स्वप्नांचे चित्रलेणे रंगवताना...

 
 
Om Thadkar Charcoal Artist
 
चारकोल आर्टच्या कलाविश्वात स्वतःची ओळख नव्याने निर्माण करणार्‍या ओम थडकर यांच्या कलाप्रवासाविषयी...
 
काही कलाकार रंगांच्या साहाय्याने कॅनव्हासवर स्वप्ने उतरवतात, तर काही केवळ काळ्या-पांढर्‍या छटांमधून भावनांचे असंख्य रंग उलगडतात. चारकोल आणि पेन्सिलच्या माध्यमातून मानवी चेहर्‍यावरील भाव, निसर्गातील एखाद्या क्षणातील सूक्ष्म संवेदना जिवंत करणार्‍या ओम युवराज थडकर यांच्या कलेत, अशीच एक विलक्षण जादू अनुभता येते. लातूरजवळील बाभळगावच्या मातीत जन्मलेल्या ओम यांच्या मनात, चित्रकलेची आवड बालपणापासूनच रुजली. शाळेत चित्रकलेच्या ‘इंटरमिजिएट’ आणि ‘एलिमेंटरी’ परीक्षा देतानाच, चित्रकला त्यांच्या भावविश्वाचा भाग झाली. मात्र, कला हेच आयुष्याचे ध्येय असेल, याची जाणीव तेव्हा त्यांना फारशी नव्हती. ग्रामीण भागात करिअरच्या निवडी म्हणजे डॉक्टर किंवा इंजिनिअर! कुटुंबातही डॉक्टर आणि इंजिनिअरिंगची पार्श्वभूमी असल्याने, शिक्षणाचा प्रवास विज्ञानाच्या दिशेने सुरू झाला.
 
शाहू महाविद्यालयात विज्ञान शाखेतून बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यावर, त्यांनी पुण्यातील ‘डी. वाय. पाटील संस्थे’तून इंजिनिअरिंगची पदवी घेतली. शिक्षण पूर्ण होईपर्यंत चित्रकला फक्त आवडच होती.
 
इंजिनिअरिंगनंतर नोकरीच्या वाटेवर पाऊल टाकण्याचा प्रयत्न झाला; मात्र त्यात मन रमले नाही. काही दिवसांचा अनुभव घेतल्यावर, या क्षेत्रात पुढे न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आनंद मिळणार्‍या कामातच जगण्याचा मार्ग शोधता आला, तर आयुष्य अधिक अर्थपूर्ण होऊ शकते, असे त्यांचे मत.
 
सुरुवातीला मित्र, परिचितांसाठी पोर्ट्रेट्स रेखाटण्यापासून, त्यांच्या कलाप्रवासाला दिशा मिळाली. एखाद्याचे चित्र काढल्यावर त्याच्या चेहर्‍यावर उमटणारे समाधान, चित्रातील साम्य पाहून होणारे कौतुक आणि त्यातून वाढणारा आत्मविश्वास हीच त्यांची पहिली प्रेरणा. त्यांची कला केवळ छंद नाही, तर लोकांपर्यंत पोहोचू शकणारी, आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी असल्याची जाणीव त्यांना प्रदर्शनांतून झाली. २०१२च्या ‘लातूर फेस्टिव्हल’मध्ये त्यांनी पहिल्यांदा प्रदर्शनात सहभाग घेतला. त्यानंतर २०१४-१५ पासून प्रदर्शनांचा प्रवास नित्याचाच झाला. गेल्या दशकभरात त्यांनी स्वतःची शैली आणि स्वतंत्र ओळख निर्माण केली. ओम यांच्या चित्रांना देशविदेशांत मागणी असते.
 
ओम यांच्या कलेचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी रंगांच्या विस्तृत दुनियेऐवजी काळ्या-पांढर्‍या छटांचे विश्व निवडले. चारकोल पेन्सिल आणि ग्रेफाईट हेच त्यांच्या कलाविश्वाचे प्रमुख माध्यम! रंग नसतानाही चित्राला खोली देणे, प्रकाश आणि सावल्यांमधून आकार उभे करणे, चेहर्‍यावरील सूक्ष्म भाव टिपणे आणि प्रत्येक रेषेत वास्तवाचा स्पर्श निर्माण करणे, हेच त्यांच्या कलेचे वैशिष्ट्य. त्यांच्या चित्रांत प्रत्येक तपशील बारकाईने टिपला जातो. त्यामुळे त्यांची चित्रे पाहताना, प्रत्यक्ष छायाचित्रच पाहात असल्याचा भास होतो!
प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात काही कलाकृती, त्याच्या भावनांशी जोडल्या जातात. ओम यांच्याबाबतीत ती कलाकृती म्हणजे, आईच्या हातातील गणपतीचे चित्र! या चित्रामागील भावनिक नाते त्यांच्या कलेला मानवी स्पर्श देते. कलाकारासाठी चित्र म्हणजे केवळ विषयाची प्रतिकृती नसून, त्यातून जपलेली आठवण असते. तसेच, प्रदर्शनात विक्री झालेल्या पहिल्या कलाकृतीची आठवणही त्यांच्या मनात कायम आहे. स्वतःच्या कलेला पहिल्यांदा व्यावसायिक मान्यता मिळणे, अर्थार्जन होणे आणि आवडीच्या कामातूनच जगण्याचा मार्ग खुला होणे, हा अनुभव त्यांच्यासाठी अविस्मरणीयच.
 
बाभळगावपासून सुरू झालेल्या या प्रवासाने मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बंगळुरु अशा विविध शहरांपर्यंत मजल मारली. २०२२ मध्ये दुबईमधील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनातही ते सहभागी झाले. भारतीय कलाकार म्हणून परदेशात स्वतःची कला मांडणे आणि आंतरराष्ट्रीय रसिकांकडून मिळणारे कौतुक अनुभवणे, हा त्यांच्यासाठी वेगळाच आनंद. त्यानंतर सिंगापूरमध्येही त्यांच्या कलाकृती पोहोचल्या. आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमुळे कलाकाराला नवे संपर्क, गॅलरी आणि कला क्षेत्रातील नवी क्षितिजे खुली होतात, विविध शहरातील रसिकांची आवड कळते, हे अनुभवातूनच त्यांना जाणवले.
 
या प्रवासात कुटुंबाचा पाठिंबा हे त्यांचे बलस्थान. आई-वडिलांनी आवडीचे करिअर करण्यासाठी कधीही त्यांना आडकाठी केली नाही. उलट, प्रोत्साहनच दिले. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनीही कायमच ओमच्या कलेचे कौतुक केले होते. आजही देशमुख कुटुंबीय ओम यांच्या कलेचा सन्मान करतात. मित्रपरिवाराची साथही, ओम यांच्या प्रवासातील महत्त्वाची ऊर्जा ठरली. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, अजय देवगण, दीपिका पदुकोण यांसारख्या अभिनेत्यांची, तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांसारख्या व्यक्तिमत्त्वांची चित्रे त्यांनी साकारली आहेत. ओम यांचा नवी मुंबईच्या खारघर येथे स्टुडिओ असून, तेथूनच त्यांचा कलाविस्तार सुरू आहे. पुरस्कार आणि सन्मानांपेक्षा ग्राहकांच्या चेहर्‍यावरचे समाधानच त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचे. एखाद्याला आपले चित्र अपेक्षेपेक्षा सुंदर वाटले, त्याच्या भावना त्या चित्रात उतरल्या, तेच मोठे पारितोषिक असल्याचे ते मानतात.
 
आगामी काळात देशातील मोठ्या प्रदर्शनांसोबतच, आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांवर आणि ‘सोलो एझिबिशन्स’वर लक्ष केंद्रित करण्याची त्यांची इच्छा आहे. काळ्या-पांढर्‍या रंगांच्या मर्यादित विश्वातही भावनांचे असंख्य रंग फुलवता येतात, हे ओम यांच्या प्रवासातून दिसते. ओम थडकर यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून अनेकानेक शुभेच्छा!
  




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर