‘एआय’चा आहारसल्ला कितपत विश्वासार्ह?

    24-Nov-2026

AI Diet Advice
 
कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ने आज आपले अवघे जग व्यापले आहे. आपल्या दैनंदिन जीवनात ‘एआय’ने मिळवलेले स्थान तसे मोठेच. शिक्षणापासून उद्योगापर्यंत आणि मनोरंजनापासून वैद्यकीय क्षेत्रापर्यंत त्याचा वापर सातत्याने वाढता आहे. आरोग्याच्या बाबतीतही रोगनिदान, वैद्यकीय तपासण्यांचे विश्लेषण, औषधांचा शोध आणि रुग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी अलीकडे ‘एआय’चीच मदत सरार्र्स घेतली जाते. आता याच तंत्रज्ञानाचा वापर आहार नियोजनासाठीही होऊ लागला आहे. वजन कमी करणे, मधुमेह नियंत्रणात ठेवणे किंवा रोजच्या जेवणातून योग्य पोषण मिळवणे, यासाठी अनेकजण ‘एआय’कडे सल्ला घेण्यासाठी वळताना दिसतात.
 
सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक अ‍ॅप्लिकेशन्समध्ये जेवणाचे छायाचित्र टाकल्यास त्यातील पदार्थ आणि त्यांच्या कॅलरींचा अंदाज दिला जातो. दिवसभरात किती प्रथिने, कर्बोदके आणि चरबी शरीरात गेली, याची नोंदही ठेवली जाते. व्यक्तीचे वय, वजन, उंची आणि व्यायामाच्या सवयी लक्षात घेऊन आहारात कोणते बदल करावेत, याच्याही सूचना अगदी एका क्षणात आपल्याला मिळतात. काही उपकरणांच्या मदतीने झोप, शारीरिक हालचाली आणि रक्तातील साखरेतील चढ-उतारांचीही माहिती घेऊन, आहाराचे नियोजन करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. वरवर पाहता ही पद्धत सोयीची आणि उपयुक्तच वाटावी. परंतु, आहार ठरवणे, म्हणजे केवळ कॅलरींची बेरीज-वजाबाकी करणे नव्हे.
 
प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते. एखाद्या व्यक्तीला उपयुक्त ठरणारा आहार दुसर्‍या व्यक्तीसाठी अयोग्य ठरू शकतो. मधुमेही रुग्णाचा आहार ठरवताना त्याच्या रक्तातील साखरेबरोबरच औषधोपचार आणि आजाराची तीव्रताही लक्षात घ्यावी लागते. मूत्रपिंडाच्या आजारात प्रथिने, पोटॅशियम आणि मिठाचे प्रमाण नियंत्रित करावे लागते. थायरॉईडचे विकार, यकृताचे आजार, अन्नाची अ‍ॅलर्जी किंवा जीवनसत्त्वांची कमतरता असल्यास, आहाराच्या गरजा आणखीच बदलताना दिसतात. त्यामुळे ‘एआय’ला दिलेली माहिती अपुरी असेल किंवा त्यातून रुग्णाच्या प्रकृतीचे योग्य आकलन ‘एआय’ला झाले नाही, तर दिलेला सल्ला रुग्णाला अधिकच त्रासदायक ठरू शकतो.
 
वजन कमी करण्याच्या बाबतीतही अशीच काळजी घेणे आवश्यक आहे. कमी कॅलरीचा आहार घेतल्याने वजन झपाट्याने घटू शकते; पण त्याचवेळी स्नायूंचे प्रमाण कमी होणे, अशक्तपणा येणे आणि शरीरात लोह, कॅल्शियम किंवा जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण होण्याचीही शक्यता दुसरीकडे वाढत असते, याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. त्यामुळे वजन कमी झाले एवढ्यावरून आहार योग्य असल्याचा निष्कर्ष काढता येत नाही. शरीराला आवश्यक पोषण मिळते आहे का, रक्तातील साखर नियंत्रणात आहे का आणि व्यक्तीची शारीरिक क्षमता टिकून आहे का, हेही पाहणे आवश्यक आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आहारातील बदलांचा परिणाम काही आठवड्यांत दिसला, तरी तो दीर्घ काळ टिकतो का, हे तपासणे आवश्यकच. एखाद्या उपाययोजनेमुळे सुरुवातीला वजन कमी झाले, तरी सहा महिन्यांनंतर पुन्हा वजन वाढत असेल किंवा पोषणाची कमतरता निर्माण होत असेल, तर त्याला यशस्वी कसे म्हणता येईल, यातून उपायापेक्षा अपायच होण्याचा धोका अधिक असतो.
 
याचा अर्थ ‘एआय’ वाईट आहे, त्याचा वापर टाळावा असा नाही. उलटपक्षी, ‘एआय’मुळे आहार नियोजन निश्चितच सोपे झाले आहे. अनेक रोगांचे विश्लेषण रुग्णाला व्यवस्थित समजावण्यात ‘एआय’ची मदत लाखमोलाचीच. मात्र, प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, आजार आणि शरीराची गरज समजून घेण्याचे काम डॉटर आणि आहारतज्ज्ञच अधिक जबाबदारीने करू शकतात. ‘एआय’ने दिलेल्या सूचनांचा उपयोग माहिती आणि मार्गदर्शनासाठीच करावा. कारण योग्य आहार तोच, जो वजन कमी करण्याबरोबरच, शरीराला आवश्यक पोषण देऊन दीर्घ काळ निरोगी ठेवतो.
 




संबंधित मजकूर