१६ डिसेंबरला बांगलादेशात परतण्याची शेख हसीना यांची इच्छा

तारिक रहमान सरकारकडे विमान पाठविण्याची मागणी; दिल्लीहून ढाक्याला परतण्यासाठी बिमान बांगलादेशची सेवा वापरणार

    24-Nov-2026
 
Sheikh Hasina Return to Bangladesh
 
नवी दिल्ली, (Sheikh Hasina Return to Bangladesh) :बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी मायदेशात परतण्याबाबत प्रथमच निश्चित तारीख जाहीर केली आहे. येत्या १६ डिसेंबर रोजी बांगलादेशात परतण्याची त्यांची इच्छा असून, त्यासाठी सध्याच्या तारिक रहमान सरकारने विमान पाठवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने हसीना यांचे प्रवक्ते सय्यद मोजम्मेल अली यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
 
हसीना यांना दिल्लीहून ढाका येथे परतण्यासाठी बांगलादेशची सरकारी विमान कंपनी 'बिमान बांगलादेश एअरलाइन्स'च्या विमानाचा वापर करायचा आहे. त्यासाठी सरकारने विमानाची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांच्या प्रवक्त्याने मंगळवारी केली. मात्र, त्यांच्या या मागणीवर बांगलादेश सरकारची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.(Sheikh Hasina Return to Bangladesh)
 
दरम्यान, १६ डिसेंबर हा बांगलादेशच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. १९७१ मध्ये याच दिवशी पाकिस्तानविरुद्धच्या मुक्तिसंग्रामात बांगलादेशने विजय मिळविला होता. पाकिस्तानी लष्कराने भारतीय लष्कर आणि मुक्ती वाहिनीसमोर आत्मसमर्पण केले होते. याच विजयामुळे बांगलादेशच्या स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे हा दिवस बांगलादेशमध्ये विजय दिन म्हणून साजरा केला जातो.
 
ऑगस्ट २०२४ मध्ये बांगलादेशातील सत्ताविरोधी आंदोलनानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन भारतात आश्रय घेतला होता. त्यानंतर त्या भारतात वास्तव्यास आहेत. आता विजय दिनाच्या दिवशी मायदेशी परतण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केल्याने बांगलादेशच्या राजकीय वर्तुळात या घडामोडीला महत्त्व प्राप्त झाले आहे.(Sheikh Hasina Return to Bangladesh)
 
 




संबंधित मजकूर