मुंबईतील उद्यानांना सीसीटीव्हीचे सुरक्षा कवच मिळणार

कुर्ला मारहाण प्रकरणानंतर महापालिकेचा निर्णय; ४,०९६ सुरक्षा रक्षकांच्या मंजूर पदांपैकी २,३७९ पदे रिक्त

    24-Nov-2026

Mumbai Park CCTV Security
 
मुंबई, (Mumbai Park CCTV Security) : कुर्ला पश्चिम येथील कै. प्रमोद महाजन उद्यानात तरुण जोडप्याला झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर मुंबईतील सार्वजनिक उद्यानांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने शहरातील आवश्यक त्या सर्व उद्यानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची योजना आखली आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांच्या मंजूर पदांपैकी निम्म्याहून अधिक पदे रिक्त असल्याची बाबही समोर आली आहे. एकूण ४,०९६ मंजूर पदांपैकी तब्बल २,३७९ पदे रिक्त आहेत.
 
फिनिक्स मार्केटसिटी मॉललगतच्या प्रमोद महाजन उद्यानात २० नोव्हेंबर रोजी अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने २२ वर्षीय तरुण आणि त्याच्या २१ वर्षीय मैत्रिणीला काठ्यांनी तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर उद्यानांमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले.(Mumbai Park CCTV Security)
 
महापालिकेच्या बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षा हेतल गाला यांनी प्रशासनाच्या दिरंगाईवर नाराजी व्यक्त केली आहे. २४ मार्च २०२६ रोजीच सर्व उद्याने, मनोरंजन मैदाने आणि क्रीडांगणांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. या कॅमेऱ्यांची जोडणी स्थानिक पोलीस ठाणे आणि महापालिका विभाग कार्यालयांशी करण्याची सूचनाही केली होती. मात्र, आठ महिने उलटूनही प्रस्तावाला गती मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. उद्यानांमध्ये प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याची मागणीही त्यांनी केली.
 
दरम्यान, उद्यानाच्या देखभालीचे कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराला महापालिकेने एक लाख रुपयांचा दंड ठोठावला असून, कथित निष्काळजीपणाबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच उद्यानामागील मदरशाच्या बांधकामाची तपासणी करण्यासाठी एल विभाग कार्यालयाने नोटीस दिली आहे.(Mumbai Park CCTV Security)
 
महापालिकेतील सभागृह नेते गणेश खणकर यांनी उद्यानांमधील सुरक्षा गेट आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत बैठक झाल्याचे सांगितले. लवकरच या कामाला सुरुवात होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.(Mumbai Park CCTV Security)
 




संबंधित मजकूर