सध्या हवेत गारठा हळूहळू वाढू लागला आहे. अशावेळी वातावरण अचानक बदलल्यामुळेही सर्दी-खोकल्याचा त्रास प्रामुख्याने संभवतो. खोकल्याचेही बरेचसे प्रकार रुग्णांमध्ये दिसून येतात. तेव्हा, संक्रामक रोगांच्या या लेखमालिकेच्या श्रृंखलेमध्ये आज प्रथम वायुजन्य रोगांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
एखादी व्यक्ती संक्रामक (Contagious) रोगाने ग्रस्त असल्यास, त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींमध्ये तो रोग संक्रमित होऊ शकतो. प्रत्येक रोगाला एक विशिष्ट 'Incubation period' असतो. म्हणजे, शरीरात रोगकारक जीवाणू/विषाणू प्रवेशित झाल्यापासून ते त्या रोगाची लक्षणे शरीरात उत्पन्न होण्यापर्यंतचा काळ याला 'Incubation period' म्हणतात. या कालावधीमध्ये रुग्णामध्ये कोणतेही ठळक लक्षण त्या विशिष्ट रोगाचे संपूर्णतः निर्माण झालेले नसते. पण, अशा अवस्थेतही ती व्यक्ती त्या रोगाची संवाहक असते; म्हणजेच संक्रमित व्यक्ती ही इतरांमध्ये आजार पसरवू शकते. म्हणून संक्रमित होणार्या व्याधींचे संक्रमण चटकन होताना दिसते. रोगाचे (संक्रामक रोगांचे) पसरणे यासाठी विविध माध्यमे लागतात. आज वायुजन्य संक्रमित रोगांपैकी एका रोगाविषयी सविस्तर माहिती घेऊया.
Whooping Cough - यालाच ‘डांग्या खोकला’ किंवा 'Hacking Cough' असेही म्हणतात. लहान बाळांमध्ये'DPT Vaccine' जे दिले जाते, त्यातील ‘P’ म्हणजे 'Pertussis' (म्हणजेच डांग्या खोकला) याचीच लस आहे. या लसीमुळे लहान बाळांमध्ये या रोगाचे प्रमाण खूप कमी आहे, नियंत्रित आहे. बाल्यावस्था, विशेषतः पहिले वर्ष हे बाळासाठी खूप नाजूक असते. अन्नातील बदल (स्तन्यापासून सुरू होऊन द्रवान्न, लाप्शी, खिमटी ते घन आहार) यामुळे पचन संस्था हळूहळू त्या अन्नपदार्थांना सात्म्य होत जाते. पचनशक्ती सुधारत जाते. पहिल्या वर्षी सर्व सहा ऋतू अनुभवायला पहिल्यांदाच मिळतात. त्या त्या ऋतूसापेक्ष वातावरणातील बदलांना सामोरे जाताना प्रकृतीमध्ये थोड्या कुरबुरी उत्पन्न होतात. त्यातच, स्वाभाविकतः त्यांची व्याधिक्षमता संपूर्णतः विकसित झालेली नसते. त्यामुळे वातावरण-आहार-पाणी-दिनचर्या या बदलांचा तान्हुल्यावर लगेच परिणाम होताना दिसतो. बाल्यावस्थेत कफाचे प्राबल्य असते. आयुर्वेदानुसार कफ म्हणजे केवळ सर्दी-खोकला नव्हे. त्रिदोषांपैकी कफ हा एक अविभाज्य घटक आहे आणि शरीरबांधणी व स्थिरतेसाठी कफदोषाची अत्यंत गरज असते. बालकांमध्ये संपूर्णतः परिपूर्णता न आल्यामुळे विविध व्याधी लवकर त्यांना ग्रस्त करतात. तसेच, वृद्धापकाळातही व्याधी प्रतिकारशक्ती कमी होते. तेव्हा या वयोगटातसुद्धा संक्रमित रोगांची लागण चटकन होऊ शकते. संक्रामक रोगांचे प्रसरण जरी बर्याचजणांमध्ये एकदम झाले, तरी मंद प्रतिकार क्षमता असल्यास त्या संसर्गाचे रूपांतर रोगामध्ये होते.
वायुजन्य रोगांमध्ये हे जीवाणू हवेतून पसरतात. जेव्हा बाधित व्यक्ती खोकते, शिंकते किंवा बोलते, तेव्हा 'Respiratory Droplets' (थेंबाद्वारे) हे जीवाणू इतरांमध्ये प्रवेशित होतात. डांग्या खोकला हे एक 'Bacterial Infection' आहे. हा श्वसनसंस्थेचा (म्हणजेच फुप्फुस आणि श्वासनलिकांचा) अत्यंत संसर्गजन्य व्याधी आहे. 'Bordetella Pertussis' या जीवाणू (Bacteria) मुळे तो उत्पन्न होतो. या जीवाणूची लागण झाल्यावर पाच ते दहा दिवस ते २१ दिवस एवढ्या अवधीनंतर लक्षणे दिसतात. डांग्या खोकल्याचे जीवाणू श्वसननलिकेच्या अंतःस्तरावर (Lining of upper Airways) जाऊन चिकटतात. मग श्वसननलिका आणि फुप्फुसांमध्ये सूज व चिकट कफ साठू लागतो. यामुळे श्वसनासाठी हवेची पोकळी कमी होतो. त्रास होतो आणि खोकल्याची उबळ सुरू होते. यामध्ये खोकल्याची ठास वारंवार लागते. कोरडा खोकला असतो. खोकल्याची तीव्रता इतकी असते की, श्वास घेणेही कठीण होते आणि उच्छ्वासाच्या वेळेस विशिष्ट 'WHOOP' अशा आवाजासकट श्वसन केले जाते. सर्व लक्षणांचा कालावधी वेगवेगळा आहे. काही वेळेस साधे सर्दी-पडसे दोन ते तीन आठवडे राहते अणि मग खोकला सुरू होतो. काही वेळेस, पहिल्या दोन आठवड्यांमध्ये सर्दी-शिंका, थोडा खोकला व हल्का ताप अशी काहीशी लक्षणे असतात. हळूहळू लक्षणांची तीव्रता वाढू लागते. खोकल्याची ढास, विशेषतः रात्री उबळ अधिक येते. खोकून झाल्यानंतर उच्छ्वास घेताना विशिष्ट आवाज ऐकू येतो. खोकल्याची उबळ इतकी तीव्र असते की, क्वचित प्रसंगी जेवलेले अन्नदेखील पडून जाते. बरगड्या खोकून-खोकून दुखू लागतात. चेहरा लालबुंद होतो किंवा काळा-निळा होतो. ओठ-नखे निळी पडतात. तीव्रता जितकी अधिक, तेवढी ही लक्षणे उत्पन्न होतात. अति तीव्र खोकला अधिक काळ असल्यास, पोटांच्या स्नायूंवर ताण पडून त्यात हर्निया होऊ शकतो. खोकून-खोकून बारीक बारीक रक्तवाहिन्या विशेषतः चेहरा व छातीवर दिसू लागतो. डोळ्यांतील श्वेत भागात लालबुंद रक्तवाहिन्या दिसू शकतात. हा खोकला एक-दहा आठवडे इतका काळ असू शकतो. म्हणूनच याला '100-DAY-COUGH' असेही म्हटले जाते.
तान्हुल्यांमध्ये असे खोकणे हे लक्षण दिसत नाही. पण, खोकून-खोकून दम लागणे, श्वास कमी पडणे, गुदमरणे, चेहरा पांढरा/काळा-निळा होणे इ. लक्षणे तीव्र स्वरूपाच्या इन्फेक्शनमध्ये दिसू शकतात. अशा वेळेस, घरी वाट न बघता रुग्णालयात भरती करावे लागू शकते. हा खोकला संपूर्णपणे आटोक्यात येतो. पूर्वीसारखे डांग्या खोकल्यामुळे मृत्यू आता होत नाही. पण, अधिक काळ आणि तीव्र स्वरूपाचा खोकला यामुळे ती व्यक्ती हैराण होते. रात्रीची उबळ अधिक होत असल्यामुळे झोपही पूर्ण होत नाही आणि दिवसभर थकल्यासारखे, ग्लानी असल्यासारखी भासते. ताजेतवानेपणा राहत नाही. विशिष्ट प्रकारचा श्वास घेताना आवाज, खोकल्याची तीव्रता ही डांग्या खोकल्याची विशिष्ट लक्षणे आहेत. खोकून-खोकून काही वेळेस मूत्रप्रवृत्ती अनियंत्रितपणे होऊन जाते. झोप आणि विश्रांती नीट न होण्यामुळे वजनही कमी होऊ लागते.
आयुर्वेदानुसार खोकला हे इतर व्याधींमध्ये एक लक्षण म्हणून असू शकते किंवा स्वतंत्र (स्वतःच) एक व्याधी असू शकतो. तसेच, काही अन्ननलिकेत जाण्याऐवजी श्वसननलिकेत अडकले किंवा वातावरणातील कोरडेपणा यामुळेदेखील सुक्या खोकल्याची ढास-उबळ येऊ शकते. म्हणजे, सगळे सुके खोकले हे डांग्या खोकल्यामध्ये रूपांतर पावत नाही. जशी संपूर्ण शरीराची प्रतिकारक्षमता उत्तम राखणे महत्त्वाचे आहे, तसेच विशिष्ट संस्था, जसे श्वसनसंस्थेचेही रोग प्रतिकारक्षमता आणि कार्यक्षमता उत्तम ठेवण्यासाठी विविध उपाय आयुर्वेदशास्त्रात सांगितले आहेत.
वातावरणातील कोरडेपणा, रुक्षता यांनी नाक-घसा कोरडा पडतो. थंडीमध्ये जशी बाह्य त्वचा कोरडी पडून तडतडते, तसेच ओठ, नाकाची-कानांची अंतर्त्वचादेखील कोरडी पडून तडतडते. कोरडेपणावर उत्तम उपाय म्हणजे, स्निग्धता. तेलाचा-तुपाचा, कोकम तेलाचा, BEES WAX, लोणी किंवा शतधौत धृत इ.पैकी नैसर्गिक स्नेहांचा बाह्य वापर उत्तम परिणाम देतो. अन्य उपाय पुढील लेखात. (क्रमशः)
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
९८२०२८६४२९