कर्करोगाच्या सुमारे ४३ टक्के रुग्णांचे निदान आजार शरीराच्या इतर भागांमध्ये पसरल्यानंतर म्हणजेच प्रगत मेटास्टॅटिक अवस्थेत झाले. यावरून या आजाराचे लवकर निदान होण्यासाठी वेळेवर वैद्यकीय तपासणी करणे किती आवश्यक आहे, हे स्पष्ट होते.
कोणती लक्षणे दुर्लक्षित करू नयेत?
रात्री वारंवार लघवीला जाणे, लघवी सुरू होण्यास अडचण येणे, लघवीची धार कमकुवत होणे किंवा मध्येच थांबणे, लघवीतून रक्त जाणे आणि लघवी केल्यानंतरही मूत्राशय पूर्णपणे रिकामे न झाल्याची भावना निर्माण होणे, या लक्षणांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
तसेच पाठ, कंबर, नितंब किंवा ओटीपोटाच्या भागात सतत वेदना होणे, कोणतेही स्पष्ट कारण नसताना वजन कमी होणे आणि हाडांमध्ये वेदना होणे ही लक्षणे आजाराच्या प्रगत अवस्थेत दिसू शकतात.
मात्र, ही लक्षणे केवळ कर्करोगामुळेच उद्भवतात असे नाही. मूत्रमार्गातील संसर्ग, मधुमेह आणि प्रोस्टेट ग्रंथीची सौम्य वाढ यांमुळेही अशीच लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे नेमके कारण समजून घेण्यासाठी योग्य वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे.
कोणत्या पुरुषांना प्रोस्टेट कर्करोगाचा धोका अधिक असतो?
वाढते वय हा प्रोस्टेट कर्करोगाचा सर्वात महत्त्वाचा जोखीम घटक आहे. विशेषतः वयाच्या 50 वर्षांनंतर या आजाराचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.
ज्या पुरुषांच्या वडिलांना किंवा भावाला प्रोस्टेट कर्करोग झाला आहे, विशेषतः कमी वयात या आजाराचे निदान झाले आहे, अशा पुरुषांना प्रोस्टेट कर्करोगाचा धोका अधिक असू शकतो. याशिवाय BRCA1 आणि BRCA2 यांसारख्या काही आनुवंशिक जनुकीय बदलांमुळेही या कर्करोगाची शक्यता वाढू शकते.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
प्रोस्टेट कर्करोगाची शक्यता तपासण्यासाठी डॉक्टर काही वैद्यकीय चाचण्यांचा सल्ला देऊ शकतात. यामध्ये PSA (Prostate-Specific Antigen) ही रक्त तपासणी, डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन (DRE) आणि आवश्यकतेनुसार मल्टिपॅरामेट्रिक MRI (Multiparametric MRI) तसेच प्रोस्टेट बायोप्सी यांचा समावेश असू शकतो.
PSA चाचणीमध्ये त्याचे प्रमाण वाढलेले आढळल्यास प्रत्येक वेळी कर्करोगच आहे असे नाही. प्रोस्टेट ग्रंथीची सौम्य वाढ किंवा संसर्गामुळेही PSA चे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे PSA चाचणीचा अहवाल वाढलेला असणे म्हणजे कर्करोगाचे निदान झाले, असा त्याचा अर्थ होत नाही.
PSA तपासणीबाबत प्रत्येक पुरुषासाठी एकच पद्धत योग्य ठरते असे नाही. त्यामुळे या तपासणीचे संभाव्य फायदे, मर्यादा आणि स्वतःच्या आरोग्याशी संबंधित जोखीम लक्षात घेऊन डॉक्टरांशी चर्चा करणे आवश्यक आहे.
वेळेवर तपासणी करणे महत्त्वाचे!
वारंवार लघवीला जाणे ही समस्या वाढत्या वयामुळे किंवा प्रोस्टेट ग्रंथीशी संबंधित समस्येमुळे असू शकते. मात्र, ती केवळ वयाचा परिणाम आहे असे समजून दुर्लक्ष करू नये. वेळेवर वैद्यकीय तपासणी केल्यास प्रोस्टेटची सौम्य वाढ आणि गंभीर आजार यांमधील फरक ओळखता येतो.
प्रोस्टेट कर्करोगाच्या बाबतीत आजाराची लक्षणे गंभीर होण्याची वाट पाहण्यापेक्षा त्याचा धोका ओळखणे आणि योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. वेळेवर निदान आणि योग्य उपचारांमुळे रुग्णांच्या आरोग्यामध्ये महत्त्वपूर्ण फरक पडू शकतो.
- डॉ. मंगेश मेखा
कर्करोगतज्ज्ञ (Cancer Physician), एमओसी कॅन्सर केअर (M|O|C Cancer Care)