१ डिसेंबरपासून वाढणार चारचाकींच्या किंमती! ऑडी, टाटा, ह्युंदाईच्या मॉडेलच्या गाड्या महागणार

    24-Nov-2026   

Audi Q7 (1)


मुंबई, दि. २४ (विशेष प्रतिनिधी) :
मारूति, टाटा, ऑडी आणि ह्युंदाईसह अनेक वाहन कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किंमती १ डिसेंबरपासून वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मारुतीने दोनच दिवसांपूर्वी उत्पादनांच्या किंमतीत वाढ केली होती. त्यानंतर आता अन्य कंपन्यांनीही १ डिसेंबरपासून ही वाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपन्यांना लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतीत झालेल्या वाढीचा हा परिणाम असल्याचे कारण या वृद्धीवेळी देण्यात आले आहे. Audi Price in India 
वाहन उत्पादनातील कच्चा माल म्हणजे स्टील, अॅल्युमिनीअम, तांबे, प्लास्टीक, रबर, ईलेक्ट्रोनिक्सचे सुटे भाग, कारागीर आणि वाहतूकीचा खर्च, याला एकत्रित 'इनपूस्ट कॉस्ट' म्हटले जाते. या किंमती वाढल्यानंतर कंपन्यांच्या होणाऱ्या नफ्यावरील परिणाम कमी करण्यासाठी किंमती वाढविल्या जातात. परिणामी हा भुर्दंड ग्राहकांना बसू लागतो. टाटा मोटार्सने आपल्या सर्व वाहनांच्या किंमतीत ०.५ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ ई-वाहने आणि पेट्रोल-डिझेल, अशा दोन्ही प्रकारांच्या वाहनांमध्ये होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
ऑडीच्या किंमतीत २ टक्क्यांनी वाढ

ऑडी इंडियाचे ब्रँड डायरेक्टर बलबीर सिंह धिल्लों म्हणाले, “वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर आम्ही वाहनांच्या किमतींमध्ये २ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यावसायाची शाश्वती टीकून राहावी या दृष्टीने ही वाढ झाली असून ग्राहकांना याची झळ बसणार नाही याची खबरदारी घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
ह्युंदाईच्या किंमती ८ हजारांनी वाढणार

ह्युंदाईने आपल्या निवडक श्रेणीतील वाहनांच्या किंमती वाढतील, अशी शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, अद्याप किंमती वाढलेल्या नाहीत. ही वाढ काही विशिष्ट श्रेणीतील वाहनांवर लागू होणार आहे. प्रत्येक वाहनानुसार या किंमती ठरणार असल्याचेही म्हटले आहे.

मारूतीच्या किंमतीत वर्षातील चौथी वाढ

टाटा आणि ह्युंदाईच्या पूर्वी देशातील अग्रगण्य कंपनी असलेल्या मारूतीने आपल्या किंमतीत ०.३१ टक्क्यांना वाढ केली आहे. या नव्या किंमती २२ नोव्हेंबरपासून लागू झाल्या आहेत. प्रत्येक श्रेणींच्या वाढीव किंमती अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. २०२६ रोजी मारूतीने आपल्या किंमती चौथ्यांदा वाढविल्या आहेत.





तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक. 

संबंधित मजकूर