भाजपसाठी पंजाबमध्ये सत्ता मिळविणे जितके आवश्यक, तितकेच त्यासाठी योग्य रणनीती आखणेही गरजेचे होते. त्या अनुषंगाने भाजपने आपला जुना मित्र असलेल्या अकाली दलाशी युती करण्याचा निर्णय काल जाहीर केला. त्यामुळे पंजाबच्या आगामी विधानसभा निवडणुकीत आता सत्ताधारी आप, काँग्रेस आणि अकाली दल-भाजप असा तिरंगी सामना रंगणार आहे.
आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्ष आणि अकाली दल (बादल) या पक्षांमध्ये पुन्हा एकदा युती झाली. सहा वर्षांपूर्वी केंद्र सरकारने संसदेत सादर केलेल्या तीन कृषी कायद्यांतील तरतुदींविरोधात अकाली दलाने ‘एनडीए’मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अकाली दलाचा पार धुव्वा उडाला. पण, भाजपचीही कामगिरी स्पृहणीय नव्हती. आता हे दोन पक्ष पुन्हा एकत्र आल्यामुळे दोन्ही पक्षांना थोडा लाभ निश्चित होईल. गुरू नानक यांच्या जयंतीदिनी या युतीची घोषणा करून भाजपने तिला एक भावनिक पैलू दिला असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या युतीचे वर्णन ‘हिंदू-शीख ऐक्याचे प्रतीक’ असे केले आहे, तर अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी ही केवळ राजकीय युती नसून लोकांच्या भावनांची युती असल्याचे म्हटले आहे.
पंजाब हे तसे भाजपसाठी एक अवघड राज्य ठरले आहे. तिथे अकाली दल हा भाजपचा सर्वांत जुना सहकारी पक्ष. अकाली दलाची लोकप्रियता शिखरावर होती, तोपर्यंत या युतीचा लाभ भाजपलाही झाला. मात्र, भाजप नेते पंजाबमध्ये अकाली दलावर पूर्णपणे विसंबून राहिल्याने पक्षाच्या संघटनेकडे काहीसे दुर्लक्ष झाले. पंजाबच्या ग्रामीण भागातही अकाली दलाचे वर्चस्व. शहरी भागांमध्ये भाजपची पकड चांगली असली, तरी तिला मर्यादा आहेत. आता ग्रामीण भागात पाळेमुळे आणि पोहोच असलेल्या अकाली दलाची साथ मिळाल्याने भाजपची निवडणुकीत विजय मिळण्याची शक्यता निश्चितच वाढली आहे.
पंजाबमध्ये पंथिक मतदार हा महत्त्वाचा घटक मानला जातो. पंथिक म्हणजे, शीख धर्माला केंद्रस्थानी ठेवून राजकारण करणारा पक्ष. ते स्थान आतापर्यंत अकाली दलाकडे होते. मात्र, सुखबीरसिंग बादल यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात घडलेल्या चुकांमुळे अकाली दल जनतेच्या मनातून उतरला. ते स्थान पुन्हा मिळविण्यासाठी अकाली दलाला आता ‘वारिस पंजाब दे’ या अमृतपालसिंग यांच्या पक्षाशी स्पर्धा करावी लागत आहे. अमृतपालसिंग यांच्यावर दहशतवाद्यांना आणि ‘खलिस्तान’ आंदोलनाला समर्थन दिल्याचा आरोप असून, ते सध्या तुरुंगात आहेत. प्रामुख्याने ग्रामीण भागात या पंथिक मतांचे राजकारण चालते. या ग्रामीण मतदारांवरील ‘वारिस पंजाब दे’ पक्षाचा पगडा कमी करण्यासाठी अकाली दल व भाजप यांना बरेच प्रयत्न करावे लागतील. अर्थात, या युतीमुळे हे दोन पक्ष सत्तेत येण्याची शक्यता साहजिकच वाढलेली आहे. सध्या पंजाबमध्ये पहिल्या स्थानासाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी जारी झालेल्या एका सर्वेक्षणानुसार, यंदा पंजाब विधानसभेत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही, अशी एक शयता वर्तविण्यात आली होती. त्यामुळे ‘किंगमेकर’ बनण्यासाठी दुसर्या क्रमांकाचा पक्ष (किंवा गट) होणे, हेही तितकेच महत्त्वाचे ठरेल.
पंजाबमधील सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या कारभारावर आणि अकार्यक्षम मुख्यमंत्री ठरलेल्या भगवंत मान यांच्या नेतृत्वावर जनतेत प्रचंड नाराजी आहे. शेतकरी, उद्योजक, विद्यार्थी, महिला असे सगळेच वर्ग ‘आप’च्या मनमानी आणि भ्रष्टाचारी कारभाराला अक्षरश: विटले आहेत. अगदी सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकही मान सरकारविरोधात रस्त्यावर उतरले होते. तसेच मानसा येथील अमली पदार्थविरोधी कार्यकर्ते परविंदर सिंह झोटा यांच्या हत्येनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत शेतकरी संघटना आणि कार्यकर्त्यांनी अमृतसरमध्ये राज्य सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली आणि राज्यव्यापी बंदची मागणीदेखील केली होती. मागेच ‘लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी’तील गुंडगिरी आणि जाळपोळीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. त्यातच पंजाब सरकारचे खरे नियंत्रण पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याच हाती. दिल्लीतील सत्ता गेल्यानंतर त्यांनी आपली विलासी आणि आलिशान जीवनशैली पंजाबी जनतेच्या पैशावर कायम राखली होती. आलिशान ‘शिशमहाला’मुळे आणि मद्यविक्रीच्या धोरणामुळे दिल्लीतील सत्ता गेली, तरी पंजाबमधील सर्वांत मोठी समस्या असलेल्या अमली पदार्थांच्या विक्री आणि सेवनाविरोधात या पक्षाच्या सरकारने काहीच उपाय योजले नाहीत. परिणामी, आज नशा ही पंजाबातील सर्वांत मोठी समस्या बनली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंजाबला येत्या दोन वर्षांत पूर्णपणे नशामुक्त करण्याचे वचन दिले आहे. माओवादी हिंसाचार देशातून समूळ नष्ट करण्याचे त्यांनी दिलेले आश्वासन त्यांनी दिलेल्या मुदतीत पूर्ण करून दाखविले. त्यामुळे पंजाबलाही ते नशेच्या त्रासातून मुक्ती देतील, अशी आशा पंजाबी जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. त्याचा किती लाभ भाजपला मिळतो, ते पाहावे लागेल. काँग्रेसची स्थिती ठीक असली, तरी त्या पक्षालाही सत्तेसाठी बहुमत मिळविणे कठीणच. त्या पक्षात अंतर्गत गटबाजी टोकाला गेली असून, एकही सर्वमान्य नेता दिसत नाही. वातावरण अनुकूल असले, तरी त्याचा लाभ उठविण्याच्या परिस्थितीत काँग्रेस पक्ष दिसत नाही.
या पार्श्वभूमीवर आता भाजप आणि शिरोमणी अकाल दल या दोन्ही पक्षांमध्ये युती झाल्याचे जाहीर झाल्याने, या युतीला असलेल्या विरोधाचा मुद्दा निरर्थक ठरतो. त्यातच युतीचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार अकाली दलाचा असेल, ही बाबही प्रारंभीच जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्रिपद अकाली दलाला देऊन भाजपने त्या पक्षाला मोठ्या भावाचा मान दिला आहे. आता या दोन जुन्या सहकार्यांनी एकत्र येऊन पुन्हा प्रपंच मांडण्याचा निर्णय घेतला आहे, तो योग्य तर्हेने पार पाडण्याची जबाबदारी दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर आहे. पंजाबमधील या तिरंगी लढतीचा लाभ भाजप-अकाली दल किती प्रमाणात उठवतात, त्यावर या पक्षांचेच नव्हे; तर पूर्ण पंजाबचे भवितव्य अवलंबून आहे.