युवराजांचा स्वपक्षीय मुखभंग

    23-Nov-2026
 
 
Rahul Gandhi on Indian Economy
 
राहुल गांधी यांना भारतीय अर्थव्यवस्थेची शोकसभा भरवण्याचा इतका सोस आहे की, अलीकडे ते परदेशातही देशाच्या अर्थव्यवस्थेची बदनामी करतात. परकीय गुंतवणुकदारांना दूरुन दिसणारे देशाच्या आर्थिक प्रगतीचे चित्र, जवळूनही राहुल यांच्या नजरेस कसे पडत नाही, याचे आश्चर्य वाटल्याखेरीज राहत नाही. अर्थव्यवस्था मृत झाली, उद्योगधंदे संकटात आहेत, विकासाचे दावे फोल आहेत, असा सतत घोष करीत राहणे, हाच जणू अलीकडे राहुल यांच्या राजकारणाचा एककलमी कार्यक्रम झाला आहे. परंतु, एखादे असत्य वारंवार उच्चारले, म्हणून त्याचे सत्यात रूपांतर होत नसते. उलट, कधीकधी स्वपक्षीयांच्याच मुखातून असे काही निघून जाते की, असत्य आणि वास्तव यांतील भेद उघड होतो. तेलंगणचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांचे अलीकडील विधान हे त्याचेच उदाहरण!
 
तेलंगणातील आपल्या सरकारच्या कामगिरीचा डंका पिटताना रेड्डी यांनी "२०४७ पर्यंत भारत ३० ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होईल आणि त्यात तेलंगणचे योगदान तीन ट्रिलियन डॉलरचे असेल,” असा विश्वास व्यक्त केला. आपल्या राज्याची प्रगती किती भव्य असेल, हे सांगण्याच्या भरात त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचे भवितव्यही उज्ज्वल असल्याचे अधोरेखित केले. त्यांचा उद्देश स्वतःचीच पाठ थोपटण्याचा होता; परंतु कोंबडे कितीही झाकले, तरी तांबडे उगवायचे राहत नाही. आता राहुल गांधींनीच सांगावे की, ज्या अर्थव्यवस्थेला ते ‘मृत’ म्हणतात, त्याच अर्थव्यवस्थेच्या बळावर त्यांच्या मुख्यमंत्र्यांना तीन ट्रिलियन डॉलरच्या भरारीचे स्वप्न कसे काय पडते? देशाची अर्थव्यवस्था खरोखरच मृत असेल, तर या विकासाचा प्राणवायू येणार कोठून? राज्याच्या प्रगतीसाठी देशाची आर्थिक गती, बाजारपेठ, गुंतवणूक आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा विस्तार आवश्यक असतो, एवढे साधे गणितही राहुल गांधींना मान्य नाही का? टीका करणे हा विरोधकांचा धर्मच; पण देशाचे सामर्थ्यच नाकारणे, हा कोणता धर्म? देशाच्या अर्थव्यवस्थेचीच निंदा करण्यात धन्यता मानणार्‍यांनी निदान स्वपक्षीय मुख्यमंत्र्यांची तरी विधाने ऐकावीत. राहुल यांच्या विधानांनी आता त्यांच्याच पक्षाची कोंडी अधिक होत आहे. स्वतःच्या मुख्यमंत्र्यांनीच दाव्यांना छेद दिल्यावर, काँग्रेसने सारवासारव करावी, ती तरी कोणत्या तोंडाने? अपप्रचाराचा धूर कितीही सोडला, तरी वास्तवाचा सूर्य झाकता येत नाही!
 
सत्तेची आस अन् मोडतोडीचा ध्यास
 
राज्यकारभार हा काही मोडतोडीचा खेळ नव्हे आणि राजकारण म्हणजे दुसर्‍याने उभारलेले उद्ध्वस्त करण्याचा ठेका नव्हे! राष्ट्राच्या उत्कर्षासाठी एखादे नवे पाऊल पडत असेल, तर त्याची उपयुक्तता तपासण्याऐवजी त्यास विरोध करण्याचीच बुद्धी ज्यांची प्रबळ झाली आहे, त्यांच्याकडून विधायक राज्यकारभाराची अपेक्षा तरी कशी करावी? सत्तेच्या सिंहासनावर आरूढ होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणार्‍यांनी जनतेपुढे स्वकर्तृत्वाचा आराखडा द्यावा. परंतु येथे उलटाच प्रकार दिसतो. आम्ही सत्तेवर आलो तर काय करू, याचे उत्तर नाही; मात्र सत्ताधार्‍यांनी केलेले काय काय मोडू, याच्याच घोषणा ढीगभर होत आहेत! अखिलेश यादव यांची अग्निवीरांसाठीची ’अग्निपथ’ योजना कायमची रद्द करण्याची घोषणा ही याच राजकीय बुद्धिदारिद्य्राची प्रचिती. आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. पण, अखिलेश यादव यांचा निवडणुकीचे राजकारण म्हणजे केवळ सत्ताधार्‍यांच्या प्रत्येक निर्णयास विरोध करणे, असाच समज झाला आहे. यातूनच त्यांनी ’अग्निपथ’ योजनेबाबत विधान केले.
 
’अग्निपथ’ योजनेविषयी काही उपाय सुचविण्याऐवजी योजना कायमची रद्द करण्याची घोषणा करणे, हा कोणता न्याय? भारतीय संरक्षण दलांनी अग्निवीरांच्या प्रशिक्षणातून आणि प्रत्यक्ष सेवेतून मिळालेल्या अनुभवांच्या आधारे त्यांच्या उपयुक्ततेचे सकारात्मक मूल्यमापन केले आहे. मग या योजनेतील त्रुटी दूर करण्याचा आग्रह धरण्याऐवजी तिचे अस्तित्वच पुसण्याचा अट्टाहास कशासाठी? सत्ताधार्‍यांची योजना म्हणून एखाद्या उपक्रमास विरोध करायचा आणि सत्ता मिळताच तो रद्द करावयाचा, ही काही राष्ट्रसेवेची पद्धत नव्हे. धोरणांची चिकित्सा ती कोणत्या पक्षाने सुरू केली, यावर होऊ नये. अन्यथा, राष्ट्राच्या प्रगतीचा गाडा राजकीय सूडबुद्धीच्या चिखलात रुतून बसेल. अखिलेश यांनी ’अग्निपथ’ योजना रद्द करण्याची घोषणा केली; परंतु तिच्याऐवजी कोणती व्यवस्था उभारणार, याचे उत्तरही जनतेला मिळाले पाहिजे. देशाला नवे काय देणार, याचा विचार न करता, केवळ काय काढून टाकणार, याचीच भाषा करणार्‍यांनी प्रथम आपल्या राजकीय कार्यक्रमातील रिकामेपणा भरून काढावा. कारण राष्ट्रनिर्मितीसाठी विधायक बुद्धी लागते; विद्ध्वंसाची घोषणा करण्यास केवळ विरोधाची खुमखुमी पुरेशी असते!
 
-कौस्तुभ वीरकर
 




संबंधित मजकूर