कुर्ला मारहाण प्रकरणी विहिंप आक्रमक; कठोर कारवाईची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा!

    23-Nov-2026   
 
 
Kurla Assault Case
 
मुंबई (Kurla Assault Case) : फिनिक्स मॉलच्या मागील बाजूस, एल.बी.एस. मार्ग, कुर्ला (पश्चिम) येथील महानगरपालिका उद्यानात एका तरूण-तरुणीवर काही व्यक्तींनी हॉकी स्टिक, पट्टे आणि दगडांनी हल्ला करून मारहाण केल्याची गंभीर घटना नुकतीच समोर आली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून विश्व हिंदू परिषद कोकण प्रांतने सादर केलेल्या निवेदनाद्वारे प्रशासनाकडे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. बजरंग दलाचे कोकण प्रांत सहसंयोजक गौतम रावरीया यांच्याद्वारे हे निवेदन देण्यात आले आहे.
 
सदर घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच संबंधित परिसरातील १४ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या संशयित अनधिकृत बांधकामांची तपासणी करून नियमभंग आढळल्यास महानगरपालिकेने कारवाई करावी, असे निवेदनात नमूद केले आहे. आरोपींची घरे तसेच संबंधित मदरशांवरही बुलडोझर कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. (Kurla Assault Case)
 
एल विभागातील मदरसे, लॉज, हॉटेल्स आणि इतर आस्थापनांच्या आवश्यक परवानग्यांची तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच परिसरातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे, अनधिकृत फेरीवाले आणि उद्यानांमधील गर्दुल्ले व समाजकंटकांवर तातडीने कारवाई व्हावी, असे म्हटले आहे. कुर्ला परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून या समस्यांचा सामना करावा लागत असून वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. (Kurla Assault Case)
 
या निवेदनाची दखल घेऊन पुढील १५ दिवसांच्या आत ठोस कारवाई करून त्याचा लेखी अहवाल द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मुदतीत ठोस कार्यवाही न झाल्यास विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल (कोकण प्रांत) यांच्या माध्यमातून हजारोंच्या संख्येने नागरिकांना सहभागी करून तीव्र आक्रोश आंदोलन, धरणे आणि मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. हे आंदोलन पूर्णपणे संविधानिक व लोकशाही मार्गाने केले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. (Kurla Assault Case)
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर