बांगलादेशात लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार सध्या सत्तेवर असले, तरी तेथील राजकीय अस्थिरता आणि हिंसाचार थांबण्याचे नाव नाही. ऑगस्ट २०२४च्या तीव्र जनआंदोलनामुळे, तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना पदत्याग करून देश सोडून पलायन करावे लागले. त्यादरम्यान बांगलादेशात अभूतपूर्व अराजकता निर्माण झाली. फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत, ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ अर्थात ’बीएनपी’ने विजय मिळवला. त्यानंतर तारिक रहमान पंतप्रधानपदीही विराजमान झाले. नवे सरकार सत्तेत आल्याने देशातील नागरिकांचा सरकारविरोधातील असंतोष मावळेल, अशी शक्यता वर्तवली जात होतीच. मात्र ती फोल ठरल्याचेच चित्र आहे. बांगलादेशातील आंदोलने, हिंसाचार, निदर्शने, मोर्चे आजही कायम आहेत. या असंतोषामागे इतिहास आणि अलीकडच्या काळातील घडामोडीही कारणीभूत आहेत.
बांगलादेशच्या राजकारणावर गेल्या तीन दशकांपासून, दोन घराण्यांचेच वर्चस्व राहिले आहे. एक म्हणजे, अवामी लीगच्या शेख हसीना आणि दुसरे म्हणजे, ‘बीएनपी’चे तारिक रहमान. मात्र, या दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये संवादाऐवजी संघर्षच अधिक पाहायला मिळाला. त्याचे पर्यवसान देशातील अस्थिरतेपर्यंत पोहोचले. सध्याही तसेच होताना दिसत आहे.
भारतात आश्रयाला असलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी, डिसेंबर २०२६मध्ये मायदेशी परतण्याची आणि न्यायालयासमोर हजर राहण्याची इच्छा व्यक्त केली. यासाठी त्यांच्या वकिलांनी नवीन पारपत्र आणि राष्ट्रीय ओळखपत्राची मागणी केली; परंतु रहमान सरकारने ही विनंती फेटाळली. दुसर्या घटनेत नोव्हेंबर २०२५मध्ये हसीना यांना, मानवतेविरुद्धच्या गुन्ह्याप्रकरणी मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. या शिक्षासुनावणीला नुकतीच वर्षपूर्ती झाली. आणि तिसरी घटना म्हणजे त्यांच्या ‘अवामी लीग’ पक्षावरच बंदी घालण्यात आली.
या तिन्ही घटनांतून लोकशाहीच्या पायमल्लीचा आरोप, अवामी लीगच्या समर्थकांनी केला आहे. तो रास्त असून, त्याविरोधात अवामी लीगच्या समर्थकांनी देशव्यापी आंदोलनाचे हत्यार उपसले. त्यामुळे बांगलादेशात पुन्हा एकदा अस्थिरतेचा वणवा भडकला आहे. हे झाले एक कारण; पण हिंसाचार केवळ अवामी लीगच्या असंतोषामुळेच उफाळून आलेला नाही. त्याला अन्यही कारणे आहेत.
सार्वत्रिक निवडणुकीआधी ‘बीएनपी’ने राजकीय स्थिरता, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक सुधारणांची भलीमोठी आश्वासने दिली होती. ती कशाच्या आधारावर दिली, हे त्यांचे त्यांनाच ठावूक! प्रचारादरम्यान ‘बीएनपी’चे नेते शेख हसीना यांच्या सरकारवर तुटून पडले होते. त्यांच्यावर अकार्यक्षम, भ्रष्टाचाराचे आरोप करतच, तारिक रहमान यांचे सरकार सत्तेत आले. आधी अंतरिम आणि नंतर लोकनियुक्त सरकार असतानाही, रहमान यांनी नागरिकांचा भ्रमनिरासच केला. प्रचारादरम्यानची आश्वासने हा निव्वळ जुमला असल्याचेच अप्रत्यक्षपणे दाखवून दिले. मोठमोठी स्वप्ने दाखवून सत्तेत आलेल्या या सरकारला महागाई नियंत्रणात आणण्यात, रोजगारनिर्मितीत अपयश आल्याने जनतेचा रोष वाढला. वाढत्या महागाईमुळे वेतनवाढ करण्याची मागणी करत, बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेले वस्त्रोद्योग कामगारांनी आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे महागाई, बेरोजगारी आणि कामगारांच्या वेतनवाढीसारख्या आर्थिक मुद्द्यांवरूनही देशात असंतोष असल्याचे उघड होते.
सत्तांतरानंतरही बांगलादेशातील राजकीय अस्थिरता अद्याप संपलेली नाही. रस्त्यावरील हिंसाचार रोखणे, प्रशासकीय पकड मजबूत करणे आणि विरोधी पक्षांशी समन्वय साधून देशात शांतता प्रस्थापित करणे, हीच रहमान सरकारची मोठी कसोटी आहे. परंतु, त्यांचे राजकारण आत्मकेंद्रित आणि सुडाचे आहे. पंतप्रधान म्हणून ते त्यांना कदापि परवडणारे नाही. शेख हसीना देशाबाहेर असल्या, तरी पक्षावरील त्यांची पकड मजबूत असून, त्यांना मानणारा कार्यकर्ता मोठ्या संख्येने आहे. सध्याच्या देशव्यापी आणि सरकारच्या हाताबाहेर जाणार्या आंदोलनांवरूनच हे अधोरेखित होते. त्यामुळे विद्यमान सरकारने लोकशाहीच्या चौकटीत राहूनच, शेख हसीना यांना शह देण्यातच त्यांचे भले आहे. अन्यथा, लोकशाही उघडउघड पायदळी तुडवल्यास, त्यांचे सरकार कोसळल्याशिवाय राहणार नाही, याचे भान तारिक रहमान यांना असावे!
-रोहित गुरव