वसुंधरेच्या संरक्षणासाठी ‘वसुधैव कुटुम्बकम्’

    24-Nov-2026   

COP31 Climate Change Conference
 
जागतिक तापमानवाढ, हवामानबदलाचे दुष्परिणाम हे देश विकसित असो अथवा अविकसित, सर्वांसाठी म्हणा सारखेच! याकडे कानाडोळा करीत, ‘कॉप३१’सारख्या पर्यावरणीय समस्यांवर तोडगा काढणार्‍या परिषदेतील जागतिक एकमताचा अभाव आणि ध्रुवीकरण हे सर्वस्वी चिंताजनकच!
 
मावळतीकडे झुकलेले २०२६ हे आतापर्यंतच्या सर्वाधिक उष्ण वर्षांच्या यादीतील एक वर्ष ठरू शकते. कारण, या वर्षाने ‘एल-निनो’ आणि त्याचा जागतिक कहर दाखवून दिला. हाडे गोठवणार्‍या बर्फाळ युरोपीय प्रदेशांना यंदा उष्णतेच्या तीव्र लाटेचा सामना करावा लागला, तर नेपाळसारख्या हिमालयीन देशाला महाप्रलयकारी पुराने अक्षरशः उद्ध्वस्त केले. अमेरिकेसारख्या जागतिक महासत्ता म्हणून मिरवणार्‍या देशालाही हवामानबदलाचे चटके चुकले नाही. असह्य तापमानवाढ, दुष्काळी स्थिती आणि परिणामी बर्फाचा साचलेला थर कमी होण्यासारख्या पर्यावरणीय बदलांचा तडाका खुद्द अमेरिकेलाही बसलाच. आफ्रिकन देशांमध्येही काही ठिकाणी शुष्क दुष्काळ, काही प्रदेशांत भीषण पूरस्थिती असे बदलत्या पर्जन्यचक्राचे भेसूर परिणाम प्रकर्षाने दिसून आले. त्यामुळे जगाचा असा कोणताही कोपरा नाही, जो हवामानबदलाच्या वणव्यात यंदा होरपळून निघाला नाही. सांगण्याचे तात्पर्य इतकेच की, हवामानबदल ही कुणा एका देशाची, खंडाची समस्या नसून, त्याचे जागतिक पडसाद हे सर्वच देशांना कमी-अधिक तीव्रतेने भेडसावणारे आहेत. असे असेल, तर या जागतिक समस्येवर जगाला एकत्र, एका व्यासपीठावर येऊन, त्यावर समाधान शोधणे हे क्रमप्राप्तच. याच अनुषंगाने संयुक्त राष्ट्राच्या ‘युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन लायमेट चेंज’ अर्थात ‘यूएनएफसीसी’तर्फे गेल्या तीन दशकांपासून सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. ‘कॉन्फरन्स ऑफ पार्टीस’ अर्थात ‘कॉप परिषद’ हा त्याच कडीचा एक भाग. यंदाची ही ३१वी परिषद तुर्कीयेतील अंताल्या शहरात नुकतीच संपन्न झाली. परंतु, काही मुद्द्यांवरील मतभेदांमुळे संयुक्त करारापत्राला एकमुखी मान्यता मिळू शकली नाही. त्यामुळे हवामानबदलाच्या संकटावर केवळ चिंता व्यक्त करणे पुरेसे नसून, त्याला जोपर्यंत शाश्वत उपाययोजनांची जोड मिळत नाही, तोपर्यंत या चर्चाही निष्फळच म्हणाव्या लागतील.
 
दोन आठवडे सुरू असलेल्या ‘कॉप३१ परिषदे’तील व्यापक मंथनातून जगाच्या हाती ठोस असे काही लागेल, अशी आशा होती. परंतु, ती आशा सपशेल फोल ठरली. त्याचे प्रमुख कारण म्हणजे, जीवाश्म इंधनाचा ‘अंताल्या करारा’तून वगळलेला उल्लेख! खरं तर, जीवाश्म इंधने ही प्रदूषणाचा एक मोठा स्रोत. कोळसा, तेल, नैसर्गिक वायू यांसारख्या जीवाश्म इंधनाचा हरितगृह वायूंच्या उत्सर्जनापैकी वाटा हा ६८ टक्के, तर कार्बन उत्सर्जनातही ९० टक्के हिस्सा हा जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातूनच येणारा. तेव्हा जीवाश्म इंधनासारख्या प्रदूषकांचा वापर कमी करणे, हे क्रमप्राप्त. परंतु, ‘अंताल्या करारा’च्या अंतिम मसुद्यात असा स्पष्ट उल्लेख करण्यासही तेलउत्पादक देशांनी स्पष्ट नकार दिला. अगदी रशियासारख्या देशानेही जीवाश्म इंधनाचा वापर कमी केल्यास ‘इंधन गरिबी’चा सामना करावा लागेल, असा दावा केला. त्यामुळे अखेरीस जीवाश्म इंधनाचा कोणताही उल्लेख न करताच, अंतिम मसुदा जाहीर करण्यात आला, ज्याला युरोपियन युनियनसह कित्येक देशांनी विरोध दर्शविला.
 
परंतु, या परिषदेच्या अपयशाचे हे एकमेव कारण नाही. ‘क्लायमेट फायनान्स’ या दुसर्‍या कळीच्या मुद्द्याबाबतही कोणतीही सहमती न झाल्यामुळे या परिषदेत नाराजीचा सूर उमटला. हवामानबदलाच्या परिणामांचा सामना करण्यासाठी गरीब देशांना श्रीमंत देशांकडून काही अर्थसाहाय्याची अपेक्षा आहे. पण, अशी कोणतीही शाश्वती श्रीमंत देशांकडून गरीब देशांनाही ‘कॉप३१’मध्ये न मिळाल्यामुळे तिथेही निराशाच पदरी पडली. कारण, गेल्या वर्षी ब्राझीलमध्ये झालेल्या ‘कॉप३०’ परिषदेतही हवामानबदलाच्या आव्हानांशी सामना करण्यासाठीचा निधी हा तिपटीने वाढविण्याची गरज अधोरेखित करण्यात आली होती. परंतु, यंदाच्या परिषदेच्या अंतिम मसुद्यात यासंदर्भातील उल्लेख टाळला गेल्याने विकसनशील आणि अविकसित देशांनी आक्षेप नोेंदवला. यांसारख्या परिषदांना श्रीमंत आणि प्रदूषणाला मुख्यत्वे कारणीभूत असणारे देश असे रिकाम्या हाताने येऊ शकत नाही, अशी भूमिका आफ्रिकेतील विचारवंतांनी मांडली. त्यामुळे हवामानबदलाच्या आर्थिक परिणामांचा, भरपाईचा प्रश्नही अनुत्तरितच राहिला. खरं तर, अशा परिषदांमध्ये विविध देशांमध्ये एकमत घडवून आणण्याची जबाबादारी ही यजमान देशांचे अध्यक्ष म्हणून तुर्कीयेची, तसेच वाटाघाटींचे नेतृत्व होते ऑस्ट्रेलियाकडे. परंतु, या दोन्ही देशांतील असमन्वयातून निर्माण झालेल्या दुहेरी गोंधळामुळे अंतिम मसुद्यावरील एकमताची प्रक्रिया सुरळीत पार पडू शकली नाही. शिवाय, अमेरिकेसारख्या बड्या देशाने आधीच ‘पॅरिस करारा’तून घेतलेली माघार असेल किंवा ‘जी-७’ देशांसह अन्य देशांतील राष्ट्रप्रमुखांच्या अनुपस्थितीमुळेही ‘कॉप३१’ परिषदेचे गांभीर्य आपसुकच कमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे निहित कालावधीत ४८ तासांची भर घालून ‘कॉप३१’ ही एकीकडे आजवरची सर्वाधिक काळ चाललेली हवामानबदल परिषद ठरली असली, तरी त्यातून जगाच्या हाती ठोस असे काहीही लागले नाही, हे दुर्दैवाने नमूद करावेच लागेल. मग आता पुढे काय? तर, ज्या ज्या मुद्द्यांवर यंदाच्या परिषदेत एकमत होऊ शकलेले नाही, असे सर्व मुद्दे पुढील वर्षी इथिओपियाच्या अदिस अबाबा येथे होणार्‍या ‘कॉप३२’ परिषदेत पुन्हा चर्चेला घेतले जातील. तेव्हा तत्पूर्वी सर्व देशांना सामोपचाराने ही कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
 
२००९च्या ‘कोपनहेगन’ परिषदेनंतरची अंताल्याची ही अशी दुसरी परिषद, जी हवामानबदलावर कोणत्याही अंतिम तोडग्याशिवाय संपुष्टात आली. पण, त्याचबरोबर चर्चेत आलेल्या काही सकारात्मक बाबींचाही उल्लेख क्रमप्राप्त ठरावा. जागतिक तापमानवाढ आता १.५ अंश सेल्सिअसची मर्यादा ओलांडण्याच्या मार्गावर आहे, अशा परिस्थितीत कार्बन काढून टाकणार्‍या तंत्रज्ञानाचा विस्तार करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली. शिवाय, २०३५ पर्यंत जागतिक ऊर्जावापर ३५ टक्क्यांपर्यंत नेण्याच्या लक्ष्याला ८० देशांनी पाठिंबाही दर्शविला. या परिषदेविषयी संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अ‍ॅन्टोनिओ गुटेरस यांनी दिलेली प्रतिक्रिया मार्मिक ठरावी. ते म्हणाले की, "वाटाघाटींच्या व्यासपीठावर कदाचित एकमत नसेल, पण विज्ञानाच्या बाबतीत कोणतीही संदिग्धता नाही. ‘कॉप३१’मधून मिळणारा मुख्य संदेश स्पष्ट आहे, हवामानसंकटाचा सामना करण्यासाठी जगाला अजून खूप काही करण्याची गरज आहे आणि ते आताच करणे आवश्यक आहे.” गुटेरस यांनी दिलेला जगाला दिलेला हा गर्भित इशारा सर्वथा योग्यच. त्यामुळे ‘उत्तर वि. दक्षिण’, ‘श्रीमंत वि. गरीब’, ‘तेलउत्पादक वि. तेल आयात करणारे देश’ असे सर्व प्रकारचे भेदाभेद जोपर्यंत बाजूला सारून, ‘वसुधैव कुटुम्बकम्’चा एकमेव विचार केंद्रस्थानी ठेवला जात नाही, तोपर्यंत हवामानबदलाच्या संकटाचा सामना करणे अशक्यच!
 




विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची
संबंधित मजकूर