आइस्क्रीमचे आमिष दाखवून १२ वर्षीय मुलाचे अपहरण; पाच लाखांची खंडणी मागितली!

अंबरनाथ पोलिसांची काही तासांत कारवाई; बदलापूर महामार्गावर सापळा रचून दोघांना पकडले, मुलाची सुखरूप सुटका

    25-Nov-2026

Ambernath Kidnapping Case
 
अंबरनाथ (Ambernath Kidnapping Case): आइस्क्रीमचे आमिष दाखवून १२ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याच्या वडिलांकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये उघडकीस आली आहे. मात्र अंबरनाथ पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासांत मुलाची सुखरूप सुटका केली. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यातील एक आरोपी अल्पवयीन आहे.
 
अंबरनाथच्या जावसई परिसरात राहणारा मुलगा खेळत असताना दोन जणांनी त्याला आइस्क्रीमचे आमिष दाखवून सोबत नेले. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी मुलाच्या वडिलांना व्हॉट्सॲप कॉल करून पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. घाबरलेल्या वडिलांनी तातडीने अंबरनाथ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. (Ambernath Kidnapping Case)
 
पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर अपहरणकर्त्यांनी खंडणीची रक्कम घेऊन बदलापूर गावातील वडोदरा-जेएनपीटी महामार्गाजवळ येण्यास सांगितले. पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला. वडिलांनी पैसे देऊन मुलाची सुटका करून घेतल्यानंतर दबा धरून बसलेल्या पोलिसांनी आरोपींना पकडले. (Ambernath Kidnapping Case)
 
या प्रकरणात मुख्य आरोपी हकीक सलीम खान याच्यासह एका अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली आहे. कर्जबाजारीपणातून बाहेर पडण्यासाठी अपहरणाचा कट रचल्याची कबुली मुख्य आरोपीने दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक अर्चना कटके यांनी दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया देशमुख यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. मुख्य आरोपीला २८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Ambernath Kidnapping Case)
 




संबंधित मजकूर