‘स्क्रीन टाईम’कडून ‘रीडिंग टाईम’कडे नेणारा पुस्तक महोत्सव : मिलिंद मराठे

    25-Nov-2026   
 
 
Mumbai Book Festival 2026
 
"आज आपल्याला ‘स्क्रीन टाईम’कडून ‘रीडिंग टाईम’कडे जाण्याची आवश्यकता आहे आणि या बदलासाठी पुस्तक महोत्सव हे एक प्रभावी माध्यम ठरू शकते,” असा विश्वास ‘राष्ट्रीय पुस्तक न्यासा’चे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केला. दि. २४ नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या ‘मुंबई पुस्तक महोत्सवा’च्या निमित्ताने, वाचन संस्कृतीचे महत्त्व, समृद्ध ‘नॅरेटिव्ह’ उभे करण्यात पुस्तक महोत्सवांची भूमिका यांसारख्या विषयांवर प्रा. मिलिंद मराठे यांच्याशी साधलेला हा खास संवाद...
 
कालपासून मुंबईत सुरु झालेल्या पुस्तक महोत्सवात वाचकांना काय नवीन किंवा वेगळे पाहायला मिळणार आहे?
 
मुंबईत आयोजित करण्यात आलेला हा पुस्तक महोत्सव म्हणजे, केवळ पुस्तकांचे प्रदर्शन नसून कला, साहित्य, संस्कृती आणि वाचनप्रेमींचा एक अनोखा सोहळा आहे. देशभरातून सुमारे ४०० प्रकाशक या महोत्सवात सहभागी झाले असून, त्यांचे ६००हून अधिक स्टॉल्स वाचकांसाठी उपलब्ध आहेत. या एकाच छताखाली सहा लाखांहून अधिक पुस्तके वाचकांना पाहता येणार असून, विविध विषयांवरील साहित्याचा खजिनाच त्यांच्यासाठी खुला झाला आहे. येथे केवळ पुस्तके पाहण्याची आणि खरेदी करण्याची संधी नाही; तर पुस्तकांच्या लेखकांना प्रत्यक्ष भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या लेखनप्रवासाविषयी जाणून घेण्याची संधीही मिळणार आहे. मराठी आणि हिंदी भाषेतील नामवंत लेखक, वृत्तपत्रांचे संपादक, तसेच साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांशी विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी विशेष ‘चिल्ड्रन्स कॉर्नर’ देखील उभारण्यात आला आहे. त्याचबरोबर संपूर्ण कुटुंबाला एकत्रितपणे आनंद घेता यावा, यासाठी संध्याकाळच्या वेळेत मनोरंजनात्मक कार्यक्रमांचीही मेजवानी असणार आहे. साहित्य आणि वाचनासोबतच खाद्यसंस्कृतीचाही आस्वाद येथे घेता येणार आहे. एकंदरीत, पुस्तकप्रेमी, लेखक, साहित्यिक, विद्यार्थी, लहान मुले आणि संपूर्ण कुटुंबासाठी हा महोत्सव एक पर्वणी ठरणार आहे.
 
या महोत्सवाचे नियोजन करताना तुमच्यासमोर कोणती मोठी आव्हाने होती आणि ती तुम्ही कशी पार पाडलीत?
 
‘मुंबई पुस्तक महोत्सवा’चे आयोजन करताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार होता. प्रामुख्याने व्यवस्थापन, भाषेची विविधता आणि प्रवासाची सुविधा ही मोठी आव्हाने होती. विशेषतः कलिना कॅम्पसपर्यंत जास्तीत जास्त वाचक आणि पुस्तकप्रेमी कसे पोहोचतील, हा महत्त्वाचा प्रश्न होता. सर्वसामान्य नागरिकांपासून ते साहित्यप्रेमींपर्यंत प्रत्येक घटकाने या महोत्सवाला भेट द्यावी, हे आमच्यासमोरील प्रमुख आव्हान होते. मात्र, हे आव्हान पेलण्यासाठी मुंबई विद्यापीठाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि प्रचंड मेहनतीने प्रयत्न केले. महोत्सवाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात आली. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून जाहिराती करण्यात आल्या. तसेच ‘बेस्ट’च्या बसेस आणि बसस्थानकांवरील जाहिरातींच्या माध्यमातूनही महोत्सवाची माहिती मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्यात आली. आव्हाने अनेक होती. मात्र, मुंबई विद्यापीठ, विविध यंत्रणा, प्रसिद्धिमाध्यमे आणि संपूर्ण आयोजन टीम यांच्या एकत्रित सहभागामुळे ही आव्हाने पेलणे अधिक सुलभ झाले.
 
सध्याच्या डिजिटल युगात, जिथे सोशल मीडिया आणि ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्म्सचा मोठा प्रभाव आहे, तिथे प्रत्यक्ष पुस्तकांकडे वाचकांना वळवण्यासाठी हा महोत्सव कशा प्रकारे मदत करेल?
 
आजच्या काळात आपण सर्वजण ‘स्क्रीन टाईम’च्या वाढत्या प्रभावामुळे अनेक समस्यांना सामोरे जात आहोत. त्यामुळे आता केवळ ‘स्क्रीन टाईम’ वाढवण्याऐवजी तो कमी करून ‘अ‍ॅक्टिव्हिटी टाईम’ आणि विशेषतः ‘रीडिंग टाईम’ वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये शाळांमधील मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ मर्यादित करण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली जात आहेत. वाचन ही व्यक्तीच्या विचारविश्वाला समृद्ध करणारी, एकाग्रता वाढवणारी आणि मूलभूत विचारक्षमता विकसित करणारी सवय आहे. डिजिटल माध्यमांतून माहिती मिळू शकते. मात्र, पुस्तक वाचनातून मिळणारा सखोल अनुभव, चिंतनाची प्रक्रिया आणि कल्पनाशक्तीला मिळणारी चालना याला वेगळे महत्त्व आहे. म्हणूनच, आज आपल्याला ‘स्क्रीन टाईम’कडून ‘रीडिंग टाईम’कडे जाण्याची आवश्यकता आहे. या बदलासाठी पुस्तक महोत्सव हे एक प्रभावी माध्यम ठरू शकते. माझा ठाम विश्वास आहे की, आजच्या काळात आवश्यक असलेला ‘डिजिटल डिक्टॉस’ घडवून आणण्यासाठी आणि समाजामध्ये वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी ‘मुंबई पुस्तक महोत्सव’ निश्चितच महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
 
पारंपरिक साहित्य संमेलने आणि डिजिटल जगातील ‘जेन-झी’ वाचकांची नाळ या महोत्सवातून कशी जोडली जाईल?
 
आजची ‘जेन-झी’ पिढी ही डिजिटल माध्यमांशी अधिक जोडलेली आहे. त्यामुळे त्यांच्या वाचनाच्या आवडीनिवडी आणि वाचनाच्या पद्धती लक्षात घेऊन त्यांच्यापर्यंत पुस्तके पोहोचवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने ‘नॅशनल बुक ट्रस्ट’ने ‘राष्ट्रीय ई-पुस्तकालय’ नावाचे डिजिटल अ‍ॅप विकसित केले आहे. हे अ‍ॅप पूर्णपणे मोफत उपलब्ध असून, त्यामध्ये साडेसात हजारांहून अधिक पुस्तके ‘ई-बुक’ आणि ‘ऑडिओ बुक’ अशा दोन्ही स्वरूपांत वाचकांसाठी उपलब्ध आहेत.
 
आजच्या काळात डिजिटल आणि छापील माध्यमांकडे एकमेकांचे पर्याय म्हणून नव्हे, तर वाचनसंस्कृती समृद्ध करणारी पूरक माध्यमे म्हणून पाहण्याची गरज आहे. त्यामुळेच आम्ही वाचकांना त्यांच्या आवडीनुसार आणि सोयीनुसार दोन्ही प्रकारचे साहित्य उपलब्ध करून देत आहोत. तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग करून नव्या पिढीला वाचनाकडे आकर्षित करणे आणि त्याच वेळी छापील पुस्तकांचे महत्त्व टिकवून ठेवणे, हाच आमचा प्रयत्न आहे.
 
साहित्याच्या माध्यमातून समाजाचे सकारात्मक आणि वास्तववादी ‘नॅरेटिव्ह’ उभे करण्यात अशा पुस्तक महोत्सवांची भूमिका काय असते?
 
समाजामध्ये सकारात्मक, वास्तववादी आणि वैचारिकदृष्ट्या समृद्ध ‘नॅरेटिव्ह’ उभे करण्यात पुस्तक महोत्सवांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने लेखक, विचारवंत, कवी, अभिनेते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यांच्या अनुभवांतून, विचारांतून आणि मार्गदर्शनातून समाजातील विविध विषयांवर नवा विमर्श उभा राहण्यास मदत होईल. वेगवेगळ्या दृष्टिकोनांची ओळख होईल, विचारांची देवाणघेवाण होईल आणि अनेक सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय प्रश्नांकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळेल. पुस्तक वाचनामुळे माणसाच्या विचारांना दिशा मिळते, त्याच्या जीवनाला कलाटणी मिळू शकते आणि त्याच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल घडू शकतो. पुस्तक माणसाला केवळ स्वतःपुरते विचार करायला शिकवत नाही; तर समाजाचे भान, संवेदनशीलता आणि जबाबदारीची जाणीवही करून देते. अनेकदा एखादे पुस्तक माणसाच्या आयुष्यातील विचारप्रवाह बदलण्याचे निमित्त ठरते आणि त्यातूनच सामाजिक परिवर्तनाची सुरुवात होते.
 
सोशल मीडियावर अर्धवट माहितीच्या आधारे जे ‘नॅरेटिव्ह’ तयार केले जातात, त्याला छेद देऊन सखोल अभ्यास आणि चिंतनाची सवय लावण्यासाठी ‘पुस्तक’ हेच आजही सर्वांत प्रभावी माध्यम आहे, असे तुम्हाला वाटते का?
 
नक्कीच! कारण, पुस्तक वाचनातून एखाद्या विषयाचे अनेक पैलू समजून घेण्याची संधी मिळते. एकाच विषयाकडे वेगवेगळे लेखक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात आणि त्यांची मांडणीही वेगवेगळी असते. त्यामुळे वाचकाला केवळ एकाच विचारप्रवाहात अडकून न पडता विविध विचार समजून घेता येतात. पुस्तक वाचन माणसाला सहिष्णू, संवेदनशील आणि विवेकशील बनवते. दुसर्‍याचे मत समजून घेण्याची, त्याचा आदर करण्याची आणि कोणत्याही विषयावर विचारपूर्वक भूमिका घेण्याची क्षमता विकसित करते. त्यामुळे व्यक्ती एकांगी, एकाधिकारशाहीच्या मानसिकतेची किंवा हिंसक प्रवृत्तीची होण्याऐवजी संवाद आणि विचारांच्या देवाणघेवाणीवर विश्वास ठेवणारी बनते. वाचनाचा प्रभाव हा केवळ व्यक्तीच्या वैयक्तिक जडणघडणीपुरता मर्यादित राहत नाही, तर त्यातून समाजाचाही वैचारिक स्तर उंचावतो. ज्या समाजात वाचनसंस्कृती रुजलेली असते, तिथे विवेक, सामाजिक संवेदनशीलता आणि जबाबदारीची जाणीव अधिक दृढ होण्यास मदत होते. त्यामुळे वाचनसंस्कृतीचा विस्तार हा अधिक सुसंस्कृत आणि शांततापूर्ण समाजनिर्मितीशी जोडलेला आहे. समाजाचा वैचारिक विमर्श अधिक सकारात्मक, समतोल आणि सर्वसमावेशक करण्यासाठी वाचनसंस्कृती निश्चितच व्यापक प्रमाणात वाढली पाहिजे.
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर