देश आणि समाजासाठी अतुलनीय विचार कार्य करणारे, रा. स्व. संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या राष्ट्रसमाजहिताच्या प्रेरणादायी विचारांनुसार आत्मनिर्भर गाव आणि समाज, तसेच नागरिक घडवण्याच्या उद्देशाने ‘केशवसृष्टी’ अखंडितपणे कार्यरत आहे. ‘केशवसृष्टी’अंतर्गत ‘ग्रामविकास योजना’ विमल केडिया यांनी सुरू केली. पुढे २०२१ सालापासून ‘केशवसृष्टी’अंतर्गत ‘ग्रामस्वास्थ्य सुरक्षा योजना’ अस्तित्वात आली. आजच्या लेखात ‘केशवसृष्टी ग्रामस्वास्थ्य सुरक्षा योजने’च्या कार्याची संक्षिप्त स्वरूपात मांडणी केली आहे.
डॉक्टर म्हणत होते की, "अजून उशीर झाला असता, तर लेक हाताला लागली नसती. ‘केशवसृष्टी’च्या स्वास्थ्यरक्षकांमुळे माझी पोर घरी परत आली.” मुलीचा बाप डोळ्यांत पाणी आणून म्हणाला. कोण आहेत हे स्वास्थ्यरक्षक, हे समजण्यासाठी सविस्तर घटना पाहू.
वाडा तालुक्यातील पिंपळास गावच्या कातकरी पाड्यातली घटना. या पाड्यातली १३-१४ वर्षांची मुलगी थरथर कापत होती. तिचे डोळे वरच्या दिशेला गेले होते. श्वास घुसमटून घरघर आवाज येत होता. सगळा पाडा काळजीत. लगेच भगताला बोलावण्यात आलं. भगताने तिच्यावर कुणी करणी केली की भूतबाधा झाली, याचा शोध घेतला. मात्र, तिच्यात जराही फरक पडला नाही. कुणीतरी सांगितलं, "स्वास्थ्यरक्षक जोडपं आहे; त्यांना तरी बोलवा.” हे जोडपं जेव्हा आरोग्याबाबत सर्वेक्षण करायला गेलं, तेव्हा अनेकांनी दारं बंद केली होती. पण, आता मुलीच्या जिवासाठी स्वास्थ्यरक्षक दाम्पत्य सचिन आणि साची पाटील यांना बोलावण्यात आले. दोघेजण आले. त्यांनी मुलीचा रक्तदाब तपासला; तर तो २००च्या वर! "रक्तदाब वाढल्यामुळे मुलीला हा त्रास होत आहे. तिला तत्काळ दवाखान्यात न्यायला हवे,” असे सांगितले. भगताच्या उपचाराने मुलीचा त्रास कमी होत नव्हता, म्हणून मुलीला दवाखान्यात नेण्यात आले. उपचार झाले; मुलगी बरी झाली. त्यामुळे मुलीच्या बापानेच नव्हे, तर अख्ख्या पाड्याने ‘केशवसृष्टी’च्या स्वास्थ्यसुरक्षारक्षकांचे आभार मानले. भगताऐवजी दवाखान्यात गेल्यास फायदा होतो, हेसुद्धा त्यांनी मान्य केले. ‘केशवसृष्टी’च्या ‘स्वास्थ्यरक्षक योजने’मुळे डॉक्टरकडे न जाणे, या कितीतरी वर्षांच्या अंधश्रद्धेतून गाववाले बाहेर पडले होते.
कोण आहेत हे स्वास्थरक्षक? तर ‘केशवसृष्टी ग्रामस्वास्थ्य सुरक्षा’अंतर्गत स्वेच्छेने गावासाठी आरोग्यसेवेचे दूत म्हणून कार्यरत असणारे हे गावातले जोडपे. नाना देशमुख यांनी ‘समाजशिल्पी दाम्पत्य’ ही संकल्पना मांडली होती. या संकल्पनेला वास्तव आणि मूर्त स्वरूप देत, ‘केशवसृष्टी स्वास्थ्य प्रकल्प’प्रमुख डॉ. सुरेश सरवडेकर यांनी ‘स्वास्थ्यसुरक्षारक्षक’ ही संकल्पना अस्तित्वात आणली. बाहेरून कुणीतरी दाम्पत्य गावात येईल आणि मग ते गावातल्यांसाठी काम करतील, हे न करता, गावातल्याच सेवाभावी दाम्पत्याला निवडून त्यांना ही जबाबदारी दिली. कारण, गावातील लोकांना गावाची ऐतिहासिक सामाजिक भोगौलिक आणि वास्तव परिस्थिती ‘याचि देही याचि डोळा’ माहिती असते. या जोडप्यांना आरोग्य तपासणी आरोग्य सर्वेक्षण, संपर्क संवाद सेवा यांवर दोन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांनी गावातल्या प्रत्येक घरातील कुटुंबाचे आरोग्य सर्वेक्षण करायचे. आरोग्यसंपन्न गाव बनवायचे. या समाजशील जोडप्यांनी आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली. आज ५१ गावांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. पिंपळास गावचे साची आणि सचिन पाटील असू देत की टेटवली गावचे निशा भुरकूड आणि विनेश भुरकूड असू देत, कोचाळ गावची ज्योती आणि घनश्याम सारसे असू देत, यांच्यासह इतर ४८ गावांच्या स्वास्थ्यरक्षक दाम्पत्यांनी त्यांच्या त्यांच्या गावात आरोग्य सर्वेक्षण आणि आरोग्य उपचार सुलभतेचा एक नवा इतिहासच लिहिला आहे. हे आरोग्य सेवाकार्य सध्या पालघर जिल्ह्यातील वाडा, मोखाडा, विक्रमगड, जव्हार आणि डहाणू (कासा) येथे सुरू आहे.
असो. डॉ. सुरेश सरवडेकर यांच्याशी या स्वास्थ्य उपक्रमाबाबत संवाद साधला. त्यानुसार स्वास्थ्य विभागाचे काम मुख्य दोन विभागांत करण्यात येते, ते म्हणजे, उपचारात्मक (ट्रीटमेंट) व प्रतिबंधात्मक (प्रिव्हेंटिव्ह) योजना.
उपचारात्मक योजना
घरोघरी वैद्यकीय तपासणी करून रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार केले जातात. हे काम तीन प्रकारे केले जाते.
घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन सर्वेक्षण व वैद्यकीय तपासणी व स्वास्थ्याबद्दलचे सर्वेक्षण करणे
या प्रकल्पांतर्गत गावकर्यांच्या स्वास्थ्याबद्दलचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. प्रत्येक परिवाराला ‘परिवार स्वास्थ्य’ कार्ड देण्यात आले आहे. अंगणवाडी सेविकांकडे गावातील घर, रस्ते आणि महत्त्वाच्या वास्तू दर्शवणारा गावाचा नकाशा असतो. डॉ. सुरेश यांनी यामध्ये अतिशय रंजक आणि महत्त्वपूर्ण बदल केला. त्यांनी गावनिहाय पाच ‘स्वास्थ्यनकाशे’ तयार करण्याची योजना केली. जसे, १. गावातील आवश्यक स्वास्थ्यसुविधांचा नकाशा (केजीएसटी नकाशा) २. गावचा रोगनिहाय नकाशा ३. मुलांचा वाढीचा स्टार हेल्थ ग्रेड नकाशा ४. किशोरींचा सशक्त आणि सक्षमतेचा स्टार नकाशा ५. गावातील कार्डनोंदणीचा नकाशा
टेलिकन्सल्टेशन
दुर्गम खेड्या-पाड्यात आर्थिकतेमुळे किंवा कामाच्या व्यापाने वेळ नसल्यामुळे दवाखान्यात जाऊन उपचार घ्यायला लोक टाळाटाळ करतात. यावर उपाय म्हणून प्रत्येक दिवशी डॉक्टरांची मीटिंग व्हिडिओ कॉलद्वारे गावातील रुग्णांसोबत करण्यात येते. डॉक्टरांना रुग्णाचा क्यूआर कोड स्कॅन करून रुग्णाबद्दलची मेडिकल चेकअपमधील माहिती मिळते. डॉक्टर रुग्णाशी चर्चा करून त्याला उपचार करतात. रुग्णास अत्यावश्यक उपचारासाठी मुंबईतील जे. जे. हॉस्पिटल, डहाणूतील वेदांत हॉस्पिटल व नाशिकमधील श्रीगुरुजी हॉस्पिटलमध्ये पाठविले जाते.
स्वास्थ्य सुरक्षा विमा योजना
सर्वेक्षणातून रुग्णांची माहिती मिळते. मात्र, त्यावरची औषधे घेणे अनेकदा परवडत नाही. तर, या योजनेअंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबाकडून १०० रुपये आर्थिक सहभाग घेतला जातो. उर्वरित पैसे दानशूर व्यक्तींकडून घेतले जातात व गावातील रुग्णांना औषधे व आवश्यक चाचण्या संस्थेने निवडलेल्या फार्मसी व लॅबमधून वर्षभर मोफत पुरविल्या जातात.
प्रतिबंधात्मक योजना
स्वस्थ्य मुले, भविष्यातील सशक्त भारत (मुलांसाठी स्टार हेल्थ ग्रेडिंग )
यामध्ये मुख्यत्वे पाच ते १२ वयोगटातील मुले व मुली यांचे मेडिकल चेकअप करून त्यांना त्यांचे चार मानके-वजन, उंची, उंचीप्रमाणे वजन व हिमोग्लोबिन या मानकांप्रमाणे चारही मानके सामान्य असतील, तर चार स्टार देण्यात येतात. ज्या मुलांना व मुलींना चारपेक्षा कमी स्टार मिळालेले असतात, त्यांना पौष्टिक आहार व उपचार केले जातात. त्यांच्या पालकांना मुलांच्या वाढीसाठी पौष्टिक आहाराच्या महत्त्वाबद्दल शिक्षण दिले जाते.
स्वस्थ माता, भविष्यातील सशक्त परिवार (किशोरी सशक्तीकरण योजना)
यामध्ये ११ ते १८ वयोगटातील लग्न न झालेल्या मुलींना वाढीसाठी पौष्टिक आहाराच्या महत्त्वाबद्दल शिक्षण दिले जाते. यांना मासिक पाळीमध्ये घ्यावयाची काळजी, असुरक्षित शरीरसबंधामुळे होणारे रोग व गर्भधारणा व त्यातील संभाव्य धोके यांबद्दल व्हिडिओद्वारे, कॉमिक बुकद्वारे माहिती दिली जाते व सुशिक्षित केले जाते. त्यांना मोफत सैनिटरी नॅपकिन्सचा पुरवठाही करण्यात येतो. गावकर्यांच्या सहभागातून गावकर्यांच्याच आरोग्याचा सर्वांगीण विकास व्हावा, म्हणून ‘केशवसृष्टी’ने कार्यान्वित केलेला हा उपक्रम पाहून चटकन ओठांवर येतो, तो मंत्र-
ॐ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः|
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखभाग्भवेत्॥
हा मंत्र, ही संकल्पना घेऊनच ‘केशवसृष्टी’चे हे आरोग्यासाठीचे कार्य सुरू आहे. ‘केशवसृष्टी’चे ग्रामस्वास्थ्य सुरक्षाकार्य म्हणजे आरोग्य समृद्धीतून ग्रामसमृद्धी होय!
-योगिता साळवी
९५९४९६९६३८