राष्ट्रभक्ती जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्वाभाविकपणे रुजली पाहिजे : मोहनलाल

    25-Nov-2026   
 

Mohanlal Patriotism Statement 
 
मुंबई (Mohanlal Patriotism Statement) : देशभक्ती आणि राष्ट्रीय चेतना या केवळ घोषणा नसून त्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होणाऱ्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय चेतना स्वाभाविकपणे व सुसंवादी पद्धतीने रुजली पाहिजे, असे प्रतिपादन अभिनेते मोहनलाल यांनी केले. चेरुपूरम येथील केसरी भवनमध्ये मातंगी डिजिटल स्टुडिओचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
 
उपस्थितांना संबोधित करताना मोहनलाल म्हणाले, चित्रपट हे माझे कार्यक्षेत्र आहे. देशभक्ती आणि राष्ट्रीय चेतना या विषयांवर आधारित अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान लष्करी छावण्या आणि सीमावर्ती भागांना भेट देण्याची संधी मिळाली. या भेटींमधून केवळ वाचनातून परिचित असलेल्या भारतापलीकडील एका वेगळ्या भारताचे दर्शन घडले. देशाच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या जवानांच्या सोबत उभे राहिल्यानंतर राष्ट्रीय चेतना आणि देशभक्ती माझ्या हृदयाचे ठोके बनल्याची अनुभूती आली. (Mohanlal Patriotism Statement)
 
आपण सुरक्षित वातावरणात घालवलेल्या प्रत्येक क्षणी सीमेवर रात्रंदिवस जागता पहारा देणाऱ्या जवानांची आठवण मला येते. सध्या मी अभिनय करत असलेला ‘ऑपरेशन गंगा’ हा चित्रपटदेखील भारताचे गौरवगान करणारा आहे. मला थोडीफार अवगत असलेली एकमेव कला म्हणजे अभिनय. त्यामुळे जेव्हा जेव्हा संधी मिळते, तेव्हा या कलेच्या माध्यमातून मी माझ्या राष्ट्रावर प्रेम व्यक्त करतो, असेही त्यांनी सांगितले. (Mohanlal Patriotism Statement)
 
आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या मातंगी स्टुडिओसमोर भविष्यात अनेक शक्यतांचे विस्तीर्ण क्षितिज खुले झाले आहे. माझ्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात होऊन अर्धशतक लोटले आहे. या काळात चित्रपटसृष्टीत प्रचंड बदल झाले आहेत. प्रेक्षकांची मने जिंकून प्रचंड यश मिळवलेला ‘रामायण’ हा चित्रपट या परिवर्तनाचे उत्तम उदाहरण आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा उपयोग करून महाकाव्ये, पुराणे आणि पौराणिक कथांचे किती सुंदर चित्रण करता येऊ शकते, हे ‘रामायण’ने दाखवून दिले आहे, असे त्यांनी नमूद केले. (Mohanlal Patriotism Statement)
 
केसरी म्हणजे अक्षरवैभवाचे प्रतीक असून स्वाभिमान आणि देशभक्ती यांचा समानार्थी शब्द आहे. भारताच्या महान संस्कृतीचे संस्कार केसरीने अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचवले आहेत. प्रत्येक नागरिकामध्ये राष्ट्रीय चेतना जागृत करण्यासाठी केसरीसारख्या माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे मोहनलाल यांनी सांगितले. (Mohanlal Patriotism Statement)
 
साडेसात दशकांपूर्वी नागपूरहून अभियांत्रिकीची पदवी घेऊन कोझिकोडच्या भूमीत आलेल्या शंकर शास्त्री यांनी केसरीच्या जन्मासाठी प्रेरक भूमिका बजावली. देशभक्ती आणि राष्ट्रीय चेतनेच्या पायावर उभे असलेले पत्रकारितेचे कार्य आणि सामाजिक हस्तक्षेप ही या उपक्रमाला सुरुवात करणाऱ्या दूरदृष्टी असलेल्या संघ कार्यकर्त्यांची ध्येये आणि स्वप्ने होती. त्या माध्यमातून संघ आपले सांस्कृतिक कर्तव्य पार पाडत होता. राष्ट्र टिकले तरच ही संस्कृती टिकून राहील, हा सत्यसंदेश केसरीने आपल्या प्रत्येक उपक्रमातून समाजाला दिला आहे, असे मोहनलाल म्हणाले. (Mohanlal Patriotism Statement)
 
केसरीच्या विकासात आणि सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे पी. परमेश्वरनजी तसेच बालगोकुलमला आपल्या कार्यातून चैतन्य देणारे एम.ए. सर यांचेही मोहनलाल यांनी स्मरण केले. परमेश्वरनजी यांनी केसरीच्या पानांमधून स्वामी विवेकानंद आणि श्री अरविंद यांच्या विचारांचे दीप मल्याळी समाजाच्या मनामनांत अखंड तेवत ठेवले, तर एम.ए. सर यांनी केसरीच्या माध्यमातूनच सर्वांत मोठ्या बालचळवळींपैकी एक असलेल्या बालगोकुलमला मूर्त स्वरूप दिले, असे त्यांनी सांगितले. (Mohanlal Patriotism Statement)
 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदुस्थान प्रकाशन ट्रस्टचे विश्वस्त व्यवस्थापकीय विश्वस्त एम.सी. शाजी कुमार होते. प्रज्ञा प्रवाहचे राष्ट्रीय संयोजक जे. नंदकुमार यांनी प्रमुख भाषण केले, तर केसरी साप्ताहिकाचे मुख्य संपादक डॉ. एन.आर. मधू यांनी प्रास्ताविक केले. एनटीपीसीचे सहाय्यक व्यवस्थापक (मानव संसाधन) के.आर. अनिलकुमार यांनी शुभेच्छा दिल्या. (Mohanlal Patriotism Statement)
 
मातंगी ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त टी.व्ही. वेणुगोपाल यांनी केसरीतर्फे सन्मानचिन्ह तसेच केसरी प्रकाशनाने प्रकाशित केलेली ‘देशीय स्वातंत्र्य मुन्नेट्टंगल केरळत्तिल’ आणि ‘संघशताब्दीचे अक्षरठसे’ ही नवीन पुस्तके मोहनलाल यांना भेट दिली. यावेळी शिल्पकार सुनील तेंजीपालम यांनी रेखाटलेले देवी मातंगी यांचे चित्रही मोहनलाल यांना भेट देण्यात आले. हिंदुस्थान प्रकाशन ट्रस्टचे विश्वस्त सी.एम. रामचंद्रन यांनी स्वागतपर भाषण केले. (Mohanlal Patriotism Statement)
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर