भारताच्या प्रगतीला जागतिक शक्तींचा विरोध! ‘भारत मोठा झाला तर अनेक देशांची दुकाने बंद होतील’; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन

    25-Nov-2026


 
Mohan Bhagwat Statement on India
 
छत्रपती संभाजीनगर (Mohan Bhagwat Statement on India) : जगातील कोणत्याही महासत्तेला भारताने प्रगती करावी, असे वाटत नाही. जागतिक शक्तींना आपले वर्चस्व कायम ठेवायचे असून, त्यासाठी त्या इतर देशांना दबावाखाली ठेवतात. मात्र, भारताची भूमिका सर्वांना मदत करण्याची आहे. भारताची प्रगती झाली, तर या शक्तींचे वर्चस्व संपुष्टात येईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी बुधवारी केले.
 



छत्रपती संभाजीनगर येथील पाचव्या ‘पद्मा महोत्सवा’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ‘जो बलवान तोच टिकतो’ या तत्त्वावर जागतिक शक्तींचा विश्वास असल्याचे सांगत, भारताला मदत करण्याची भूमिका घेणारा देश म्हणून पुढे जायचे आहे, असे भागवत म्हणाले. मालदीवमधील पाणीटंचाईच्या काळात भारताने पाणीपुरवठा केला, आर्थिक संकटात श्रीलंकेला मदत केली, तसेच नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तानलाही नैसर्गिक आपत्तीच्या काळात सहाय्य केल्याची उदाहरणे त्यांनी दिली. (Mohan Bhagwat Statement on India)
 
आजच्या तरुणाईमध्ये प्रामाणिकपणा असून, त्यांना खोटेपणाचा तिरस्कार आहे. देशाला महान बनवण्याची त्यांची इच्छा असल्याचेही भागवत यांनी नमूद केले. समाजात चांगले काम करणाऱ्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
 
माजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांनीही यावेळी विकसित भारताच्या संकल्पनेवर भाष्य केले. २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यात तरुणांचे योगदान सर्वाधिक असेल, असे ते म्हणाले. बाह्य आव्हानांपेक्षा अंतर्गत धोके अधिक गंभीर असल्याचेही त्यांनी नमूद केले. (Mohan Bhagwat Statement on India)
 
ज्ञानयज्ञ फाउंडेशनतर्फे आयोजित हा तीन दिवसीय महोत्सव पद्म पुरस्कारप्राप्त व्यक्तींना नागरिकांशी संवाद साधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. (Mohan Bhagwat Statement on India)






संबंधित मजकूर