राष्ट्रसामर्थ्याची जागतिक प्रतिष्ठा

    24-Nov-2026

India
 
एखाद्या राष्ट्राचे सामर्थ्य कशात आहेे, हा प्रश्न राजकीय नसून तो ऐतिहासिक आणि आर्थिकही आहे. राष्ट्र मोठे असल्याने ते सामर्थ्यशाली ठरत नाही. संपत्ती असूनही ज्या राष्ट्राला आपले हित जपता येत नाही, त्या संपत्तीचा उपयोगच काय? राष्ट्राच्या सामर्थ्याचा निर्णय त्याकडच्या साधनांवरून होत असला, तरी या बळावर इतरांवर त्याचा किती परिणाम घडवता येतो, यावरच त्याची प्रतिष्ठा ठरते. याच कसोटीवर ‘लोवी इन्स्टिट्यूट’ने प्रसिद्ध केलेला ‘एशिया पॉवर इंडेस २०२६’ हा अहवाल महत्त्वाचाच!
 
या निर्देशांकात भारताने १०० पैकी ४०.५ गुण प्राप्त करून, आशियातील तिसरे स्थान कायम राखले. अमेरिका ७८.९ गुणांसह प्रथम आणि चीन ७३.६ गुणांसह द्वितीय स्थानावर आहे. परंतु, यातील अधिक महत्त्वाची बाब म्हणजे २०१८ पासून, भारत आणि चीन यांच्यातील सामर्थ्याचे अंतर यंदा सर्वाधिक घटले आहे. यावर्षी भारताने आशियातील एक प्रमुख सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून, आपले स्थान अधिक दृढ केले. भारताचा प्रादेशिक प्रभावही वाढल्याचेही यातून स्पष्ट झाले. आर्थिक क्षमता, लष्करी सामर्थ्य, राजनैतिक संबंध, सांस्कृतिक प्रभाव आणि भविष्यातील संसाधने या निकषांवर केलेले हे मूल्यमापन, भारताची प्रगती दर्शवते. या अहवालात राष्ट्रांच्या सामर्थ्याची वर्गवारी करताना, ७० पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या देशांना ‘महाशक्ती’ म्हटले. ४० पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या देशांना ‘प्रमुख शक्ती’, तर त्याखालील देशांची वर्गवारी ‘मध्यम’ आणि ‘निम्न’ अशी केली आहे. यामध्ये एकमेव भारताचाच समावेश ‘प्रमुख शक्ती’ म्हणून झाला आहे.
 
याचे कारण शोधताना, २०१४ नंतरच्या भारताच्या राजकीय भूमिकेचा विचार करणे अपरिहार्यच. स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेच्या नियंत्रणातून मुक्त होणे नाही. आपल्या हिताचा निर्णय दुसर्‍याच्या इच्छेवर अवलंबून न ठेवणे, हे स्वातंत्र्याचे महत्त्वाचे लक्षण. या दृष्टीने भारताची कामगिरी उल्लेखनीयच. अमेरिका आणि रशियाशी संबंध ठेवताना, चीनच्या विस्तारवादाला विरोध करताना आणि पश्चिम आशियातील राष्ट्रांशी व्यवहार करताना, भारताने कोणाचेही अंधानुकरण केले नाही. भारताच्या निर्णयाचे अधिष्ठान परकीय अपेक्षा नसून, ‘राष्ट्रहित सर्वतोपरि’ हेच आहे.
 
आंतरराष्ट्रीय संबंधांत ज्या राष्ट्राची उपेक्षा करणे इतरांना परवडत नाही, त्याचे महत्त्व आपोआपच वाढते. भारताच्या बाबतीत आज हेच घडत आहे. भारतीय बाजारपेठ, मनुष्यबळ, तंत्रज्ञान क्षमता, भौगोलिक स्थान आणि लष्करी सामर्थ्याची सांगड त्याच्या राजनैतिक भूमिकेशी जोडली आहे. याबाबत ‘लोवी इन्स्टिट्यूट’चे निरीक्षण विशेष महत्त्वाचेच. आशियाई राष्ट्रांच्या व्यापारी संबंधांमध्ये कमकुवतपणा दिसत असताना, भारताचे आर्थिक संबंध मात्र स्थिर राहिले. आर्थिक संबंधांतील हे सातत्य, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत भारताबाबतचा विश्वासाचे निदर्शक. ‘जी-२०’चे अध्यक्षपद, क्वाडमधील सहभाग आणि ग्लोबल साऊथ राष्ट्रांच्या प्रश्नांना दिलेले महत्त्व यामुळे, भारताकडे केवळ स्वतःच्याच समस्या मांडणारे राष्ट्र म्हणून आता जग पाहत नाही.
 
संरक्षण क्षेत्रातील प्रगती याच परिवर्तनाची आणखी एक साक्ष. या क्षेत्रात भारताने आत्मनिर्भरता आणि निर्यातीच्या दिशेने वाटचाल केली. ‘ब्रह्मोस’ची आग्नेय आशियाई राष्ट्रांना केलेली विक्री आणि त्यांच्याबरोबरच्या वाढत्या संरक्षण सहकार्यामुळे भारताचे संरक्षण संबंध अधिकच दृढ झाले. ‘लोवी’च्या अहवालात भारताच्या संरक्षण नेटवर्कमध्ये २.१ गुणांची वाढ नोंदवली गेली आहे. राजनैतिक प्रभावाच्या बाबतीत तर, तज्ज्ञांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शी जिनपिंग यांच्यानंतर आशियातील दुसरे सर्वाधिक प्रभावी प्रादेशिक नेते मानले आहे.
 
या सर्वांचा विचार केल्यास एक गोष्ट निर्विवादपणे स्पष्ट होते. भारताचे महत्त्व आता केवळ प्राचीन संस्कृती, विशाल लोकसंख्या अथवा भौगोलिक स्थानापुरते राहिलेले नाही. त्या सर्व घटकांना आधुनिक आर्थिक, लष्करी आणि राजकीय सामर्थ्याचीही जोड मिळाली आहे. इतिहासात राष्ट्रांना प्रतिष्ठा मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला. भारताच्या बाबतीतही हा नियम वेगळा नाही. परंतु, गेल्या १२ वर्षांत भारताने आपल्या सामर्थ्याचा परिचय जगाला करून दिला आहे. ज्या राष्ट्राच्या मताची दखल घेणे जागतिक सत्तांना आवश्यक वाटते, त्याच राष्ट्राने सामर्थ्याची प्रतिष्ठा प्रस्थापित केलेली असते. भारताच्या आजच्या स्थानाचा अर्थ हाच आहे.
 
 लेखक- कौस्तुभ वीरकर




संबंधित मजकूर