समुद्रातील जैवविविधतेचे संवर्धन आणि किनारी समुदायांची उपजीविका या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शार्क, रे, गिटारफिश यांसारख्या संकटग्रस्त सागरी प्रजातींचा अभ्यास करण्यापासून ते पारंपरिक मच्छीमारांची पोषण सुरक्षा, शाश्वत मत्स्यव्यवसाय आणि युवकांमधील नेतृत्वगुण विकसित करण्यापर्यंतचे काम ‘दक्षिण फाऊंडेशन’ गेल्या दशकभरापासून मालवणच्या किनारपट्टीवर करत आहे. संशोधन आणि स्थानिक समुदायांचा सहभाग यांची सांगड घालत संस्थेने सागरी संवर्धनाला सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणाची जोड दिली आहे.
हाराष्ट्राच्या विस्तीर्ण किनारपट्टीवर सागरी जैवविविधतेचे संवर्धन आणि पारंपरिक मासेमारीवर अवलंबून असलेल्या समुदायांचे जीवनमान हे एकमेकांशी घट्ट जोडलेले आहे. समुद्रातील मत्स्यसंपत्तीचे बदलते स्वरूप, धोक्यात आलेल्या सागरी प्रजाती, मासेमारीच्या पद्धतींमधील बदल आणि मत्स्यव्यवसायाच्या बाजारपेठेतील वाढते औद्योगिकीकरण अशा अनेक आव्हानांचा सामना किनारी समुदायांना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर सागरी परिसंस्थांचे संवर्धन आणि स्थानिक समुदायांचे सक्षमीकरण या दोन्ही बाबींचा एकत्रित विचार करून ‘दक्षिण फाउंडेशन’ (Dakshin Foundation) ही संस्था गेल्या दशकभरापासून महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर कार्यरत आहे. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण परिसरात संस्थेने सागरी जैवविविधता, मत्स्यव्यवसाय, पोषण सुरक्षा आणि युवकांच्या नेतृत्व विकासाच्या क्षेत्रात विविध उपक्रम हाती घेतले आहेत.
दक्षिण फाउंडेशनच्या कामाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे समुद्रातील संकटग्रस्त प्रजातींचा अभ्यास आणि संवर्धन. यामध्ये समुद्री साप, शार्क, रे (पाकट) आणि गिटारफिश यांसारख्या प्रजातींचा समावेश आहे. संस्थेच्या ‘मरीन फ्लॅगशिप्स’ (Marine Flagships) या कार्यक्रमांतर्गत मालवणच्या किनारपट्टीवर शार्क, रे आणि गिटारफिश यांचे दीर्घकालीन निरीक्षण केले जाते. यासाठी संस्थेचे संशोधक नियमितपणे मासळी उतरवण्याच्या ठिकाणी (Landing Sites) सर्वेक्षण करतात. या सर्वेक्षणांमधून मच्छीमारांच्या जाळ्यात अडकणार्या संकटग्रस्त प्रजाती, त्यांच्या पकडीचे प्रमाण आणि त्यासंबंधीचे बदल नोंदवले जातात.
या संशोधनामध्ये केवळ वैज्ञानिक निरीक्षणांनाच महत्त्व दिले जात नाही, तर स्थानिक मच्छीमारांकडे पिढ्यान्पिढ्या संकलित झालेले पारंपरिक पर्यावरणीय ज्ञानही नोंदवले जाते. समुद्रातील विशिष्ट प्रजातींचे वास्तव्य, त्यांच्या हालचाली, आढळण्याचा काळ आणि किनारपट्टीवरील बदल याविषयी मच्छीमारांना असलेली माहिती सागरी जैवविविधतेच्या अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. गिटारफिशच्या संशोधनासाठी संस्थेकडून समुद्रकिनार्यांवर नियमित निरीक्षण फेर्या (Beach Transects) घेतल्या जातात. यामध्ये या माशांचे किनार्यावरील आढळण्याचे ठिकाण आणि समूहाने आढळण्याच्या नोंदी केल्या जातात. अशा दीर्घकालीन निरीक्षणांमधून मालवणच्या सागरी जैवविविधतेविषयी अधिक व्यापक माहिती संकलित करण्याचा प्रयत्न आहे.
सागरी संवर्धनाबरोबरच किनारी समुदायांचे आर्थिक आणि सामाजिक प्रश्न समजून घेण्यावरही संस्थेचा भर आहे. यासाठी ‘सीचेंज’ (SeaChange) हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. निरोगी सागरी परिसंस्था आणि समृद्ध किनारी समुदाय यांची निर्मिती हे या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सागरी संवर्धन, शाश्वत मत्स्यव्यवसाय, स्थानिक उपजीविका, संसाधनांचे व्यवस्थापन, आरोग्य आणि सामुदायिक कल्याण या परस्परांशी संबंधित विषयांचा एकत्रित अभ्यास या कार्यक्रमांतर्गत केला जातो. एखाद्या समस्येकडे स्वतंत्रपणे न पाहता तिचा संपूर्ण सामाजिक आणि पर्यावरणीय व्यवस्थेवर होणारा परिणाम समजून घेण्याच्या ‘सिस्टम्स थिंकिंग’ (Systems Thinking) या दृष्टिकोनाचा येथे वापर केला जातो.
महाराष्ट्रातील पारंपरिक मच्छीमार समुदायांची पोषण सुरक्षा आणि हवामान बदलाच्या परिणामांशी जुळवून घेण्याची क्षमता निर्माण करण्यात लहान माशांची भूमिका काय असू शकते, तसेच लहान माशांचे आहारातील महत्त्व आणि बदलत्या पर्यावरणीय परिस्थितीत त्यांची उपलब्धता किनारी समुदायांसाठी कशी उपयुक्त ठरू शकते, हे समजून घेण्याचा या संशोधनाचा दक्षिण चा प्रयत्न आहे. संवर्धन आणि संशोधनाच्या कामाला स्थानिक नेतृत्वाची जोड देण्यासाठी संस्थेने ‘ओशन स्टीवर्ड्स’ (Ocean Stewards) हा उपक्रमही सुरू केला आहे. या उपक्रमातून स्थानिक मच्छीमार समुदायातील युवकांच्या कौशल्यांचा आणि नेतृत्व क्षमतेचा विकास करण्यावर भर दिला जातो. युवकांना समुदाय विकास आणि शाश्वत मत्स्यव्यवस्थापनातील भविष्यातील नेतृत्व म्हणून घडवणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. स्थानिक संसाधनांविषयीचे ज्ञान, समुदायातील प्रश्नांची समज आणि संवर्धनाच्या कामातील सहभाग यांच्या आधारे युवकांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
‘दक्षिण फाउंडेशन’चे काम केवळ संशोधन आणि प्रकल्पांपुरते मर्यादित नाही. स्थानिक संस्था, मच्छीमार सहकारी संस्था आणि संबंधित शासकीय यंत्रणांशी नियमित संवाद साधून संस्थेने मालवण परिसरातील समुदायांशी संबंध निर्माण केले आहेत. सागरी संसाधनांचे व्यवस्थापन करताना स्थानिक समुदायांचा सहभाग आणि त्यांचे पारंपरिक ज्ञान यांना महत्त्व देणे आवश्यक असल्याची भूमिका संस्थेच्या कामातून दिसून येते.
आगामी काळात महाराष्ट्रातील लहान स्तरावरील पारंपरिक मच्छीमार समुदायांसोबत सहकार्य वाढवणे, स्थानिक पातळीवर कौशल्य आणि क्षमता विकसित करणे तसेच किनारी आणि सागरी संसाधनांचे शाश्वत व न्याय्य व्यवस्थापन करण्यावर संस्थेचा भर राहणार आहे. सागरी जैवविविधतेचे संरक्षण आणि किनारी समुदायांचे कल्याण या दोन्ही गोष्टी स्वतंत्र नसून परस्परावलंबी आहेत. त्यामुळे समुद्राचे संवर्धन करताना समुद्रावर अवलंबून असलेल्या समुदायांच्या गरजा, उपजीविका आणि अन्नसुरक्षा यांचाही विचार करणे आवश्यक आहे. दक्षिण फाउंडेशनच्या मालवणमधील दशकभराच्या कार्यातून याच एकात्मिक दृष्टिकोनाला चालना मिळत आहे.