
लखनौ, (UP SP Congress Seat Sharing) :उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्ष (सपा) आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपावरून मतभेद निर्माण झाले आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी काँग्रेसला राज्यातील ४०३ विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ २६ जागा देण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, काँग्रेसने १२५ जागांची मागणी कायम ठेवली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील आघाडीच्या चर्चेत पेच निर्माण झाला आहे.
दिल्लीमध्ये समाजवादी पक्षाचे सरचिटणीस रामगोपाल यादव यांनी काँग्रेसला २६ जागांची यादी दिल्याचे सांगितले. समाजवादी पक्षाचे खासदार राजीव राय यांनीही याला दुजोरा दिला. या २६ जागांवर काँग्रेसशी चर्चा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.(UP SP Congress Seat Sharing)
दुसरीकडे, काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद यांनी या प्रस्तावावर नाराजी व्यक्त केली. काँग्रेस कोणाकडेही जागांची भीक मागत नसून, २६ जागांचा प्रस्ताव आघाडीच्या दृष्टीने योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले. काँग्रेस आता २०२२ मधील स्थितीत नसून पक्ष अधिक मजबूत झाल्याचा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, जागावाटपाच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांमध्ये दुसऱ्या दिवशीही बैठक सुरू होती. काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांच्या निवासस्थानी ही चर्चा झाली. सपाने दिलेल्या २६ जागांच्या यादीचे २०२२ च्या निवडणुकीतील निकालांशी विश्लेषण केल्यास, त्यापैकी केवळ दोन जागांवर काँग्रेसला विजय मिळाला होता. चार जागांवर पक्ष दुसऱ्या क्रमांकावर होता, तर १६ जागांवर उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती.(UP SP Congress Seat Sharing)
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने १११ जागा जिंकल्या होत्या. आता आगामी निवडणुकीपूर्वी जागावाटपाचा तिढा सुटतो का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.(UP SP Congress Seat Sharing)