सुख म्हणजे नक्की काय असतं?

    24-Nov-2026   

Madhura Patange
 
प्रत्येक परिस्थितीमध्ये समाधानी राहणार्‍या, नव्हे प्रत्येक परिस्थितीवर समाधान शोधणार्‍या कुटुंबवत्सल समाजशील मधुरा रमेश पतंगे यांच्या समाधानी जगण्याचा मागोवा घेणारा हा लेख...
 
मधुरा यांच्या लेकीचे लग्न होते. वस्तू बांधण्यासाठी सुतळी हव्या होत्या. ज्याला सुतळी आणायला सांगितल्या, त्याने भारंभार सुतळी आणल्या. या सुतळींचे करायचे काय? त्यांनी या सुतळीपासून लॉण्ड्री बॅग बनवली! त्यांच्या घरी गेले की मातीचे सुबक आकारातले पशु-पक्षी, आकाशकंदील, टेबल-मॅट, टी-कोस्टर, वॉल-हँगिग, तोरण, लोकरीच्या रांगोळ्या, पडदे, सोफा कव्हर आणि अशाच अनेक वस्तू लक्ष वेधून घेतात. त्यातली आकर्षक रंगसजावट, कमालीची कुशलता पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. त्यांनी कसलेही प्रशिक्षण न घेता, आवड म्हणून महिनोन्महिने खर्च करत केलेल्या या सगळ्या वस्तू. या वस्तूंचे त्या काय करतात, तर अशा वस्तू बनवून विक्रीस ठेवणार्‍या महिलांना नमुना म्हणून या वस्तू देतात. या नमुन्यांवरून त्या महिला वस्तू बनवून नफा मिळवतात. मधुरा यांना यातून काय मिळते? तर त्यांचे म्हणणे, "महिलांना थोडा जरी फायदा झाला, तरी मला समाधान वाटते.” काही वस्तू त्या गरजवंताला किंवा घरी आलेल्या पै-पाहुण्यांना सहज भेट म्हणून देतात. हे सगळे करताना त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद आणि समाधान पाहण्यासारखे असते. या मधुरा म्हणजे, मधुरा रमेश पतंगे!
 
मधुरा यांचे पती रमेश पतंगे हे विचारवंत साहित्यिक आणि संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक. स्वयंसेवक म्हटले की, घरी संघस्वयंसेवकांचा राबता, समाजशील माणसांची वर्दळ. या अशा प्रसंगात घरी येणार्‍या प्रत्येकाचे हसतमुखाने स्वागत करून, येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला आईच्या मायेने आग्रह करून खाऊ घालणे, हे करताना मधुरा यांच्या चेहर्‍यावर नेहमीच समाधान आणि हसू फुलताना पाहिले आहे. अन्नपूर्णाच जणू! या पार्श्वभूमीवर ‘मी माझ्या आवडीने कुटुंबाच्या जबाबदार्‍या स्वीकारते,’ असे म्हणणार्‍याही मातृशक्ती आपल्या आजूबाजूला आहेतच. मात्र, मधुरा यांचे वेगळेपण म्हणजे त्यासुद्धा त्यांचे कुटुंब, त्यांची नाती-गोती सांभाळतात, त्यांच्यासाठी जगतात, त्यात त्यांना आनंदही वाटतो. पण, असे जरी असले, तरी त्यांनी त्यांचे अस्तित्व कायम जिवंत ठेवले आहे. आपल्याला कशात गती आहे, हे समजून घेत, त्यांनी स्वतःची आवड जपली. सर्जनशीलतेच्या कलाकुसरीच्या कामाची त्यांना लहाणपणापासूच आवड. ती आवड त्यांनी माहेरी-सासरी जपली.
 
ती आतली आवड, ती आतली जिज्ञासा आणि सर्जनशीलता मधुरा यांना स्वस्थ बसू देत नव्हती. ही आवड व्यावसायिक नव्हती, तर निव्वळ मनाला समाधान देणारी होती. त्यामुळेच मुलींच्या अभ्यासाचे टेबल असू दे की घरातल्या पाण्याची टाकी असू दे, त्यांचे सुतारकाम आणि प्लम्बिंगचे कामही हौसेने मधुरा यांनी केले आहे. बरं, प्लम्बर किंवा सुतार यांना पैसे देऊन काम करायला लावायची आर्थिक कुवत होतीच. पण आपण हे करायला हवे; नव्हे, आपण हे करूच शकतो, याचा आत्मविश्वास त्यांच्यात होता. या सगळ्याचे त्यांनी काही पद्धतशीर प्रशिक्षण घेतलेले नाही. पण, तरीही मोजमाप आणि कुशलता यांमध्ये मधुरा यांची एक इंचाचीही चूक होत नाही. हे सगळेे कुठून आले? तर, कला-कौशल्याचे बाळकडू मधुरा यांना आईकडून मिळाले. त्यांच्या जीवनाचा मागोवा घेऊ.
 
मधुरा पतंगे माहेरच्या मंगला वडनगरे. शंकरराव आणि पार्वती वडनगरे हे दाम्पत्य मूळचे धुळ्याचे. शंकरराव प्लॉट विकणे आणि तत्सम व्यवसाय करायचे, तर पार्वतीबाई अत्यंत सद्गुणी गृहिणी. उभयतांना सहा अपत्ये. त्यांपैकी एक मंगला. कामानिमित्त वडनगरे कुटुंब धुळ्यातून नाशिक आणि पुढे छत्रपती संभाजीनगरामध्ये स्थायिक झाले. निम्न मध्यमवर्गीय कुटुंबासारखेच घरचे वातावरण. पार्वतीबाई नेहमी मुलांना सांगायच्या की, "आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहायचे.” त्यामुळे प्रत्येक परिस्थितीला हसतमुखाने तोंड देण्याचे बाळकडू मंगला यांना लहाणपणापासूनच मिळाले. पुढे पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांचा विवाह रमेश पतंगे या अत्यंत ध्येयशील व्यक्तीशी झाला.
 
छत्रपती संभाजीनगरमध्ये ऐसपैस घर आणि अंगण. मात्र, सासरी मुंबईत अंधेरीतल्या चाळीत राहावे लागणार होते. पण, मधुरा यांना याचे अजिबात वैषम्य वाटले नाही. कारण आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहावे, ही त्यांच्या मनाला लागलेली सवय. तसेच पतंगे कुटुंबानेही मधुरा यांना सून म्हणून नाही, तर लेक म्हणूनच वागवले. पती रमेश यांनीही मधुरा यांच्या अंतरंगातल्या संवेदनशील, सर्जनशीलतेला खुंटू दिले नाही. मधुरा यांच्या कला-कौशल्याचा सन्मानच केला. असो. मुलुंड, मुंबईत निवास असणार्‍या मधुरा यांचा अनेक सामाजिक संस्था आणि समाजशील कर्तृत्ववान व्यक्तींशी कळत-नकळत संपर्क येतच असतो. या सगळ्या सज्जनशक्तीच्या कार्याला मधुरा आईच्या मायेने स्नेह, प्रोत्साहनपर बळ देतात. सुख म्हणजे नक्की काय असतं, असे विचारले जाते, तर त्याचे उत्तर आहे, मधुरा पतंगे यांच्यासारखे जगणे! कुटुंबासाठी जगताना, त्यांच्या आवडी-निवडी जपताना स्वतःच्याही आवडी-निवडी जपत, कुशलतेेने जगता येणे, कर्तृत्ववान पतीची सावली बनूनही स्वतःचे अस्तित्व फुलवणे, हे म्हणजेही सुखच होय! त्यामुळेच मधुरा यांच्यासारख्या मातृशक्तीच्या विचारस्नेहाला वंदन!
 




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर