संघकार्य जगलेला कर्मयोगी

    23-Nov-2026
 
 
Ramesh Gaydhani
 
संघकार्य हाच जीवनधर्म मानून सहा दशके निःस्वार्थ भावाने कार्यकर्त्यांची पिढी घडविणारे, असंख्य स्वयंसेवकांचे आधारवड ठरलेले नाशिकचे ज्येष्ठ संघकार्यकर्ते रमेश गायधनी यांचे, दि. २० नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या कार्यस्मृतींना उजाळा देणारा श्रद्धांजलीपर लेख...
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शतकी वाटचाल ध्येयनिष्ठ समर्पित कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने सिंचित झाली. नाशिकच्या संघकार्यात ‘रमेश गायधनी’ हे पर्व असेच ठळक उठून दिसते. गेली सहा दशके संघकामात सक्रिय असलेले रमेशरावांचे, दि. २० नोव्हेंबर रोजी वयाच्या ७६व्या वर्षी निधन झाले. स्वयंसेवकांच्या दोन पिढ्यांना रमेश गायधनी हे व्यक्तिमत्त्व परिचित होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने सर्वच कार्यकर्त्यांच्या मनात वेदना आहेत. त्यांचा सहवास, सलगी देणे आणि त्यांची कार्यप्रवणता हे सर्व प्रेरकच. त्यांचे स्वतःचे व्यक्तिगत जीवन, त्यांचा परिवार हे सर्वच संघसमर्पित आहे.
 
संघाचा वारसा : स्वयंसेवक असलेले पितृछत्र लवकर हरपले. एकत्र कुटुंबातील त्यांचे काका डॉ. राजाभाऊ गायधनी हे संघाचे विभाग कार्यवाह. प्रकृती अस्वस्थतेने राजाभाऊंना संघकाम लवकर थांबावे लागले. परंतु राजाभाऊंमुळे अखिल भारतीय ते तालुका स्तरापर्यंतच्या कार्यकर्त्यांचे घरी येणे होतेच. स्वाभाविकच, रमेशरावांवर बालपणापासूनच संघसंस्कार झाले. दैनंदिन संघशाखेचा आग्रह, शारीरिक कार्यक्रमांत कुशलता, आचारांमधील काटेकोरपणा आणि सामूहिक प्रयत्नांतून संघकामाला गती देणे, ही मिळालेली शिदोरी होती. पुढे त्यांच्याकडे विविध जबाबदार्‍या आल्या. त्यात शहराचे शारीरिक शिक्षणप्रमुख, व्यवस्थाप्रमुख, शहर कार्यवाह -जिल्हा कार्यवाह अशा चढत्या क्रमाने, त्यांनी दायित्व सांभाळले. अर्थात, दायित्व हा संघसमर्पणाचाच एक भाग. त्यांचे स्वयंसेवकत्व हाच समर्पणाचा आदर्श होता. मागील पिढीपासूनच्या संघसंस्कारामुळे, त्यांच्या कुटुंबात कार्यकर्त्यांचे येणे-जाणे, चहा-पाणी, भोजन, वेळी-अवेळी मुक्कामाला येणारे स्वयंसेवक असा मोठाच राबता असे. शिवाय, एकत्र कुटुंबामुळे सर्व नातेवाईकांचे येणे-जाणे, सण-समारंभही असत. त्यामुळे कुटुंबातील सर्वांनाच आदरातिथ्याची सवय आहे. यामुळेच या घराचा संघपरिवारातील सर्वच संघटनांना खूप मोठा आधार आहे.
 
समर्पित जीवन : सुरेशराव केतकर यांच्या मार्गदर्शनानुसार वैयक्तिक इलेट्रिकल कंत्राटदार व्यवसायाला त्यांनी तीन-चार तास द्यावे व जवळपास आठ-दहा तास संघटनकामाला, अशी योजना केली होती. व्यवसायानिमित्ताने शहरातील ज्या भागात जातील, तेथील स्वयंसेवकांशी सहजगत्या संपर्क करण्याचा त्यांचा स्थायीभाव होता. त्यामुळे व्यवसायही संघसमर्पित कसा असावा, याचाच आदर्श त्यांनी ठेवला. त्यांच्या कामगारांना आर्थिक उपलब्धीनुसार मर्यादित वेतन देऊ शकत होते. या कामगारांना बाहेर चांगल्या नोकरीची शयता असल्यास, रमेशराव स्वतः त्यांना तिथे नोकरी लावून देत. सर्वच कामगार त्यांच्या कुटुंबातील घटक होते. तसेच कामगारांच्या घरातही सुख-दुःखाच्या प्रसंगी सहजगत्या जाणे असे. त्यामुळे एकदा माणूस संपर्कात आला की तो आपला कायमचा स्नेही व्हावा, हीच संघसंस्कारांचीची शिदोरी त्यांनी व्यवसायातही जपली.
 
संघकामातील कौशल्य : त्यांची सहज संवाद साधण्याची हातोटी व सलगी देण्याने, कार्यकर्त्याला कोणत्याही कामासाठी सहजगत्या कार्यप्रवण करत. संघकामाचा ध्यास सतत मनात असला, तरी अत्यंत हसत-खेळतच स्वयंसेवकांना संघकामात सहभागी करण्याची त्यांची हातोटी होती. त्यामुळे त्यांच्याबरोबर संघकाम करताना आनंद मिळे. त्यांच्या व्यापक संपर्कामुळे शहर व्यवस्थाप्रमुख असताना, विविध संघकार्यक्रमात लागणारी अनेक संसाधने व मनुष्यबळ संघकामाला उपलब्ध होत.
 
त्यांच्या पिशवीत कायम संघाची अर्धविजार, भगवा ध्वज व शिट्टी असे. संघशाखेवर अर्धविजारीतच उपस्थित राहण्याचा आग्रह, ज्या शाखेला काही अडचणीमुळे त्या दिवशी ध्वज लागला नसेल, तिथे त्वरित ध्वज उपलब्ध करून देणे आणि आचार विभाग, तसेच खेळांमध्ये शिट्टीचा वापर खूप आवश्यक असतो. प्रवासी कार्यकर्त्याने किती सहजगत्या काटेकोरपणाचा संस्कार करायचा असतो, तेच यातून दिसते.
 
त्यांची बैठक घेण्याची हातोटीही संवादात्मक असे. कमी शब्दांतील संवादात ते कार्यकर्त्यापर्यंत विचार पोहोचवत. त्यांच्या दूरध्वनीवरील अल्प शब्दांतील संवादाच्या शैलीची नेहमीच चर्चा होई. परंतु, दूरध्वनीवर संवाद केल्यावर हमखास आपला विषय पोहोचल्याची समोरच्याला खात्री असे. संघशाखा, उत्सव, बैठका, विजयादशमीचे संचलन, हिवाळी शिबीर, संघाचे विविध वर्ग, संघ शिक्षा वर्ग, बाहेरगावच्या बैठका, तळजाई शिबिरासारखे मोठे उपक्रम, अशा सर्व संघकार्यक्रमांमध्ये त्यांनी शेकडो स्वयंसेवकांना प्रेरणा दिली आहे.
 
सर्वांचे आधारवड : केवळ संघस्वयंसेवक नव्हे, तर संघाचा पदाधिकारी या नात्याने समाजातील अनेक माणसे, त्यांची व्यक्तिगत कामे घेऊन त्यांच्याकडे येत. अशा सर्वांचेच शिक्षण, नोकरी-व्यवसाय किंवा अन्य काही कामे असल्यास, ते न कंटाळता पूर्ण करत. प्रसंगी त्यासाठी लागणारी धावपळही करत. त्यामुळे अनेकजण त्यांच्याशी व्यक्तिगत जोडले गेले. स्वयंसेवकांच्या सुख-दुःखाच्या प्रसंगी व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढणे आग्रहाने जमवत. कमी वयात लागलेली हृदयाची व्याधी सांभाळूनच, ते हे सर्व करत. म्हणूनच त्यांचे व्यक्तिगत जीवन, व्यवसाय व कौटुंबिक जीवन हे संघसमर्पित होते.
 
आणीबाणीतील कसोटी : संघाच्या शतकी कालखंडात संघावरील बंदीमध्ये कार्यकर्त्यांची मोठी कसोटी होती. १९७५च्या आणीबाणीच्या कालखंडात रमेशराव व त्यांचे काका डॉ. राजाभाऊ या दोघांनाही, ‘मिसा’ कायद्याखाली करावास सोसावा लागला. अर्थात, अटक होण्यापूर्वी आणीबाणीविरुद्ध गुप्त प्रचाराचे जेवढे काम करता येईल, तेवढे काम दोघांनीही केले. रमेशराव काही काळ भूमिगतही होते.
 
घरातील दोन कर्ते पुरुष जवळपास १८ महिने तुरुंगात असल्यावर कुटुंबीयांच्या हालाची कल्पना करू शकतो. पापड-लोणची-मसाले करून त्यांच्या आई व काकू यांनी कुटुंब चालवले. केवळ गायधनी परिवार चालवण्याचेच काम त्यांच्याकडे नव्हते, तर नाशिक जिल्ह्यातील संघाचे हक्काचे घर असल्याने नाशिकरोड कारागृहात ‘मिसा’बंदी असलेल्या महाराष्ट्रभरातील स्वयंसेवकांच्या कुटुंबीयांचे नाशिक रोडला येणे-जाणे असे. तेव्हा, बहुतांश मुक्काम-भोजनव्यवस्था, तसेच भूमिगत झालेले प्रचारक याच कुटुंबात असे. भूमिगत कार्यकर्ते गुप्तपणे केव्हाही वेळी-अवेळी येत. त्यांची गोपनीयता सांभाळून व्यवस्था करावी लागे. ही गोष्ट आज लिहितो, तेवढी सोपी नाही. सरकारची वक्रदृष्टी, चालवलेला अपप्रचार यांमुळे, समाजातही संभ्रमाचे वातावरण होते. त्यामुळे अशा परिवाराला मदत करण्यास कोणी फार पुढे येत नसे. ही अग्निपरीक्षाही या परिवाराने यशस्वी केली.
 
परिवार क्षेत्राचा आधार : विविध क्षेत्र परिवार संघटनांच्या प्रारंभीच्या काळात त्यांचे कार्य मर्यादित असल्याने, अशा संघटनांना संघाकडून मनुष्यबळ व अन्य संसाधने यांची मदत होते. शहर व जिल्हा कार्यवाह या नात्याने, अशा संघटनांच्या प्रारंभिक जडणघडणीत रमेशरावांनी भरपूर मदत केली.
 
‘विश्व हिंदू परिषदे’चे श्रीराम जन्मभूमी आंदोलनातले विविध संघर्षातही त्यांचा मोठाच सहभाग. समाजात अत्यंत भारलेले वातावरण होते. विशेषतः १९९० व १९९२च्या कारसेवेत हिंदू समाजाच्या सहभागासाठी, जनजागृतीच्या विविध कार्यक्रमांत त्यांनी मोठे परिश्रम घेतले. पहिल्या कारसेवेत जवळपास ३०० जणांच्या कारसेवकांच्या तुकडीला निरोप देऊन, त्याच दिवशी नाशिकमध्ये आलेल्या ‘अ. भा. विद्यार्थी परिषद’ व ‘सामाजिक समरसता मंचा’च्यावतीने आयोजित ‘महाराष्ट्रव्यापी फुले-आंबेडकर संदेश यात्रे’चे स्वागत करायला शहरात गेले होते.
 
अशा सर्व परिवार संस्थांना मदत करणे, हे संघकार्यकर्ता म्हणून सहजगत्या करत. पूर्वीचा जनसंघ व पुढे भारतीय जनता पक्ष म्हणून, राजकीय क्षेत्रात मदत लागत असे. त्यांची गरज लक्षात घेऊन आवश्यक कार्यकर्त्यांच्या मदतीने ती गरज पूर्ण करत. त्यामुळे नाशिक शहरातील विद्यमान शहर-जिल्हा-प्रदेश स्तरावर असलेल्या भाजपच्या अनेक नेत्यांना, रमेशरावांचा सहवास व मार्गदर्शन लाभले आहे. आणीबाणीमध्ये प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे हे दोघे नाशिक रोड कारागृहात बंदी असल्याने, रमेशरावांचे व त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. ‘मिसा’बंदी असलेल्या महाराष्ट्रातील अनेक संघकार्यकर्त्यांचा त्यांचा कायमचा स्नेह जडला.
 
संघर्षशील नेतृत्व : संघर्षाच्या प्रसंगी त्यांचे नेतृत्व हे अधिक उजळून निघे. आसामचे आंदोलन, गुही (सुरगाणा) वसतिगृहावरील कम्युनिस्टांचा हल्ला, अभोणा येथील मिशनरीविरुद्धचा संघर्ष अथवा मालेगावची दंगल अशा अनेक प्रसंगी त्यांचे कुशल मार्गदर्शन, निर्णयक्षमता दिसली. प्रशासनाशी प्रसंगी सौम्य संवादी भाषेत, तर कधी आवश्यक त्या ठाम भाषेत ते आपले म्हणणे मांडत. अशा अनेक प्रशासकीय अधिकार्‍यांशी त्यांचा नंतर कायमचा स्नेहही दृढ झाला. त्यांच्यावरील संघसंस्कारांतील वैशिष्ट्यपूर्ण अभिव्यक्ती आहे. अशा कुशल संघटक व समर्पित उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या संघकार्यकर्त्याच्या निधनाने, सर्वांनाच अतीव दुःख झाले आहे. संघकामात अधिकाधिक सक्रिय राहणे, हीच त्यांना खरी आदरांजली राहील.
 
रमेश गायधनी हे सा. ‘विवेक’च्या ‘हिंदुस्थान प्रकाशन सोसायटी’चेदेखील सदस्य होते. ‘विवेक’च्या प्रसारासाठी त्यांचे विशेष मार्गदर्शन असे. तसेच, दै. ‘मुंबई तरुण भारत’साठीदेखील त्यांनी रविवार कारंजावरील मध्यवर्ती भागात, जागा मिळवून दिली होती. त्यांच्या स्वतःच्याही जागेत काही काळ ‘तरुण भारत’चे कार्यालय होते.
 
संघसमर्पित कुटुंब : त्यांच्या काकू या ‘राष्ट्र सेविका समिति’च्या विभाग कार्यवाहिका, तर त्यांच्या भगिनी शैलाताई ‘समिति’च्या विद्यमान प्रांत कार्यवाहिका, दोन भगिनीदेखील विभाग-जिल्हास्तरावर समितीचे दायित्व सांभाळत आहेत. त्यांचे बंधू सुरेश हे संघाचे पूर्ण वेळ प्रचारक राहिले आहेत. तसेच, त्यांनी ‘संस्कार भारती’चेही महाराष्ट्र प्रांत संघटक म्हणूनही काम केले आहे. तेही संघकामात असून, सध्या ते सार्वजनिक वाचनालयाचे पदाधिकारी आहेत. त्यांचे सुपुत्रही संघकामात आहेत. तर, दोन पुतणे संघकामात सक्रिय असून, त्यांपैकी एक सांगली जिल्ह्यात पूर्ण वेळ प्रचारक आहेत.
 
-दिलीप क्षीरसागर
९४२२२४५५८२
(लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणीचे सदस्य आहेत.)




संबंधित मजकूर