अतिप्रेमाचे ओझे : मुलांच्या भावनिक विकासापुढील आव्हान

    24-Nov-2026

Overparenting 
 
आजच्या काळात पालकत्व अधिक जागरूकतेने, जबाबदारीने आणि अनेक अपेक्षांच्या दबावाखाली निभावले जात आहे. मुलांच्या संगोपनात कोणतीही चूक होऊ नये, त्यांचे भविष्य सुरक्षित राहावे आणि त्यांना सर्वोत्तम संधी मिळाव्यात, यासाठी पालक सतत प्रयत्नशील असतात. अशा वातावरणात अतिसंरक्षणात्मक पालकत्व (Overparenting) ही प्रवृत्ती अधिक दिसून येत आहे. याला अतिरेकी किंवा अनावश्यक हस्तक्षेप करणारे पालकत्व असेही म्हणता येईल. त्याविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख...
 
अतिसंरक्षणात्मक पालकत्व’ म्हणजे मुलांच्या आयुष्यात पालकांनी अतिशय सक्रियपणे सहभागी होणे आणि त्यांच्या प्रत्येक कृतीवर, निर्णयावर किंवा अडचणीवर सतत लक्ष ठेवणे. या पालकत्वाच्या पद्धतीला ‘हेलिकॉप्टर पॅरेंटिंग’ असेही म्हटले जाते. हेलिकॉप्टरप्रमाणे मुलांच्या भोवती सतत घिरट्या घालत राहणे आणि त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक घडामोडीत हस्तक्षेप करणे, हे या पद्धतीचे वैशिष्ट्य. विशेषतः तारुण्यातून प्रौढत्वाकडे वाटचाल करणार्‍या तरुणांच्या बाबतीत हे अधिक प्रकर्षाने दिसून येते.
 
महत्त्वाचे म्हणजे, अतिसंरक्षणात्मक पालकत्वामागे मुलांच्या भावनिक किंवा मानसिक स्वातंत्र्यावर जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवण्याचा हेतू नसतो. उलट, मुलांचे हित जपणे आणि त्यांना लिष्ट अडचणींपासून वाचवणे, हीच पालकांची प्रामाणिक भावना असते. मात्र, या काळजीपोटी पालक मुलांच्या आयुष्यात गरजेपेक्षा अधिक हस्तक्षेप करतात. त्यांच्या समस्या स्वतःच सोडवणे, त्यांच्यावतीने निर्णय घेणे किंवा प्रत्येक अडचणीत मदतीसाठी पुढे येणे, यामुळे मुलांना स्वतःच्या क्षमतेचा वापर करण्याच्या, निर्णय घेण्याचा आणि स्वतंत्रपणे परिस्थिती हाताळण्याच्या संधी कमी मिळतात. परिणामी, स्वतःच्या गरजा मांडणे, इतरांशी मतभेद सोडवणे, आर्थिक व्यवहार हाताळणे, शैक्षणिक जबाबदार्‍या पार पाडणे आणि दैनंदिन जीवनातील निर्णय घेणे, यांसारखी कौशल्ये विकसित होण्यावर मर्यादा येऊ शकतात. अशा पालकत्वात प्रेम, आपुलकी आणि काळजी भरपूर असली, तरी मुलांच्या वयाला अनुरूप स्वायत्तता आणि स्वावलंबन विकसित होण्यासाठी आवश्यक असलेली संधी आणि अवकाश मात्र कमी पडते.
 
अतिसंरक्षणात्मक पालकत्वाचा परिणाम केवळ घरापुरता किंवा पालक-मुलांच्या नात्यापुरता मर्यादित राहत नाही; त्याचा प्रभाव मुलांच्या शैक्षणिक जीवनावर, कौटुंबिक संबंधांवर आणि पुढे कार्यक्षेत्रातील वर्तनावरही दिसून येऊ शकतो. काही अभ्यासांमध्ये उच्च शिक्षण घेतलेले, दोघेही नोकरी करणारे आणि मुलांच्या शैक्षणिक यशाबद्दल विशेष जागरूक असलेले पालक अतिसंरक्षणात्मक वर्तन करत असल्याचे आढळले आहे. मुलांशी सातत्याने संवाद साधणे आणि त्यांच्या आयुष्यात रस घेणे, हे पालकत्वाचे महत्त्वाचे पैलू असले, तरी त्याचे प्रमाण अतिरेकी झाल्यास मुलांच्या वैयक्तिक अवकाशात हस्तक्षेप होऊ शकतो आणि त्यांच्या स्वावलंबनाच्या विकासावर मर्यादा येऊ शकतात.
 
वैयक्तिक अवकाशाची जाणीव
 
मुलांना वैयक्तिक अवकाशाची जाणीव लहानपणापासूनच करून देणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, कोणाला मिठी मारण्यापूर्वी त्यांची परवानगी घेणे, दुसर्‍यांच्या वस्तूंना हात लावण्यापूर्वी विचारणे आणि एखाद्या मित्राला थोडा वेळ एकटे राहायचे आहे, हे समजून घेणे. अशा छोट्या गोष्टींतून मुलांना इतरांच्या भावना आणि मर्यादांचा आदर करायला शिकता येते. प्रत्येकाला सुरक्षित वाटावे, आपलेपणा अनुभवता यावा आणि आपला आदर केला जात आहे, अशी भावना मिळावी, हे त्यांना समजते.
 
अतिसंरक्षणात्मक वातावरणात वाढणार्‍या ‘जेन-झी’मधील तरुणांना समस्यांचा सामना करणे कठीण जाऊ शकते. काही वेळा ते अडचणींना सामोरे जाण्याऐवजी त्यापासून दूर राहण्याचा किंवा भावनिकदृष्ट्या माघार घेण्याचा प्रयत्न करतात. स्वतःच्या क्षमतेबद्दल अवास्तव कल्पना किंवा स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजण्याची प्रवृत्तीही काही तरुणांमध्ये दिसून येऊ शकते. याशिवाय, चिंता, मानसिक ताण आणि नैराश्याची लक्षणे अधिक प्रमाणात आढळण्याची शयता काही संशोधनांतून व्यक्त झाली आहे. अतिसंरक्षणामुळे निर्माण होणारी असुरक्षितता आणि सततची काळजी यांचाही तरुणांच्या मानसिक ताणाशी संबंध असल्याचे आढळले आहे.
 
काही संशोधनांत अतिसंरक्षणात्मक पालकत्वाचा संबंध व्यसनकारक पदार्थांच्या वापरासह मानसिक आणि शारीरिक आरोग्याशी निगडित समस्यांशीही जोडला गेला आहे. अशा पालकत्वाचा अनुभव घेतलेल्या तरुणांमध्ये नैराश्याची लक्षणे अधिक आढळणे, वेदनाशामक औषधांचा गैरवापर होणे आणि नैराश्यावरील औषधोपचार घेण्याचे प्रमाण तुलनेने जास्त असणे, असे निष्कर्ष नोंदवले गेले आहेत. अर्थात, यावरून अतिसंरक्षणात्मक पालकत्व हेच या समस्यांचे थेट कारण आहे, असे म्हणता येणार नाही. मात्र, या दोन्हींमधील आढळलेला संबंध दुर्लक्षित करता येणार नाही.
 
समस्या सोडवण्याची क्षमता आणि मानसिक लवचिकता
 
अतिसंरक्षणात्मक पालकत्वाचा मुलांच्या विकासावर होणारा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे, त्यांच्या समस्या सोडवण्याच्या क्षमतेवर येणारी मर्यादा. पालक प्रत्येक अडचणीत हस्तक्षेप करून मुलांच्या समस्या स्वतःच सोडवू लागले, तर मुलांना स्वतः प्रयत्न करून अनुभवातून शिकण्याच्या संधी कमी मिळतात. प्रत्यक्षात, प्रयत्न करणे, चुका होणे, त्यातून मार्ग शोधणे आणि पुन्हा नव्याने प्रयत्न करणे या प्रक्रियेतूनच समस्या सोडवण्याची क्षमता, परिस्थितीशी जुळवून घेण्याची वृत्ती आणि मानसिक लवचिकता (Resilience) विकसित होत असते.
 
मुलांना अपयशापासून सतत दूर ठेवले, तर त्यांना तात्पुरता दिलासा मिळू शकतो; मात्र त्यामुळे दीर्घकालीन विकासाला मर्यादा येऊ शकतात. चुका होण्याच्या भीतीने मुले नवीन गोष्टी करून पाहण्यास किंवा आव्हाने स्वीकारण्यास कचरू शकतात. परिणामी, त्यांच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक विकासावर परिणाम होऊ शकतो. तसेच, प्रत्यक्ष जीवनातील अडचणी आणि आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जाणेही त्यांना कठीण जाऊ शकते. मुलांना समस्या सोडवताना अपयश मिळून निराश व्हायची संधी मिळायला हवी आणि त्यातून बाहेर कसे यायचे, हेही समजायला हवे.
 
सामाजिक आणि वर्तनात्मक परिणाम
 
अतिसंरक्षणात्मक पालकत्वाचा मुलांच्या सामाजिक विकासावरही परिणाम होऊ शकतो. पालकांच्या सततच्या देखरेखीखाली वाढणार्‍या मुलांना समवयस्कांशी संवाद साधताना अडचणी येऊ शकतात. इतरांशी वाटाघाटी करणे, तडजोड करणे, मतभेद हाताळणे आणि संघर्ष स्वतः सोडवणे यांचा पुरेसा अनुभव त्यांना मिळत नाही. त्यामुळे सामाजिक परिस्थितींमध्ये आत्मविश्वास कमी पडू शकतो आणि परस्पर आदर व समतोलावर आधारित नाती निर्माण करणे कठीण जाऊ शकते.
 
काही मुले या अतिहस्तक्षेपाला विरोध करून प्रतिक्रिया देऊ शकतात. वय वाढत असताना त्यांना पालकांचे नियंत्रण जाचक वाटू लागते. त्यातून चिडचिड, निराशा किंवा बंडखोरी निर्माण होऊ शकते. परिणामी, पालक आणि मुलांमधील नात्यात जवळीक वाढण्याऐवजी तणाव आणि संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असते.
 
मुलांमध्ये स्वावलंबन विकसित करणे
 
पालकांनी नियंत्रकाची भूमिका घेण्याऐवजी मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारणे अधिक उपयुक्त ठरते. याचा अर्थ पालकांनी मुलांना आधार देणे थांबवावे असा नाही; तर तो आधार देण्याची पद्धत बदलावी, असा आहे. मुलांना प्रत्येक प्रश्नाचे थेट उत्तर देण्याऐवजी त्यांना विचार करायला प्रवृत्त करणे, पर्याय सुचवणे आणि आवश्यक तेव्हा भावनिक आधार देणे महत्त्वाचे आहे. अशा पद्धतीमुळे मुलांमध्ये आत्मविश्वास, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास (Self-efficacy) आणि मानसिक लवचिकता विकसित होण्यास मदत होते.
 
मुलांना सुरक्षित ठेवणे आणि त्यांना जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम बनवणे, या दोन्ही गोष्टी तितयाच महत्त्वाच्या आहेत. मुलांच्या प्रत्येक समस्येचे निराकरण पालकांनी स्वतः करण्याऐवजी, त्यांना स्वतः मार्ग शोधण्याची संधी देणे अधिक उपयुक्त ठरते. कारण मुलांच्या विकासासाठी पालकांची उपस्थिती आवश्यक असली, तरी प्रत्येक पावलावर त्यांचा हस्तक्षेप आवश्यक नसतो.
 
लेखिका- डॉ. शुभांगी पारकर




संबंधित मजकूर