
नवी दिल्ली, (BJP Akali Dal Alliance Punjab) : पंजाबच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून, भारतीय जनता पक्ष आणि शिरोमणी अकाली दल तब्बल सहा वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी मंगळवारी दिल्लीतील भाजप मुख्यालयात संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची अधिकृत घोषणा केली. आगामी २०२७ मधील पंजाब विधानसभा निवडणूक दोन्ही पक्ष एकत्र लढविणार आहेत.
या युतीची घोषणा करताना अमित शाह यांनी पंजाबमध्ये अकाली दल मोठ्या भावाच्या भूमिकेत राहील, असे स्पष्ट केले. निवडणुकीत युतीला विजय मिळाल्यास अकाली दलाचाच नेता मुख्यमंत्री होईल, असेही त्यांनी जाहीर केले. मात्र, दोन्ही पक्षांमधील जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.(BJP Akali Dal Alliance Punjab)
या दोन्ही पक्षांची युती सप्टेंबर २०२० मध्ये केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांवरून तुटली होती. अकाली दलाने भाजपशी असलेली तब्बल २४ वर्षांची राजकीय आघाडी तोडत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. तत्कालीन केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर दोन्ही पक्षांनी २०२२ ची पंजाब विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती.
या नव्या युतीमुळे पंजाबमधील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्ष आणि काँग्रेससमोर भाजप-अकाली दलाचे संयुक्त आव्हान उभे राहणार आहे. पंजाबमधील अमली पदार्थांचे उच्चाटन, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि राज्याचा आर्थिक विकास हे युतीचे प्रमुख मुद्दे असतील, असे शाह यांनी स्पष्ट केले.(BJP Akali Dal Alliance Punjab)