मुंबई, (Kurla Couple Assault Case) : कुर्ला येथील उद्यानात तरुण जोडप्याला अल्पवयीन मुलांनी केलेल्या मारहाणीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई महापालिकेने उद्यानालगत असलेल्या मदरशाच्या बांधकामाची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या एल विभाग कार्यालयाने २३ नोव्हेंबर रोजी मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ४८८ अंतर्गत मदरशाला नोटीस बजावली आहे. त्यानुसार २५ नोव्हेंबर रोजी किंवा त्यानंतरच्या पुढील कामकाजाच्या दिवशी महापालिकेचे अधिकारी संबंधित ठिकाणी भेट देऊन बांधकामाची पाहणी व मोजमाप करणार आहेत.
तपासणीच्या वेळी बांधकाम अधिकृत असल्याचे सिद्ध करण्यासाठी मंजूर मूळ बांधकाम आराखडा, भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) आणि अन्य आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत. महापालिकेच्या या कारवाईमुळे मदरशाच्या बांधकामाच्या वैधतेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.(Kurla Couple Assault Case)
दरम्यान, महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने या घटनेची स्वतःहून दखल घेत मुंबई महापालिका आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्तांना नोटीस बजावली आहे. जोडप्याच्या मानवी हक्कांचे संरक्षण करण्यात दोन्ही यंत्रणांकडून प्राथमिकदृष्ट्या निष्काळजीपणा झाल्याचे निरीक्षण आयोगाने नोंदवले आहे. उद्यानात घटनेच्या वेळी कोणत्या प्रकारची सुरक्षा व्यवस्था होती, यासह सविस्तर अहवाल तीन आठवड्यांत सादर करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.
२० नोव्हेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास कुर्ला पश्चिम येथील फिनिक्स मार्केटसिटी मॉललगतच्या कै. प्रमोद महाजन उद्यानात हे जोडपे गेले होते. त्यावेळी सात ते आठ अल्पवयीन मुलांनी त्यांना शिवीगाळ करून हॉकी स्टिक, लाकडी बांबू तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी आठ विधिसंघर्षग्रस्त बालकांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. या आठही बालकांना ताब्यात घेऊन निरीक्षणगृहात पाठविण्यात आले आहे.(Kurla Couple Assault Case)