भारतीय क्रीडाविश्वाचा दबदबा सध्या जगात वाढता असून, अनेक खेळाडू पदके जिंकून चमकदार कामगिरी बजावत आहेतच. त्याचबरोबर अनेक जागतिक संघटनांच्या प्रमुखपदीही भारतीय विराजमान होत असल्याचे चित्र डोळ्यांना सुखावणारे असेच. एकीकडे यशाची गगनभरारी त्याचवेळी जमिनीशी घट्ट नाते असलेल्या भारतीय क्रीडाविश्वाचा वेध घेणारा हा लेख...
काळच्या वेळी हातात वाफाळत्या चहाचा कप, मग तो टपरीवरचा कडक कटिंग असो वा कुल्हडमधला सोबती आणि क्रीडाविश्वाच्या गप्पा, हा आपला आवडता स्थायीभाव! क्रीडाविश्व हे केवळ मैदानावरच्या चौकार-षटकार किंवा रेकॉर्ड्सपुरते मर्यादित नसते, तर ते एक असे पट मांडते, जिथे मानवी संस्कृती, प्रशासकीय कौशल्य, ऐतिहासिक वारसा आणि राष्ट्रभावनेचे धागे एकत्र गुंफले जात असतात. अलीकडच्या काही दिवसांत क्रीडाक्षेत्रात घडलेल्या काही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रसंगी भूतकाळाच्या वेदनादायक आठवणींना उजाळा देणार्या घटनांनी, पुन्हा एकदा लक्ष भारतीय क्रिकेटकडे आणि आपल्या खेळाडूंच्या ठेव्यांच्या सुरक्षेकडे वेधले.
इंडोनेशियातील बाली बेटांवर ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे’च्या बैठकीत घेतलेले ऐतिहासिक निर्णय, भविष्यातील ‘आयसीसी’ स्पर्धांचे वेळापत्रक, मुंबईच्या गल्लीबोळातील निखळ क्रीडासंस्कृती, नुकतीच सचिन तेंडुलकरने आपल्या ‘क्रिकेट किट’च्या दानावेळी घातलेली भावनिक हाक आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हॉकीचे ध्यानचंद यांच्यापाठोपाठ ओळखले जाणारे बलबीर सिंग सिनियर यांच्या वाट्याला आलेली दुर्दैवी व्यवस्था, या गोष्टी भारतीय क्रीडाविश्वाच्या गौरवशाली, पण आत्मपरीक्षण करायला लावणार्या पैलूंवर प्रकाश टाकणार्या आहेत.
बालीतील शिखर परिषद : ङ-२८ आणि भारतीय नेतृत्वाचा दबदबा...
बाली येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘आयसीसी’च्या महत्त्वाच्या बैठकीत, क्रीडापटलावर भारताचे स्थान किती विश्वासाचे आहे, याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. या बैठकीत जय शाह यांची ‘आयसीसी’ अध्यक्ष म्हणून सलग बिनविरोध पुनर्निवड झाली. ही भारतीय क्रिकेट प्रशासनाने जागतिक स्तरावर मिळवलेल्या अफाट विश्वासार्हतेची साक्ष आहे.
आजचा काळ हा अत्यंत ऐतिहासिक टप्प्यावरून जात आहे. ‘लॉस एंजेलिस ऑलिम्पिक २०२८’ (ङ-२८)मध्ये, तब्बल १२८ वर्षांनंतर क्रिकेटचे ऑलिम्पिकच्या दरबारात पुनरागमन होत आहे. ऑलिम्पिक क्वालिफायर्सची कठीण रचना, जगाच्या कानाकोपर्यांतील असोसिएट देशांपर्यंत क्रिकेट पोहोचवणे आणि खेळाचा व्यावसायिक व क्रीडात्मक समतोल राखणे, हे एक मोठेच शिवधनुष्य. या काळात जागतिक क्रिकेटचे सुकाणू भारताच्या हाती असणे, हे आपल्या देशाच्या वाढत्या क्रीडा-कूटनीतीचे मोठेच यश. तसेच, आगामी काळातील नियोजनानुसार, भारत २०२९च्या ’चॅम्पियनशिप’चेही आयोजन करणार आहे. शिवाय, २०२३ नंतर २०३१च्या एकदिवसीय विश्वचषकाचेही, बांगलादेशसोबत सहयजमानपद भूषवणार आहे. चॅम्पियनशिप भारतात दि. ९ ऑक्टोबर ते दि. २८ ऑक्टोबरदरम्यान, तर एकदिवसीय विश्वचषक दि. ९ नोव्हेंबर ते दि. २३ नोव्हेंबरदरम्यान खेळवला जाणार आहे. ही प्रशासकीय आणि आयोजनविषयक जय शाहंची ‘बॅटिंग’, जागतिक स्तरावर खेळाचे भवितव्य ठरवण्यात अत्यंत निर्णायक ठरताना दिसत आहे.
सचिन तेंडुलकरचा भावनाप्रवास आणि ‘किट’ची भेट...‘माझ्या शरीराचा एक भाग जपा!’
एका बाजूला देशाची प्रशासकीय उच्चता जागतिक स्तरावर गाजत असताना, दुसरीकडे मुंबईत घडलेली एक घटना क्रीडाप्रेमींच्या काळजाला स्पर्शून गेली. ‘क्रिकेटचा देव’ असलेल्या सचिन तेंडुलकरने नुकतेच ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’च्या संग्रहालयास, त्याच्या २५ बॅट्स आणि ‘क्रिकेट किट’मधील अत्यंत महत्त्वाच्या वस्तू भेट दिल्या. याप्रसंगी सचिन अत्यंत भावूक होत म्हणतो, "माझे क्रिकेट किट हा माझ्या शरीराचाच एक भागच होता. त्यातील वस्तू आणि बॅट आज मी तुम्हाला भेट म्हणून देत आहे. असे समजा की, मी माझ्या शरीराचा एक भागच तुम्हाला भेट म्हणून देत आहे; त्याला प्लीज जपा!” सचिनचे हे शब्द केवळ एका खेळाडूची भावना नसून, त्याने आपल्या जिद्दीने आणि कष्टाने उभारलेल्या आयुष्याचा तो एक अमूल्य ठेवा होता. त्यालाच सांभाळण्याची विनंती त्याने अत्यंत आर्ततेने केली.
बलबीर सिंग सिनियर आणि सरकारी गलथानपणा कारभार : एक विदारक इतिहास...
सचिनच्या या उद्गारानंतर भारतीय क्रीडा इतिहासातील एका अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना नकळत डोळ्यांसमोर उभी राहते. भारताचे महान हॉकीपटू आणि देशाला तीनवेळा ऑलिम्पिक सुवर्णपदके मिळवून देणारे बलबीर सिंग सिनियर यांच्याबाबतीतला तो काळोखी अध्याय प्रत्येक क्रीडाप्रेमीला सुन्न करणाराच.
१९८५ मध्ये ‘भारतीय क्रीडा प्राधिकरणा’ने (साई) देशातील तरुणांना प्रेरणा मिळावी, यासाठी दिल्ली येथे एक ‘राष्ट्रीय क्रीडा संग्रहालय’ उभारण्याचा प्रस्ताव ठेवला. प्राधिकरणाच्या विनंतीला मान देऊन बलबीर सिंग सिनियर यांनी, आपल्या आयुष्यभराची कमाई असलेला अमूल्य खजिना दिल्लीतील ‘साई’च्या सचिवांकडे सुपूर्द केला. यामध्ये त्यांच्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील ३६ पदके, १९५६च्या मेलबर्न ऑलिम्पिकमधील भारतीय संघाचा कर्णधारपदाचा ब्लेझर (कोट) आणि १२० ते १३० हून अधिक अत्यंत दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश होता. परंतु, घडले निकृष्ट राजकारण आणि सरकारी अनास्था! परंतू, १९८५ मध्ये वस्तू ताब्यात घेतल्यावर ‘साई’ने ते नियोजित क्रीडा संग्रहालय कधीच उभारले नाही.
२०१२ लंडन ऑलिम्पिकमधील धक्कादायक घटना उघडकीस : या घटनेला २७ वर्षे लोटल्यावर, २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती’ने, ऑलिम्पिकच्या ११६ वर्षांच्या इतिहासातील १६ महान खेळाडूंच्या यादीत बलबीर सिंग सिनियर यांची निवड केली. लंडनमधील ‘रॉयल ऑपेरा हाऊस’ येथे होणार्या प्रदर्शनासाठी, समितीने त्यांचा १९५६चा मेलबर्न ऑलिम्पिक ब्लेझर मागवला.
वस्तू हरवल्याची बेजबाबदार कबुली : जेव्हा बलबीर सिंग यांनी तत्कालीन क्रीडामंत्री, तसेच ‘साई’कडे दोन आठवड्यांसाठी आपलाच ब्लेझरची मागणी केली, तेव्हा ‘साई’च्या अधिकार्यांनी त्यांच्याकडे यातील कोणतीही वस्तू सापडत नसल्याचे सांगितले.
टोलवाटोलवी : त्यांची कन्या सुशबीर भोमिया आणि नातू कबीर यांनी या वस्तू शोधण्यासाठी, दिल्लीपासून पतियाळापर्यंत सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवले. दिल्ली कार्यालयाने हे सामान पतियाळा केंद्रात पाठवल्याचे सांगितले, तर पतियाळा अधिकार्यांनी आमच्याकडे काहीच नसल्याचे सांगून हात झटकले.
वयाच्या नव्वदीनंतरही आपली पदके आणि ब्लेझर परत मिळवण्यासाठी धडपडणार्या बलबीर सिंग सिनियर यांना, अखेर मे २०२० मध्ये वयाच्या ९५व्या वर्षी आपला हा अमूल्य ठेवा पुन्हा न पाहताच जगाचा निरोप घ्यावा लागला. त्यांच्या कन्येने (सुशबीर भोमिया) उद्विग्न होऊन म्हटले होते की, "एका महान खेळाडूने देशाला प्रेरणा मिळावी म्हणून दिलेल्या अमूल्य भेटी इतक्या बेजबाबदारपणे हरवणे, हे अत्यंत संतापजनकच आहे.” अलीकडेच माजी हॉकी कर्णधार एम. एम. सोमय्या यांची चोरीला गेलेली ऑलिम्पिक पदके पोलिसांनी शोधून काढल्यावर, सुशबीर यांनी समाजमाध्यमांवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला होता की, "साई’कडून हरवलेली माझ्या वडिलांची ३६ पदके आणि ब्लेझर शोधण्यासाठी, मी कोणत्या पोलिसांकडे तक्रार करू?”
सचिनची सुरक्षितता आणि प्रशासकीय सुवर्णमध्य...
बलबीर सिंग सिनियर यांच्यावर आलेली ही दुर्दैवी वेळ कोणाही खेळाडूवर येऊ नये. ‘साई’सारख्या आस्थापनांमध्ये ऐतिहासिक ठेवा जतन करण्याबाबत जी अनास्था आणि उदासीनतेचा कारभार त्याकाळी पाहायला मिळाला, तो भारतीय क्रीडाविश्वाच्या काळजावरचा एक मोठा वळ होता. परंतु, आज सगळ्यांनाच याचा दिलासा आहे की, सचिन तेंडुलकरने आपल्या ‘किट’च्या ज्या वस्तू ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’च्या संग्रहालयाला सुपूर्द केल्या आहेत, त्या ठिकाणी आधुनिक व्यवस्थापन, सचोटी आणि ऐतिहासिक ठेव्यांचे महत्त्व जाणणारी यंत्रणा सक्षम आहे. सरकार असो वा संघटना, खेळाडूंच्या कष्टाचे चीज करणार्या अशा वस्तूंचे जतन करणे, ही राष्ट्राची नैतिक जबाबदारी असते.
मुंबईचा ‘कुल्हड चहा’ आणि गल्ली क्रिकेटचा अमूल्य जिव्हाळा...
एकीकडे बालीच्या बैठका आणि संग्रहालयासाठी ‘किट’ सुपूर्द करण्याचे सोहळे, तर दुसरीकडे भूतकाळातील वेदनांचे सावट, या सार्या प्रवासात आपल्या मातीची आणि लोकजीवनाची ताकद किती अफाट आहे, याची प्रचिती देणाराच एक सुंदर प्रसंग मुंबईच्या ‘बॅलार्ड इस्टेट’मध्ये घडत होता. क्रिकेटचा महानायक सचिन तेंडुलकर जेव्हा ब्रिटनचे प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस कॅथरीन (केट मिडलटन) यांच्यासोबत, मुंबईच्या रस्त्यावर उतरून शाळकरी मुलांसोबत ‘गल्ली क्रिकेट’ खेळतो, तेव्हा तो संस्कृतींचाच एक सुंदर संवाद असतो!
ज्या ब्रिटनमध्ये क्रिकेटचा जन्म झाला, त्याच देशाचे शाही वारसदार भारताच्या गल्लीबोळात खेळतात आणि नंतर स्थानिक टपरीवर थांबून मातीच्या पारंपरिक ‘कुल्हड’मधला ‘कडक चाय’ रिचवत दिलखुलास गप्पाही मारतात. मोठे किताब, आंतरराष्ट्रीय पदे आणि कोट्यवधींचे साम्राज्य एका बाजूला, पण सामान्यांच्या विश्वात मिसळण्याची आणि मातीशी नाळ घट्ट ठेवण्याची वृत्तीच क्रीडाविश्वाला निखळ आनंद देऊन जाते. हाच तो ‘लोकल ते ग्लोबल’ असा प्रवास आहे, जो भारतीय संस्कृतीचाही पाया आहे.
प्रशासकीय उच्चता, इतिहासाचा धडा आणि मातीशी नाते...
आपण जेव्हा आजच्या क्रीडाजगताकडे पाहतो, तेव्हा लक्षात येते की, भारतीय क्रिकेटचे यश हे केवळ विराट स्टेडियम्स किंवा अब्जावधींच्या टीव्ही अधिकारांपुरतेच सीमित नाही. त्याचे मूळ एकात्मिक दृष्टिकोनात आहे.
धोरणात्मक सुदृढता आणि जागतिक नेतृत्व : ऑलिम्पिकसारख्या महामंचावर क्रिकेटला प्रतिष्ठा मिळवून देणारे निर्णय आणि ‘आयसीसी’च्या माध्यमातून, संपूर्ण जगातील क्रिकेटला दिशा देणारे सक्षम सुकाणू.
ऐतिहासिक ठेव्यांचे जतन : बलबीर सिंग सिनियर यांच्यासारख्या दिग्गजांच्या वाट्याला आलेल्या दुर्दैवी अनुभवांपासून आणि सरकारी अनास्थेपासून धडा घेऊन, सचिनच्या ‘किट’सारख्या अमूल्य ठेव्यांचे ‘एमसीए’सारख्या संस्थांद्वारे सुरक्षित संवर्धन करणे.
गल्लीबोळातील क्रिकेटचे संस्कार टपरीवरचा कडक कुल्हड चहा आणि सामान्यांच्या हृदयात घर करणारी खेळाची आपुलकी! जेव्हा एखादा देश प्रशासकीय पातळीवर जगाचे नेतृत्व करतो, आपल्या खेळाडूंच्या त्यागाचा योग्य सन्मान करतो आणि तरीही आपल्या मातीची पाळेमुळे घट्ट राखून असतो, तेव्हाच तो खरा क्रीडा महासत्ता होतो. बालीतील प्रशासकीय विजय असो, भविष्यातील जागतिक स्पर्धेत भारताचे यजमानपद असो, मुंबईच्या रस्त्यावरील तो कुल्हड चहा असो, वा सचिनच्या ‘किट’च्या जतनाची भावनिक साद आणि बलबीर सिंग सिनियर यांच्या संघर्षाचा वारसा असो; हे सगळेच पैलू एकत्र आल्यावरच भारतीय क्रीडाविश्वाचे खरे आणि वास्तववादी स्वरूप आपल्यासमोर उभे राहते. आगामी काळात ऑलिम्पिकच्या वाटेने जाणारे आपले क्रिकेट जितके आधुनिक, उच्चपदस्थ आणि जागतिक असेल, तितकेच ते आपल्या इतिहासातील चुका सुधारत, आपल्या गल्ल्यांमधल्या त्या मातीशी आणि साधेपणाशी जोडलेले राहील, यात शंका नाही!
-श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)