मुंबई (अक्षय मांडवकर) - भारतीय पाकोळी या पक्ष्यावरच्या पहिल्या पीएचडी अभ्यासामधून सिंधुदुर्गातील वेंगुर्ला राॅक्समध्ये अधिवास करणाऱ्या भारतीय पाकोळी पक्ष्यांच्या खाद्य जागांचा शोध घेण्यात आला आहे. हे पक्षी खाद्य शोधण्यासाठी समुद्रातील बेटापासून मुख्य भूमीपर्यंत साधारण २५ किमी प्रवास करत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. तसेच जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील पाणथळ जागा आणि त्याभोवतीच्या बागायती या भारतीय पाकोळीसाठी खाद्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित झाले आहे. (vengurla rocks indian swiftlet)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला राॅक्समधील दोन बेटांवर भारतीय पाकोळी या पक्ष्याची वीणवसाहत आहे. महाराष्ट्रात हा पक्षी केवळ या दोन बेटांवरील गुहांमध्येच आढळतो. समुद्रातील बेटांवर या पक्ष्याची वीणवसाहत असलेली ही जगातील या पक्ष्यांची एकमेव वसाहत आहे. महाराष्ट्रातील या पक्ष्यांवर पीएचडी संशोधनाचे काम वन्यजीव संशोधक डाॅ. धनुषा कावलकर यांनी केले. कर्नाटकाच्या 'मनीपाल अकॅडमी आॅफ हायर एज्युकेशन' विद्यापाठीच्या विद्यार्थी असलेल्या डाॅ. कावलकर यांनी 'ब्रिडिंग इकोलाॅजी आॅफ दी इंडियन स्विफ्टलेट इन वेस्टर्न महाराष्ट्र' या विषयावर 'डाॅ. सालीम अली पक्षीशास्त्र व प्रकृती विज्ञान केंद्र' (सेकाॅन) आणि तेथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. मंची शिरीष एस. यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत पीएचडी पूर्ण केली. या संशोधनाकरिता केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने आर्थिक सहाय्य केले होते. महाराष्ट्र वन विभागाने त्यास परवानगी दिली होती. या पीएचडीवर आधारित भारतीय पाकोळीच्या खाद्यसंबंधीच्या संशोधनाचे वृत्त 'इकॉलॉजी इव्होल्यूशन' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रकाशित झाले आहे.
खाद्य कुठे शोधतात ?
या पीएचडीच्या अभ्यासामधून भारतीय पाकोळी हे पक्षी खाद्यासाठी सिंधुदुर्गातील पाणथळ आणि त्याभोवती असलेल्या आंबा-नारळाच्या बागांवर अवलंबून असल्याचे समोर आले आहे. खाद्याच्या शोधात हे पक्षी समुद्रातील बेटापासून मुख्य भूमीवरील पाणथळ क्षेत्रानजीक येत आहेत. मालवण, कुडाळ आणि वेंगुर्ला तालुक्यातील पाणथळ क्षेत्रानजीक या पक्ष्यांचा वावर डाॅ. कावलकर यांना अभ्यासादरम्यान निदर्शनास आला. तीन तालुक्यामधील ११ ते १२ ठिकाणी खास करुन पाट तलाव, वालावल, खवणे आणि हरिचरणगिरी याठिकाणी असणाऱ्या पाणथळ क्षेत्रानजीक भारतीय पाकोळ्या खाद्य शोधत असल्याचे निरीक्षण नोंदवल्याची माहिती डाॅ. कावलकर यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली.
भक्ष्याचा अभ्यास लवकरच
हे पक्षी प्रामुख्याने छोटे किटक खातात. पाणथळीशेजारी असणाऱ्या आंबा किंवा नारळाच्या बागांच्या आसपास छोटे किटक सहज उपलब्ध होत असल्याने हे पक्षी पाणथळी नजीक वावरत असल्याचा निकर्ष मांडण्यात आला आहे.
खाद्य शोधण्यासाठी हे पक्षी ० ते २० किंवा २५ किलोमीटरचा प्रवास करत आहेत. मात्र, हे पक्षी नेमके कोणत्या प्रकारचे किटक खात आहेत, याचा अभ्यास आम्ही येणाऱ्या कालावधीत करणार आहोत. - डाॅ. धनुषा कावलकर, संशोधक