जगाच्या नकाशावर देशांच्या सीमा ठरविणे सहज शक्य आहे. मात्र, कोणत्याही विकसनशील आणि विकसित अर्थव्यवस्थेला सीमा मान्य नसतात. व्यापाराला वेग हवा असतो, उद्योगांना बाजारपेठांपर्यंत थेट पोहोचायचे असते आणि माणसांना अंतराची बंधने काही मिनिटांत पार करायची असतात. याच जागतिक गरजेचा वेध घेत डेन्मार्क आणि जर्मनीने बाल्टिक समुद्राच्या तळाखाली तब्बल १८ किमी लांबीचा बोगदा उभारण्याचे आव्हान स्वीकारले आहे. ‘फेहमार्नबेल्ट’ हा प्रकल्प त्यामुळे केवळ दोन देशांना जोडणारा वाहतूकमार्ग नाही, तर भविष्यातील जागतिक अर्थव्यवस्थेची दिशा स्पष्ट करणारा महत्त्वाकांक्षी प्रयोग आहे.
२१व्या शतकातील स्पर्धा लक्षात घेता, जगभरात बंदरे, रेल्वे कॉरिडोर, आंतरराष्ट्रीय महामार्ग, समुद्राखालील बोगदे आणि बहुपर्यायी वाहतूक व्यवस्थांमध्ये मोठी गुंतवणूक केली जात आहे. ‘फेहमार्नबेल्ट’ हा याच जागतिक परिवर्तनाचा महत्त्वाचा भाग आहे. या प्रकल्पाची भव्यता त्याच्या अभियांत्रिकी तंत्रज्ञानात दडलेली आहे. समुद्राखाली पारंपरिक पद्धतीने बोगदा खोदण्याऐवजी जमिनीवर महाकाय काँक्रीटचे घटक तयार करून ते समुद्रतळावरील खंदकात स्थापित केले जात आहेत. एकूण ८९ घटकांमधून हा बोगदा साकारला जाणार आहे. प्रत्येक सामान्य घटक सुमारे २१७ मीटर लांबीचा आणि ७३ हजार ५०० टन वजनाचा. या घटकांची समुद्रतळाशी अचूक जोडणी करणे, पाण्याचा प्रचंड दाब सहन करणारी संरचना तयार करणे आणि दीर्घकालीन सुरक्षितता सुनिश्चित करणे, ही अभियांत्रिकीसमोरील मोठी आव्हाने आहेत.
या बोगद्याचे महत्त्व केवळ प्रवासाचा वेळ कमी करण्यापुरते नाही. सध्या या मार्गावर फेरीबोटीने अंतर पार करण्यासाठी सुमारे ४५ मिनिटे लागतात. बोगदा सुरू झाल्यानंतर चारचाकीने हा प्रवास अवघ्या १० मिनिटांत, तर रेल्वेने सात मिनिटांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. कोपनहेगन ते हॅम्बर्गदरम्यानचा रेल्वेप्रवास सुमारे पाच तासांवरून अडीच तासांपर्यंत कमी होऊ शकतो. यामुळे प्रवासी वाहतुकीबरोबरच मालवाहतूक, पर्यटन, औद्योगिक व्यवहार आणि सीमापार व्यापाराला नवी गती मिळण्याची शक्यता आहे.
युरोपच्या स्कॅन्डिनेव्हियन-मेडिटेरेनियन वाहतूक मार्गिकेतील हा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. उत्तर युरोप आणि मध्य युरोपमधील संपर्क अधिक सक्षम झाल्यास उत्पादन केंद्रे, बंदरे आणि बाजारपेठांमधील अंतर कमी होईल. विशेषतः रेल्वे मालवाहतुकीला चालना मिळाल्यास रस्ते वाहतुकीवरील अवलंबित्व कमी करण्यास आणि वाहतूक व्यवस्थेची कार्यक्षमता वाढविण्यास मदत होऊ शकते. म्हणजेच, एका बोगद्याची निर्मिती अनेक देशांच्या आर्थिक व्यवहारांवर परिणाम घडवू शकते.
जागतिक पातळीवर अशा पायाभूत सुविधांची स्पर्धा अधिक तीव्र होत आहे. चीनचा ‘बेल्ट अॅण्ड रोड’ उपक्रम, भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक मार्गिका, आफ्रिकेतील ‘लोबिटो रेल्वे कॉरिडोर’ आणि युरोपमधील सीमापार रेल्वे प्रकल्प या सर्वांमागे एक समान विचार आहे. तो विचार म्हणजे, जगातील आर्थिक केंद्रांना अधिक जवळ आणणे. भौगोलिक अंतर कमी करणे म्हणजे, आर्थिक संधी वाढविणे, हा या नव्या विकासदृष्टीचा गाभा आहे.
मात्र, आधुनिक पायाभूत सुविधा विकासासमोर पर्यावरणीय परिणाम, प्रचंड भांडवली खर्च, तांत्रिक सुरक्षितता आणि प्रकल्पांच्या आर्थिक व्यवहार्यतेची आव्हानेही आहेत. ‘फेहमार्नबेल्ट’ प्रकल्पात नोव्हेंबर २०२६ मध्ये काँक्रीट घटकांच्या जोडणीतील रबरी सीलमध्ये तांत्रिक अडचण आढळल्याने कामाला तात्पुरता विलंब झाला आहे. ही घटना मोठ्या प्रकल्पांमध्ये गुणवत्ता आणि सुरक्षिततेशी तडजोड न करण्याचे महत्त्व अधोरेखित करते.
ज्या देशांकडे वेगवान, सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि एकात्मिक पायाभूत सुविधा असतील, ते जागतिक अर्थव्यवस्थेत अधिक प्रभावी ठरतील. ‘फेहमार्नबेल्ट’ बोगदा याच नव्या वास्तवाची जाणीव करून देतो. समुद्राच्या तळाशी साकारत असलेली ही संरचना दोन देशांमधील अंतर कमी करण्याबरोबरच जागतिक ‘कनेटिव्हिटी’च्या महत्त्वाकांक्षेला नवी उंची देत आहे. भौगोलिक अंतराला आर्थिक सामर्थ्यात रूपांतरित करण्याची क्षमता, हेच भविष्यात एखाद्या देशाच्या विकासाचे खरे मोजमाप असेल.