रत्नागिरी जिल्ह्यात लग्गर ससाण्याची पहिली नोंद

    23-Nov-2026

Laggar Falcon in ratnagiri
(छाया - नेत्रा पालकर आपटे)

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्रात अत्यंत दुर्मिळ आणि तुरळक नोंदी असलेल्या लग्गर ससाण्याची (Laggar Falcon) रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच नोंद झाली आहे (Laggar Falcon in ratnagiri). रत्नागिरी शहराजवळील चंपक मैदान या पक्षीवैविध्याने समृद्ध असलेल्या गवताळ अधिवासात हा पक्षी आढळला (Laggar Falcon in ratnagiri). डॉ. प्रणव परांजपे यांना त्याचे दर्शन झाले. जिल्ह्यातील पक्षीवैविध्याच्या नोंदींमध्ये या शिकारी पक्ष्याच्या आगमनामुळे आणखी एका दुर्मिळ प्रजातीची भर पडली आहे. (Laggar Falcon in ratnagiri)

 

लग्गर ससाणा हा ससाणा कुळातील मध्यम आकाराचा शिकारी पक्षी असून, भारतीय उपखंडातील स्थानिक पक्षी आहे. भारतात त्याचा वावर प्रामुख्याने कोरड्या आणि निमशुष्क प्रदेशांमध्ये, मोकळ्या माळरानांवर, गवताळ अधिवासांमध्ये तसेच शेतीच्या परिसरात आढळतो. लहान पक्षी, सरडे आणि लहान सस्तन प्राणी हे त्याचे प्रमुख खाद्य आहे. उंच झाडांवर किंवा खडकाळ ठिकाणी बसून परिसरावर नजर ठेवणे आणि भक्ष्य दिसताच वेगाने झेप घेऊन त्याची शिकार करणे, ही त्याची वैशिष्ट्यपूर्ण पद्धत आहे. या प्रजातीमध्ये मादी नरापेक्षा आकाराने मोठी असते. जागतिक स्तरावर त्याची संख्या घटत असल्याच्या पार्श्वभूमीवर, आययूसीएनच्या लाल यादीत त्याला ‘Near Threatened’ अर्थात निकट धोकाग्रस्त श्रेणीत स्थान देण्यात आले आहे.

 

रत्नागिरी शहराजवळील चंपक मैदान हे पक्ष्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अधिवास आहे. गवताने व्यापलेले विस्तीर्ण पठार, मोकळ्या जागा आणि खुरटी झुडपे यांमुळे स्थानिक पक्ष्यांसह अनेक स्थलांतरित पक्ष्यांना हा परिसर आकर्षित करतो. तणमोरासारख्या संकटग्रस्त पक्ष्यांपासून ते हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारतात येणाऱ्या अमूर ससाण्यापर्यंत विविध पक्ष्यांच्या नोंदी येथे झाल्या आहेत. त्यामुळे चंपक मैदान हे स्थलांतरित पक्ष्यांसाठी महत्त्वाचा थांबा ठरत आहे. साधारण ५०० हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पसरलेल्या या अधिवासात विविध प्रकारच्या शिकारी पक्ष्यांचीही नोंद झाली आहे. चंपक मैदानाच्या गवताळ परिसंस्थेमुळे भक्ष्याची उपलब्धता आणि मोकळ्या जागांमुळे शिकारी पक्ष्यांना अनुकूल परिस्थिती निर्माण होते. याच अधिवासात लग्गर ससाण्याची झालेली नोंद त्याच्या पर्यावरणीय महत्त्वावर प्रकाश टाकते.

 

रत्नागिरी जिल्ह्यात आजवर एकूण ३६७ पक्षी प्रजातींच्या नोंदी झाल्या आहेत. त्यामध्ये आता लग्गर ससाण्याच्या पहिल्या नोंदीची भर पडली आहे. चंपक मैदानासारख्या मोकळ्या गवताळ अधिवासांचे पक्ष्यांच्या स्थलांतर, विश्रांती आणि खाद्यशोधासाठी असलेले महत्त्व या नोंदीतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.





संबंधित मजकूर