‘संपुआ’च्या सत्ताकाळात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात शांततेची कबुतरे उडवणारी काँग्रेस, आज पाकिस्तानी मंत्र्याच्या भारतातील हजेरीवरुन बोंबाबोंब करत आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील राजनैतिक शिष्टाचारही काँग्रेसला सरकारविरोधी कोल्हेकुईची संधी वाटत असेल, तर हा केवळ विरोधाभास नव्हे, तर राजकीय दुटप्पीपणाचा कळसच!
दिल्लीत दि. २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या ‘शांघाय सहकार्य संघटने’च्या (एससीओ) पहिल्या ‘सिव्हिलायझेशनल डायलॉग फोरम’मध्ये, पाकिस्तानचे हवामानबदलमंत्री डॉ. मुसादिक मसूद मलिक सहभागी झाले. मे २०२५ मधील भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षानंतर पाकिस्तानी मंत्र्याचा हा पहिलाच भारतदौरा. त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झाले. मात्र, या कार्यक्रमाचे स्वरूप लक्षात घेता काही मूलभूत बाबी स्पष्ट करणे आवश्यक असेच. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी पाकिस्तानी मंत्र्याच्या या सहभागावरून केंद्र सरकारवर टीका केली. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला, कुलगाममध्ये अलीकडेच सुरक्षा दलांवर हल्ला झाला. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या मंत्र्याचे स्वागत कशासाठी, असा त्यांचा सवाल. मलिक यांनी सिंधू नदी पाणी प्रश्नावर भारताला धमकी दिल्याचा दाखला देत, त्यांना बिर्याणी, कबाब आणि खीर वाढणार का? असेही सरकारला विचारले.
मलिक यांनी ‘सिंधू पाणी करारा’च्या मुद्द्यावरून आमच्या पाण्यावर दावा करणार्यांचे हात तोडू, अशी धमकी दिल्याचे वृत्त होते. भारताने पहलगाम हल्ल्यानंतर ‘सिंधू पाणी करार’ स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला असून, तो अद्यापही कायम आहे. त्यामुळे एका आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानी प्रतिनिधीची उपस्थिती आणि भारत-पाकिस्तानमधील द्विपक्षीय संबंध यांची सरमिसळ करणे योग्य नाही. मुळातच, ‘एससीओ’च्या चौकटीतील हा बहुपक्षीय कार्यक्रम होता. भारताने संघटनेच्या सर्व सदस्य देशांना, निरीक्षकांना निमंत्रण दिले होते. पाकिस्तान हा ‘एससीओ’चा सदस्य असल्याने त्यालाही निमंत्रण देण्यात आले. पाकिस्तानने प्रतिनिधी म्हणून मुसादिक मलिक यांना पाठवले. याचा अर्थ भारताने पाकिस्तानला स्वतंत्र द्विपक्षीय चर्चेसाठी बोलावले, असा होत नाही. मात्र त्यावरून पाकिस्तानशी द्विपक्षीय संवाद सुरू झाला, असा निष्कर्ष काढण्याचा उतावीळपणा काँग्रेस करताना दिसत आहे. बहुपक्षीय मंचावरील सहभाग आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताची कठोर भूमिका, या दोन स्वतंत्र बाबी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दहशतवादाला ठोस उत्तर देताना, आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पुराव्यानिशी पाकिस्तानला एकटे पाडले आहे. उलटपक्षी, ‘संपुआ’चे एक दशक दहशतवाद्यांचा निषेध करण्यातच गेले, हे देश विसरलेला नाही.
दि. २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री पी. चिदंबरम हल्लेखोर पाकिस्तानातून आल्याचे पुरावे मागत होते तर, इतर काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष पाकिस्तानला लाभदायक ठरणारी विधाने करण्यातच रंगले होते. राहुल गांधी यांनी तर सरकारच्या राजकीय इच्छाशक्तीवरच टीका केली होती. ज्या पक्षाने सैन्याच्या यशावर शंका घेतली, तोच पक्ष आज आंतरराष्ट्रीय परिषदेच्या राजनैतिक शिष्टाचारावरून सरकारला जाब विचारत आहे, ही काँग्रेसची भूमिका पाहून सरडाही लाजेल.
दि. २६ नोव्हेंबर २००८ रोजीच्या मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर, तत्कालीन हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल फली होमी मेजर यांनी भारतीय हवाई दलाकडे मुरीदके आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ‘लष्कर-ए-तोयबा’च्या तळांची अचूक माहिती होती. तसेच, हवाई दल प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज होते. मात्र, तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील संपुआ सरकारने त्यावेळी परवानगी नाकारल्याचे, वेळोवेळी सांगितले आहे. याउलट, विद्यमान केंद्र सरकारने दहशतवादी हल्ल्यांनंतर थेट लष्करी कारवाई करून, दहशतवादाविरोधात ठोस धोरण राबवले. ज्या काँग्रेसने आपल्या कार्यकाळात भारतात दहशतवादी हल्ले झाल्यानंतर, निषेधाची कबुतरे उडवण्यातच धन्यता मानली, त्याच काँग्रेसने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वितेवरच प्रश्नचिन्ह उभे करावे? हा विरोधाभास चकित करणाराच.
याच दरम्यान, चीनमधील शेंझेन येथे दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी अमेरिका, चीन आणि रशियाच्या प्रमुखांमध्ये झालेल्या त्रिपक्षीय बैठकीचा संदर्भ देत, राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर ‘कॉम्प्रोमाईज्ड पीएम’ अशी टीका केली. तसेच, अमेरिकेतील एका संवादात त्यांनी जागतिक घडामोडींमध्ये भारताचे परराष्ट्र धोरण बाजूला पडल्याचा आरोप केला. राहुल गांधींच्या या विधानांवर केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी आक्षेप घेत काँग्रेससमोर थेट प्रश्न उपस्थित केले आहेत. अरुणाचल प्रदेशातील स्वतःच्या सीमावर्ती गावाचा उल्लेख करत रिजिजू यांनी विचारले की, १९६२च्या भारत-चीन युद्धात चीनने भारतीय भूभाग बळकावला आणि लष्कर व स्थानिक जनतेला वार्यावर सोडले, त्या पराभवाबद्दल काँग्रेस देशाची माफी मागणार का? स्वातंत्र्यानंतर अनेक दशके देश गरिबीत का राहिला आणि भारतीय अर्थव्यवस्थेची ‘हिंदू विकासदर’ अशी संभावना का झाली, याचे उत्तरही काँग्रेसने द्यावे. राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण या पक्षीय राजकारणाच्या बाबी नाहीत.
पाकिस्तानकडून दहशतवादाला मिळणारे पाठबळ थांबले पाहिजे, ही भारताची भूमिका स्पष्ट आहे. त्याचवेळी ‘एससीओ’सारख्या संघटनांमधील सहभागातून भारत आपले जागतिक हितसंबंध जपतो आहे. काँग्रेसला जी तथ्यहीन टीका करायची ती करु दे अखेरीस परराष्ट्र धोरणाची कसोटी कोणत्या नेत्याने कोणते छायाचित्र प्रसिद्ध केले, यावर नव्हे; तर भारताची सुरक्षा, स्वायत्तता आणि राष्ट्रीय हित किती प्रभावीपणे जपले गेले, यावरच ठरणार आहे.