पंतप्रधान मोदींच्या सोने खरेदी टाळण्याच्या आवाहनाला भारतीयांचा प्रतिसाद!

एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान सोन्याच्या आयातीत ४० टक्क्यांची घट

    24-Nov-2026
 
India Gold Imports
 
नवी दिल्ली (India Gold Imports): सोने खरेदी मर्यादित ठेवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला भारतीयांना दिलेला प्रतिसाद आणि सोन्याच्या किमतीतील घसरण यांचा परिणाम देशाच्या सोन्याच्या आयातीवर दिसून आला आहे.. चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत भारताच्या सोन्याच्या आयातीत, गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ४० टक्क्यांची घट नोंदवली गेली. या कालावधीत भारताने २४.७ अब्ज डॉलर किमतीचे सोने आयात केले. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा ४१.२४ अब्ज डॉलर होता. त्यामुळे आयातखर्चातही लक्षणीय घट झाल्याचे, चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री अर्थात सीटीआयचे अध्यक्ष बृजेश गोयल यांनी म्हटले आहे.
सोन्याच्या आयातीवरील खर्च कमी होणे हे देशाच्या परकीय चलन व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. भारतात सोन्याला सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेबरोबरच गुंतवणुकीच्या दृष्टीनेही विशेष महत्त्व आहे. त्यामुळे देशांतर्गत मागणीचा मोठा भाग आयातीद्वारेच पूर्ण होतो. अशा परिस्थितीत सोन्याची खरेदी मर्यादित ठेवण्याबाबत पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाला, भारतीयांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आकडेवारीवरुन समजत असल्याचे गोयल यांनी नमूद केले. (India Gold Imports)
२०२५-२६ या आर्थिक वर्षात भारताने सुमारे ७२ अब्ज डॉलर किमतीचे सोने आयात केले होते. मात्र, चालू आर्थिक वर्षात ही आयात ३५ ते ४० अब्ज डॉलरपर्यंत राहण्याचा अंदाज गोयल यांनी व्यक्त केला. सोन्याच्या खरेदीतील घट आणि किमतीतील बदल या दोन्ही घटकांचाही यामध्ये वाटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (India Gold Imports)
सोन्याच्या किमतीतही या काळात मोठीच घसरण झाली आहे. पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी कमी करण्याचे आवाहन केले, त्या वेळी सोन्याचा दर प्रतिकिलो सुमारे १.९० कोटी रुपये इतका होता. तो आता १.२५ कोटी रुपयांपर्यंत खाली आला असून, प्रतिकिलोमागे सुमारे ६५ लाख रुपयांची घट झाली आहे. या घसरणीमुळे सराफ व्यावसायिकांना सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या काळात सोन्याच्या साठ्याचे व्यवस्थापन करणे सुलभ झाले. ग्राहकांनाही तुलनेने कमी किमतीत दागिन्यांची खरेदी करता येत आहे. (India Gold Imports)
यंदाच्या लग्नसराईत दागिन्यांचा वाटा 10 टक्के राहाणार!
यंदाच्या लग्नसराईत सुमारे ५२ लाख विवाह होण्याचा अंदाज असून, यामधून सहा लाख कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे. या एकूण उलाढालीत लग्नानिमित्ताने करण्यात येत असलेल्या सोने-चांदीच्या दागिन्यांचा वाटा सुमारे आठ ते दहा टक्केच राहण्याचा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतीतील घसरणीचा लाभ ग्राहकांसह सराफा बाजारालाही होण्याची शक्यताही तज्ञांनी वर्तवली. (India Gold Imports)






संबंधित मजकूर