नेपाळी मैत्रीचा नवा अध्याय

    24-Nov-2026

India-Nepal Relations
 
शेजारी देशांशी सलोख्याचे संबंध असणे, ही कोणत्याही देशासाठी अत्यावश्यक. भारताचे सगळेच शेजारी भारताशी मित्रत्त्वाचे संबंध ठेवून नाहीत. याला अपवाद नेपाळचा. कारण, तेथे हिंदू धर्मीय बहुसंख्य असून, नेपाळशी भारताचे प्राचीन काळापासून सांस्कृतिक संबंध आहेत. यंदाच्या पुरानंतर पंतप्रधान बालेंद्र शाह यांनाही भारताबरोबरच्या मैत्रीचे महत्त्व पटले आहे.
 
मैत्री ही फक्त व्यक्तींमध्येच असते असे नाही, तर दोन देशांमध्येही असू शकते. भारताच्या दृष्टीने नेपाळचे स्थान अन्य कोणत्याही शेजारी देशापेक्षा अधिक महत्त्वाचे. नेपाळ हे एकेकाळी जगातील एकमेव अधिकृत हिंदूराष्ट्र होते. हिंदूंची बहुसंख्या असलेला हा जगातील केवळ दुसरा देश. नेपाळशी भारताचे सांस्कृतिक संबंध प्राचीन आणि गहिरे आहेत. नेपाळमधील गुरखा समाजाचे तरुण भारतीय लष्करात जवान म्हणून नोकरी करू शकतात. नेपाळमध्ये भारतीय चलन सामान्यपणे स्वीकारले जाते. असे असले, तरी भारताने नेपाळला कधीच मांडलिक राष्ट्रासारखे वागविले नाही. शिवाय, त्याच्या सार्वभौमत्वाचाही नेहमीच आदर केला. आता नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह हे रविवारी भारतभेटीवर आले होते. त्यांच्या या भेटीमुळे दोन्ही देशांच्या मैत्रीसंबंधांना अधिक दृढता लाभेल, असे दिसते.
 
गतवर्षी नेपाळमध्ये उसळलेल्या हिंसक क्रांतीनंतर नेपाळमध्ये सत्ताबदल झाला. तेथे रीतसर निवडणूक होऊन नवे सरकार सत्तेवर आले. तेव्हा काठमांडूचे महापौर असलेल्या बालेंद्र शाह यांनी, पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर बालेंद्र यांनी पहिल्या परदेशदौर्‍यासाठी भारताचीच निवड केली. अर्थात, सुरुवातीच्या काही दिवसांत बालेंद्र शाह यांनी भारताबरोबरच्या काही वादंगांचा उल्लेख करून, वेगळा सूर लावण्याचा प्रयत्न केला होता. पण, यंदा तेथे आलेल्या भीषण महापुरानंतर भारताने केलेल्या सढळ मदतीमुळे त्यांना भारताबरोबरच्या मैत्रीसंबंधांचे महत्त्व लवकर पटले आणि त्यांनी आपल्या पहिल्या परदेश दौर्‍यासाठी भारताचीच निवड केली.
 
गेल्या जमान्यातील माला सिन्हा यांच्यापासून अलीकडच्या काळातील मनिषा कोईरालापर्यंत, नेपाळी महिलांनी भारतीय चित्रपटसृष्टीत नाव कमावले. अनेक हिंदी चित्रपटांचे चित्रण नेपाळच्या निसर्गरम्य प्रदेशांमध्येच झाले आहे. काठमांडूतील पशुपतिनाथाचे मंदिर आणि नेपाळमार्गे होणारी कैलास यात्रा इतक्यापुरतेच, भारत-नेपाळमध्ये धार्मिक संबंध नाहीत, तर प्रभू रामचंद्रांची पत्नी सीता हिचे जन्मस्थान जनकपूर आणि भगवान गौतम बुद्धांचे जन्मस्थान लुम्बिनी हे नेपाळमध्येच आहेत. त्यामुळे दोन्ही देशांतील धार्मिक संबंध सहज आहेत. इतकेच नव्हे, तर नेपाळच्या माजी शाही घराण्याशीही, भारतातील काही शाही राजघराण्यांनी विवाहांद्वारे नातेसंबंध प्रस्थापित केले आहेत. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या दिवंगत विजयाराजे शिंदे, या नेपाळच्या राणा राजघराण्यातीलच आहेत. नेपाळ हा तसा शांत प्रदेश असून, त्याच्याकडून भारताला कधीच उपद्रव झालेला नाही. दोन्ही देशांमधील सरहद्द खुली असून, नेपाळमधील उत्पादनांवर भारतात आयातशुल्क लावले जात नाही. दोन्ही देशांच्या जनतेत परस्पर विश्वास आणि आत्मीयतेचे नाते आहे.
 
आता भारतात आलेल्या बालेंद्र शाह यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर भारताने नेपाळशी अनेक महत्त्वाचे आणि अब्जावधी रुपयांचे करार केले. त्यात परदेशी विमान कंपन्यांना नेपाळमध्ये थेट प्रवेश देण्यासाठी भारतीय हवाई हद्दीचा वापर करू देणे, हा करार महत्त्वाचा. यामुळे परदेशी पर्यटक व विमान कंपन्या नेपाळशी संपर्क साधू शकतील. तसेच त्यामुळे नेपाळच्या ’भैरवाहा’ या नव्या विमानतळालाही व्यावसायिकदृष्ट्या लाभ होईल. नेपाळने भारताकडे दोन अब्ज डॉलरची आर्थिक मदत मागितली असून भारताकडून ती पूर्ण केली जाईल, यात शंका नाही. या करारांमुळे नेपाळला निश्चितच मोठे आर्थिक स्थैर्य लाभेल.
 
भारताला अडचणीत आणण्यासाठी त्याच्या शेजारी देशांना भारताविरोधात उभे करण्याची रणनीती चीन आणि पाकिस्तानने यापूर्वी आखून पाहिली. पण, या शेजारी देशांचे आर्थिक हितसंबंध भारताशीच निगडित असल्याने, हे देश पूर्णपणे भारताच्या विरोधात कधीच जाऊ शकत नाहीत. चीनकडून घेतलेली आर्थिक मदत किती महागात पडते, त्याचा चांगलाच अनुभव श्रीलंकेच्या उदाहरणातून आल्याने चीनवरचा विश्वासही कमी झाला आहे. बांगलादेशालाही भारताबरोबर सलोख्याचे संबंध ठेवणे, हे आपल्या हिताचे आहे, याची जाणीव होत आहे. पाकिस्तान ही ‘गॉन केस’च असल्याने, त्याबद्दल सांगण्यासारखे काहीच नाही.
 
नव्याने सत्तेवर आलेल्या बालेंद्र शाह यांनीही प्रारंभी भारताबरोबरच्या सीमावादाचा उल्लेख करून, भारताशी काहीशी स्वतंत्र भूमिका घेण्याचा आव आणला. पण यंदा तेथे आलेल्या भीषण पुराने त्यांचे डोळे उघडले. तेव्हा भारताने केलेल्या आर्थिक आणि तांत्रिक मदतीमुळे भारताला डावलून राज्यशकट हाकता येणार नाही, याची जाणीव त्यांना झाली. यापूर्वीचे पंतप्रधान के. पी. ओली शर्मा यांच्या सरकारने नेपाळला चीनच्या कच्छपी लावण्याचा प्रयत्न केला होता. कारण, ते कम्युनिस्ट पक्षाचे होते. चीननेही नेपाळला आपल्या गोटात ओढण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण, नेपाळ इतक्या मोठ्या प्रमाणावर भारतावर अवलंबून आहे की, त्याला भारताला डावलून चीनशी संधान बांधणेच शक्य नव्हते. नेपाळची ८० टक्के निर्यात ही भारतात होते. भारत हाच नेपाळचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार देश. शिवाय, नेपाळी जनताही भारताशी भावनिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहे. परिणामी, नेपाळला भारताशी फारकत घेणे जमले नाही. आताही शाह यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांमध्ये, रेल्वेमार्ग आणि अन्य पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी करार झाले आहेत. त्यात नेपाळला इंधन पुरविण्यासाठी नव्या पाईपलाईन टाकणे आणि नवी टर्मिनल उभारणे, मालवाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वेमार्ग उभारणे यांसारख्या प्रकल्पांचा समावेश आहे. बालेंद्र शाह यांची ही भेट भारत-नेपाळ या दोन्ही देशांतील मैत्रीच्या संबंधांना अधिक घट्ट आणि चिरस्थायी करील, यात शंका नाही.
 




संबंधित मजकूर