मालवणच्या समुद्रात घुमला दुर्मीळ व्हेलचा आवाज; जगात १०० हून कमी संख्या

    25-Nov-2026
aribian sea humpback whale
मुंबई (विशेष प्रतिनिधी) – जगात फक्त अरबी समुद्रात आढळणाऱ्या आणि संख्येने १०० हून कमी उरलेल्या संकटग्रस्त अरेबियन सी हम्पबॅक व्हेलच्या आवाजाची नोंद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या सागरी परिक्षेत्रातून करण्यात आली आहे (aribian sea humpback whale). भारतीय वन्यजीव संस्थान (डब्लूआयआय) नुकत्याच प्रकाशित केलेल्या स्टेटस आॅफ अरेबियन सी हम्पबॅक व्हेल इन इंडिया’ या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. वर्षांच्या संशोधनातून ही महत्त्वपूर्ण बाब समोर आली आहे (aribian sea humpback whale). त्यामुळे महाराष्ट्राचे सागरी परिक्षेत्र या संकटग्रस्त व्हेलसाठी महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. (aribian sea humpback whale)
 
 
'अरेबियन सी हम्पबॅक व्हेल' हा अरबी समुद्रात आढळणारा दुर्मीळ सागरी सस्तन प्राणी आहे. जगात आढळणाऱ्या हम्पबॅक व्हेलची ही एक उपप्रजात असून ती भारत, पाकिस्तान, ओमान, इरान, इराक, कतार, अरब राष्ट्र, येमन आणि कुवेत या देशांच्या सागरी परिक्षेत्रामध्ये अधिवास करते. 'आययूसीएन'च्या लाल यादीत या प्राण्याला 'संकटग्रस्त' प्रजातींच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. याच हम्पबॅक व्हेलचा अरबी समुद्रातील अधिवास अभ्यासण्यासाठी देशाच्या पश्चिम किनारपट्टी भागात डिसेंबर २०२२ ते मार्च २०२५ या काळात 'डब्लूआयआय'कडून संशोधन प्रकल्प राबविण्यात आला. या संशोधनाचे नेतृत्व संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. जे. ए. जॉन्सन यांनी केले. तर डॉ. नेहरू प्रभाकरन (वैज्ञानिक डी), चिन्मया घाणेकर (वैज्ञानिक सी) आणि अभिषेक बी. (प्रकल्प सहयोगी) यांनी हा प्रकल्प प्रत्यक्ष राबविला.
 
व्हेलचे प्रत्यक्ष दर्शन होणे अनेकदा कठीण असते. त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाचा आणि समुद्रातील वावराचा अभ्यास करण्यासाठी या संशोधनप्रकल्पात ध्वनिमुद्रण तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. याच उद्देशाने मे २०२४ मध्ये पावसाळ्यापूर्वीच्या हंगामात मालवणच्या समुद्रात चार ध्वनिमुद्रक १५ दिवसांसाठी सोडण्यात आले होते. यापैकी एका ध्वनिमुद्रकाद्वारे सुमारे ६०० तासांचा ध्वनी डेटा मिळाला. या ध्वनी डेटाच्या विश्लेषणातून १७ मे २०२४ रोजी अरेबियन सी हंपबॅक व्हेलच्या आवाजाची नोंद करण्यात आली.
 
 
दीर्घकालीन निरीक्षणाची शिफारस
मालवणमधील ध्वनिमुद्रणाचा प्रयोग यशस्वी ठरल्याने आम्ही पश्चिम किनारपट्टीवरील सातही संभाव्य हॉटस्पॉटमध्ये कायमस्वरूपी ध्वनिमुद्रण उपकरणे बसविण्याची शिफारस करत आहोत. यामध्ये गुजरातमधील ओखा आणि पोरबंदर, महाराष्ट्रातील अलिबाग आणि मालवण, गोव्याची किनारपट्टी, कर्नाटकातील नेत्राणी बेटाचा परिसर आणि केरळमधील मप्पिला बीच या क्षेत्रांचा समावेश आहे. या अभ्यासाकरिता ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत नियमित निरीक्षण, पर्यावरणीय डीएनए, तंत्रज्ञानाचा वापर आणि जनुकीय नमुन्यांचे विश्लेषण करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच अरबी समुद्रातील व्हेलच्या गणसंख्येचा ओमानमधील व्हेलच्या गणसंख्येसोबत असलेला संबंध तपासण्याची गरज आहे. - डॉ. जे. ए. जॉन्सन, वरिष्ठ शास्त्रज्ञ, डब्लूआयआय
 
 
व्हेलच्या अस्तित्वाचे संकेत
‘डब्लूआयआय’च्या या अभ्यासामुळे महाराष्ट्रातील मालवणच्या समुद्रात अरेबियन सी हम्पबॅक व्हेलच्या अस्तित्वाच्या नोंदी आढळल्या असून, समुद्री सस्तन प्राण्यांच्या अधिवासाचा अभ्यास आणि दीर्घकालीन निरीक्षणासाठी आम्हाला देखील या संशोधनाचा उपयोग होणार आहे. ध्वनिमुद्रणाचा वापर करुन हा अभ्यास झाला. त्यात व्हेलच्या प्रत्यक्ष दर्शन होण्याची आवश्यकता नसल्याने ही पद्धत त्यांच्या उपस्थितीचा अभ्यास करण्यासाठी प्रभावी आणि हस्तक्षेपविरहित ठरू शकते. – कांचन पवार, विभागीय वन अधिकारी, कांदळवन कक्ष दक्षिण कोकण
 
 




संबंधित मजकूर