अमेरिकेच्या दृष्टीने दहशतवादाची व्याख्या नेमकी काय? हा प्रश्न, पन्नू प्रकरणात भारताच्या अधिकार्यांना बजावलेल्या समन्सने पुन्हा ऐरणीवर आणला. भारतविरोधी कारवाया करणार्या खलिस्तानी अतिरेक्याच्या आरोपांना अमेरिकेत न्यायालयीन प्रतिष्ठा मिळत असेल, तर अमेरिकेच्या दहशतवादविरोधी लढ्याच्या प्रामाणिकपणाची चिकित्सा अपरिहार्य ठरते.
खलिस्तानी अतिरेकी गुरपतवंतसिंह पन्नू याने अमेरिकेतील न्यायालयात, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि ‘रॉ’चे माजी प्रमुख सामंत गोयल यांच्याविरुद्ध खटला दाखल केला आहे. त्या खटल्याच्या अंतर्गत संबंधित अमेरिकन न्यायालयाने डोवल आणि गोयल या दोघांवर ‘समन्स’ बजाविले. पण, भारत सरकारच्या परराष्ट्र खात्याने अमेरिकी न्यायालयाने पाठविलेले ‘समन्स’ बिनबुडाचे असल्याचे सांगून, ते फेटाळून लावले. अमेरिकन न्यायालयाने या आधीही असे ‘समन्स’ पाठविले होते. पण, तेही फेटाळण्यात आले होते. दि. २१ नोव्हेंबर रोजी परराष्ट्र खात्याने, डोवाल आणि गोयल यांच्यावर गुरपतवंतसिंह पन्नू याने ‘समन्स’च्या माध्यमातून जे आरोप केले, तेही फेटाळून लावले आहेत. ‘रॉ’च्या मदतीने डोवल यांनी आपली हत्या करण्याचा कट रचला होता, असा आरोप पन्नू याने केला आहे.
कोण हा गुरपतवंतसिंह पन्नू? भारताच्या लेखी हा कुप्रसिद्ध खलिस्तानी अतिरेकी! खलिस्तानी चळवळीचा कट्टर समर्थक! त्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करणारा. काही वर्षांपूर्वी दिल्लीच्या सीमांवर जेव्हा शेतकर्यांचे आंदोलन झाले होते, त्यावेळी याच पन्नू याने दिल्लीच्या लाल किल्ल्यावर जो खलिस्तानी निशाण फडकावेल, त्यास प्रचंड इनाम देण्यात येईल, अशी घोषणाही केली होती. असा हा पन्नू कट्टर भारतविरोधी. तो खटला दाखल करतो आणि त्याआधारे अमेरिकन न्यायालय ‘समन्स’ बजावते.
दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारल्याचे घोषित करणारी अमेरिका या गुरपतवंतसिंह पन्नू याच्यावर कारवाई तर करत नाहीच, उलट त्यास भारताच्या दोन ज्येष्ठ अधिकार्यांविरुद्ध खटला दाखल करण्यास अनुमती देते. तेथील न्यायालय ‘समन्स’ही बजावते. सगळेच अजब! कुख्यात अतिरेयांच्या यादीत या गुरपतवंतसिंह पन्नू याचे नाव आहे. अमेरिकेलाही ते माहीत आहे. पण, त्याच्याविरुद्ध काहीही कारवाई करायची नाही. अशा वेळी अमेरिकेला व्यक्तिस्वातंत्र्य वगैरे आठवते.
अमेरिकन न्यायालयाने प्रथम भारतातील जिल्हा न्यायालयांद्वारे संबंधित ‘समन्स’ बजाविण्याचा प्रयत्न केला. त्यासंदर्भात परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता, "असे निरर्थक, बिनबुडाचे खटले आम्ही फेटाळून लावतो,” असे त्यांनी स्पष्ट केले. वॉशिंग्टन येथील भारतीय दूतावासामार्फत सदर ‘समन्स’ पाठविण्याचा प्रयत्न, संबंधित अमेरिकी न्यायालयाने करून पाहिला. भारतात अशी कायदेशीर कागदपत्रे पाठवायची असल्यास, ‘हेग’ करारानुसार ती संबंधित देशातील कायदा मंत्रालयाद्वारेच पाठविणे आवश्यक असते. पण, त्या सर्व तरतुदी बाजूला ठेऊन अमेरिकन न्यायालयाने ‘समन्स’ बजावले. भारत अशी ‘समन्स’ थोडीच स्वीकारणार? तेही एका कुप्रसिद्ध खलिस्तानी अतिरेयाने दाखल केलेल्या खटल्याशी संबंधित? अशक्यच!
भारताने तोच कणखर बाणा दाखविला आणि सदर खटलाच बिनबुडाचा असल्याचे स्पष्ट करून, ती ‘समन्स’च साफ फेटाळून लावली. अमेरिकेची भूमिका नेहमीच दुटप्पी राहिली आहे. जेव्हा एखादी बाब त्यांच्या हिताची असते, त्यावेळी सर्व कायदे धाब्यावर बसवून अमेरिकेकडून कृती केली जाते. अलीकडील इराण युद्धाच्यावेळी ते सर्व जगास दिसून आले आहेच. त्यामुळे डोवल आणि गोयल यांच्याविरुद्धची ‘समन्स’ फेटाळून लावून, आम्हीही काही कमी नाही, हे भारताने दाखवून दिले आहे.
नवीनबाबूंच्या विदेशवार्यांची चौकशी
ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी २०२२ आणि २०२४ यादरम्यान जे विदेशदौरे केले, त्यांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी दिले आहेत. नवीनबाबू, माजी भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी व्ही. के. पांडियन आणि भारतीय पोलीस सेवा अधिकारी रवी कांत यांनी केलेल्या कथित खर्चात अनियमितता असल्याचे आरोप लक्षात घेऊन, चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख सचिव या सर्व गैरव्यवहारांची चौकशी करणार आहेत. चौकशीत प्रामुख्याने जपान आणि इटलीला दिलेल्या भेटीच्या वेळी झालेल्या खर्चावर लक्ष केंद्रित केले जाईल. माहितीच्या अधिकारात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या खर्चासंदर्भात विचारणा केली होती. या विदेशदौर्यांच्या तपशिलाची माहिती जाणूनबुजून गुप्त ठेवण्यात आली होती. या विदेशप्रवासाबाबत झालेले आरोप लक्षात घेऊन नेमके सत्य काय आहे, याचा शोध घेण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले.
जून २०२२ मध्ये नवीनबाबू आणि अन्य दोघे ११ दिवसांच्या दुबई आणि इटलीच्या दौर्यावर गेले होते. या दौर्यादरम्यान नवीन पटनायक रोममध्ये आयोजित, जागतिक अन्नधान्य कार्यक्रमांतर्गत आयोजित समारंभास उपस्थितही होते. व्हॅटिकनमध्ये त्यांनी पोप फ्रान्सिस यांचीही भेट घेतली होती. दुबईमध्ये ते गुंतवणूकदारांसमवेत आयोजित बैठकीतही सहभागी झाले. २०२३ मध्ये उद्योजकांचे शिष्टमंडळ घेऊन पटनायक जपान आणि सिंगापूरच्या दौर्यावर गेले. पटनायक आणि त्यांच्यासमवेत गेलेल्या दोन अधिकार्यांच्या विदेशयात्रेत, वारेमाप खर्च झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे आरोप लक्षात घेऊनच ही चौकशी होणार आहे. आपण मुख्यमंत्रिपदावर असलो की आपल्याला कसेही वागण्याचा, कसाही खर्च करण्याचा अधिकार आहे, अशा भ्रमात असलेल्या नवीन पटनायक आणि त्यांच्यासमवेत विदेशात गेलेल्या दोघा प्रशासकीय सेवेतील अधिकार्यांना आता चौकशीस सामोरे जावे लागणार आहे. आपल्या पक्षासच सदासर्वकाळ सत्ता मिळणार असल्याचे समजून चाललेल्या नवीन पटनायक आणि त्यांच्या बिजू जनता दलास, मतदारांनी सत्तेवरून खाली उतरविले. आता त्यांच्या सत्ताकाळात झालेले एकेक गैरव्यवहार बाहेर येऊ लागले आहेत. विदेशदौर्याची चौकशी हा त्याचाच एक भाग म्हणावा लागेल!
बालीमधील गणेशमूर्ती गिनेज रेकॉर्डमध्ये!
इंडोनेशियातील बाली बेटावर अजून हिंदू संस्कृती उत्तम प्रकारे नांदत आहे. त्या बेटावर असलेल्या हिंदू समाजाकडून, विविध सणवार पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. कित्येक शतकांपासून तेथील हिंदू समाजाने ही संस्कृती जोपासली आहे. अलीकडेच त्या बेटावरील १२६ शिल्पकारांनी परंपरागत शिल्पकलेचा वापर करून, ५० फूट उंचीची एक भव्य गणेशमूर्ती साकारली. आता या भव्य गणेशमूर्तीचा समावेश ‘गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये करण्यात आला आहे. ही गणेशमूर्ती तेगाल्लालंग, गियानयार येथील अलास हरुम बाली येथे उभारण्यात आली. ही भव्य गणेशमूर्ती बाली बेटास भेट देणार्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. बाली बेटावरील जनतेला भगवान गणेशाचे जे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व वाटते, तेच या भव्य मूर्तीवरून प्रतीत होते. ‘गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ने दि. ४ ऑगस्ट २०२६ या दिवशी, या विक्रमी कलाकृतीची आपल्या लेखी नोंद केली. या भव्य गणेशमूर्तीचे लोकार्पण दि. २५ ऑटोबर २०२६ या दिवशी झाले होते.
या भव्य गणेशमूर्तीमुळे बालीतील शिल्पकला आणि तेथील वैशिष्ट्यपूर्ण हिंदू संस्कृती याकडे जगाचे लक्ष वेधले गेले. या गणेशमूर्तीची उंची, तिची उभारणी आणि त्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य या आधारावरच, या मूर्तीचा ‘गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये समावेश करण्यात आला. ही गणेशमूर्ती बाली बेटावरील १२६ कलाकारांनी निर्माण केली. परंपरागत कला आणि आधुनिकता यांची सांगड घालून, या मूर्तीची निर्मिती करण्यात आली. भारतातील इंडोनेशियन वकिलातीनेही, समाजमाध्यमांवर ‘विद्येची देवता’ असलेल्या या गणेशमूर्तीची माहिती दिली. बाली बेटावर अनेक हिंदू मंदिरे आहेत. या मंदिरांभोवती बालीतील जनतेचे सांस्कृतिक जीवन गुंफले आहे. बालीमधील जनतेच्या जीवनात ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या ग्रंथाना तेवढेच अनन्य महत्त्व. ‘रामायण’, ‘महाभारत’ यांतील कथांवर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रम तेथील जनतेकडून, विविध प्रसंगी सादर केले जातात. बालीमधील जनतेने कित्येक शतकांपासून आपली संस्कृती जपून ठेवली आहे. त्याच संस्कृतीचे दर्शन घेण्यासाठी शक्य असेल, त्यांनी बाली बेटास अवश्य भेट द्यायला हवी!