सिंधुदुर्गात युरेशियन शिंगळा घुबडाची प्रथमच नोंद; आंबोलीत झाले दर्शन

    23-Nov-2026

 

Eurasian Scops Owl in sindhudurg
सिंधुदुर्ग (अक्षय मांडवकर) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पक्षीवैभवात एका दुर्मिळ निशाचर पक्ष्याची भर पडली आहे (Eurasian Scops Owl in sindhudurg). युरेशियन शिंगळा घुबड (Eurasian Scops Owl) या घुबडाची जिल्ह्यात प्रथमच नोंद झाली असून, आंबोली येथे पक्षीनिरीक्षकांना त्याचे दर्शन घडले (Eurasian Scops Owl in sindhudurg). आकाराने लहान आणि वृक्षांमध्ये सहज मिसळून जाणाऱ्या या घुबडाच्या नोंदीमुळे सिंधुदुर्गच्या पक्षीवैविध्यात महत्त्वाची भर पडली आहे. (Eurasian Scops Owl in sindhudurg)
 
 
युरेशियन शिंगळा घुबड हा साधारण १८ ते २० सेंमी लांबीचा पक्षी असून, त्याच्या शरीरावरील तपकिरी-करड्या रंगाची पिसे आणि त्यावरील रेषा यामुळे तो झाडाच्या सालीमध्ये सहज मिसळून जातो. डोक्यावर असलेले छोटे तुरा-सदृश पिसांचे उभार हे त्याचे वैशिष्ट्य आहे. दिवसा झाडांच्या फांद्यांवर स्थिर बसून राहणारा हा पक्षी रात्री सक्रिय होतो. त्याच्या रंगसंगतीमुळे दिवसा त्याला शोधणे कठीण असते. युरेशियन शिंगळा घुबडाचा प्रजनन अधिवास युरोप आणि पश्चिम आशियातील अनेक भागांत पसरलेला आहे. हिवाळ्यात तापमानातील घट आणि अन्नाची कमतरता टाळण्यासाठी त्याच्या काही लोकसंख्या आफ्रिकेतील सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील भागात स्थलांतर करतात. हे स्थलांतर प्रामुख्याने रात्रीच्या वेळी होत असल्याने त्याच्या प्रवासाचा मागोवा घेणे आव्हानात्मक असते. भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, या पक्ष्याचा वावर नियमित नसून त्याच्या नोंदी अत्यंत तुरळक आहेत.
 
 
आंबोली येथे या घुबडाचे दर्शन पक्षीनिरीक्षक डॉ. श्रीकृष्ण मगदूम, प्रवीण सातोसकर, मकरंद नाईक आणि कौस्तुभ कोरगावकर यांना घडले. त्यांच्या निरीक्षणातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात या प्रजातीची पहिली नोंद अधोरेखित झाली आहे. आंबोलीसारख्या जैवविविधतेने समृद्ध असलेल्या पश्चिम घाटातील अधिवासांमध्ये स्थलांतरित आणि दुर्मिळ पक्ष्यांच्या नोंदी सातत्याने समोर येत आहेत. या घुबडाचा आवाज एकसुरी, लयबद्ध आणि ठराविक अंतराने वारंवार ऐकू येणारा असतो. रात्रीच्या वेळी तो आपल्या आवाजातून जोडीदाराशी संपर्क साधणे आणि क्षेत्राची उपस्थिती दर्शविणे यांसारख्या वर्तनासाठी आवाजाचा वापर करतो. आकाराने लहान असला, तरी निशाचर जीवनशैली, गुप्त वावर आणि परिसराशी जुळवून घेणारी रंगसंगती यामुळे तो पक्षीनिरीक्षकांसाठी आकर्षण ठरतो.
 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वी घुबडाच्या ११ प्रजातींची नोंद होती. युरेशियन शिंगळा घुबडाच्या नव्या नोंदीमुळे जिल्ह्यातील घुबड प्रजातींची संख्या आता १२ झाली आहे. जिल्ह्यातील विविध अधिवासांमध्ये पक्ष्यांचे निरीक्षण, नोंदी आणि अभ्यास सुरू असल्याने भविष्यातही अशा दुर्मिळ प्रजातींच्या नोंदी समोर येण्याची शक्यता आहे.

 





संबंधित मजकूर