एका प्रकाशदिनाचा प्रवास ....

    22-Nov-2026
 
 
Voyager 1 One Light-Day
 
‘नासा’च्या ‘व्हॉयेजर-१’ या अंतराळयानाने दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी, पृथ्वीपासून एक प्रकाशदिन अंतर गाठण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला. मानवनिर्मित कोणतीही वस्तू यापूर्वी इतक्या दूर पोहोचली नव्हती. जवळपास ४९ वर्षांचा प्रवास, गुरू आणि शनी या ग्रहांचा अभ्यास, सूर्याच्या प्रभाव क्षेत्राच्या पलीकडील अवकाशात प्रवेश आणि आजही सुरू असलेले वैज्ञानिक निरीक्षण हा ‘व्हॉयेजर-१’चा प्रवास, आधुनिक विज्ञानाच्या चिकाटीचा आणि मानवी जिज्ञासेचाच विलक्षण पुरावा.
 
‘नासा’ने या ऐतिहासिक क्षणानिमित्ताने, दि. १७ नोव्हेंबर रोजी जगभरातील नागरिकांना ‘शाईन ब्राईट फॉर व्हॉयेजर्स लाईट-डे’ या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. मोबाईलचा प्रकाश, विजेरी किंवा इतर प्रकाशस्रोतांच्या साहाय्याने, ‘मोर्स’ संकेतपद्धतीत ‘व्हॉयेजर’चे संक्षिप्त नाव ‘VGR’ आकाशाच्या दिशेने चमकवण्याची कल्पना होती.
 
प्रकाशदिन म्हणजे नेमके काय?
 
एका दिवसात प्रकाश जे अंतर पार करतो, त्याला ‘प्रकाशदिन’ म्हणतात. प्रकाशाचा वेग दर सेकंदाला सुमारे २ लाख ९९ हजार ७९२ किलोमीटर आहे. त्यामुळे २४ तासांत प्रकाश जवळपास २५.९ अब्ज किलोमीटर अंतर पार करतो. ‘व्हॉयेजर-१’ पृथ्वीपासून याच अंतरावर पोहोचले आहे. याचा अर्थ, पृथ्वीवरून पाठवलेला रेडिओ संदेश यानापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे २४ तास घेतो. म्हणजेच, साध्या संदेशवहनासाठीही किमान दोन दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. पृथ्वीवरील अंतराळ मोहिमांच्या नियंत्रण कक्षातून क्षणार्धात सूचना पाठवून, लगेच प्रतिसाद मिळवण्याची पद्धत येथे शक्य नाही.
 
१९७७ मध्ये सुरू झालेला प्रवास
 
‘व्हॉयेजर-१’चे प्रक्षेपण दि. ५ सप्टेंबर १९७७ रोजी करण्यात आले. त्याच्या आधी दि. २० ऑगस्ट १९७७ रोजी ‘व्हॉयेजर-२’ अवकाशात झेपावले होते. दोन्ही यानांची निर्मिती सौरमालेतील बाह्य ग्रहांचा अभ्यास करण्यासाठीच करण्यात आली होती. त्याकाळात गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांविषयीची माहिती मर्यादित होती. या ग्रहांचे वातावरण, चुंबकीय क्षेत्र, उपग्रह आणि कड्यांची रचना यांचा जवळून अभ्यास करण्याची, ही ऐतिहासिकच संधी होती. ‘व्हॉयेजर-१’ने १९७९ मध्ये गुरू ग्रहाजवळून प्रवास केला आणि त्यानंतर १९८० मध्ये शनी ग्रहाचे निरीक्षण केले. गुरूच्या उपग्रह आयोवर सक्रिय ज्वालामुखी असल्याचे, त्याने टिपलेल्या प्रतिमांमुळेच स्पष्ट झाले. शनीचा उपग्रह ‘टायटन’च्या वातावरणाविषयीही महत्त्वाची माहिती मिळाली. या निरीक्षणांनी ग्रहविज्ञानाच्या अनेक प्रस्थापित कल्पनांना नवे वळण दिले. ‘व्हॉयेजर-२’ने मात्र अधिक विस्तृत प्रवास केला. त्याने गुरू आणि शनीबरोबरच युरेनस व नेपच्यून यांचाही जवळून अभ्यास केला. या दोन यानांनी मिळून बाह्य सौरमालेचे जे चित्र उभे केले, ते आजही ग्रहविज्ञानाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानले जाते.
 
सूर्याच्या प्रभावक्षेत्राच्या पलीकडे...
 
‘व्हॉयेजर-१’च्या प्रवासातील सर्वांत महत्त्वाचा टप्पा म्हणजे, २०१२ मध्ये त्याने ‘हेलिओपॉज’ ओलांडला. सूर्यापासून सतत बाहेर पडणार्‍या विद्युतभारित कणांच्या प्रवाहाला ‘सौर वारे’ म्हणतात. हा प्रवाह सूर्याभोवती एक प्रचंड संरक्षक क्षेत्र निर्माण करतो. त्याला ‘हेलिओस्फिअर’ म्हणतात. ‘हेलिओस्फिअर’ची बाह्य सीमा म्हणजेच ‘हेलिओपॉज’. येथे सूर्याच्या सौर वाताचा प्रभाव, आंतरतारकीय अवकाशातील पदार्थांच्या प्रभावाशी संतुलित होतो. २०१२ मध्ये ‘व्हॉयेजर-१’ने ही सीमा ओलांडली आणि आंतरतारकीय अवकाशात प्रवेश केला. याचा अर्थ, ते संपूर्ण सौरमालेतून बाहेर पडले आहे, असा नाही. सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाशी संबंधित अतिदूरचा ‘ऊर्ट’ मेघ अजूनही त्याच्या पुढील प्रवासाच्या पलीकडे आहे. त्यामुळे ‘सौरमालेबाहेर’ या शब्दाचा वापर करताना, हा वैज्ञानिक फरक लक्षात घेणे आवश्यक आहे. आंतरतारकीय अवकाश म्हणजे, पूर्णपणे रिकामी पोकळी नव्हे. तेथे अत्यंत विरळ वायू, विद्युतभारित कण, धूळ आणि चुंबकीय क्षेत्रे अस्तित्वात असतात. ‘व्हॉयेजर-१’वरील उपकरणे याच वातावरणाचा अभ्यास करतात. विशेषतः ‘प्लाझ्मा तरंग’ आणि चुंबकीय क्षेत्रांच्या मोजमापांमधून, सूर्याच्या प्रभावक्षेत्राच्या बाहेरील अवकाशाचे स्वरूप समजण्यास मदत होते.
 
अर्धशतकानंतरही सुरू असलेले विज्ञान
 
‘व्हॉयेजर-१’ची निर्मिती १९७०च्या दशकातील तंत्रज्ञानावर झाली. आजच्या तुलनेत त्याची संगणकीय क्षमता अत्यंत मर्यादितच आहे. तरीही, जवळपास अर्धशतक उलटून गेल्यावरही ते पृथ्वीशी संपर्क राखत आहे, हे अभियांत्रिकीचे मोठेच यश आहे. यानाला ऊर्जा पुरवण्यासाठी ‘रेडिओ आइसोटोप थर्मो इलेट्रिक जनरेटर’ वापरण्यात आला. यात ‘प्लुटोनियम-२३८’च्या किरणोत्सर्गी विघटनातून निर्माण होणारी उष्णता, विद्युतऊर्जेत रूपांतरित होते. सौरऊर्जेवर अवलंबून राहणे शक्य नसलेल्या सूर्यापासूनच्या अतिदूर प्रदेशात ही पद्धत उपयुक्त ठरते. मात्र, काळानुसार या जनरेटरची विद्युतनिर्मिती कमी होते. त्यामुळे ऊर्जा वाचवण्यासाठी ‘नासा’ला काही उपकरणे आणि यंत्रणा टप्प्याटप्प्याने बंद कराव्या लागत आहेत. सध्या ‘व्हॉयेजर-१’वरील सर्व वैज्ञानिक उपकरणे कार्यरत नाहीत. तरी चुंबकीय क्षेत्र आणि ‘प्लाझ्मा तरंग’ मोजणार्‍या उपकरणांसारखी काही महत्त्वाची साधने माहिती गोळा करण्यासाठी वापरली जात आहेत. प्रत्येक उपकरण बंद करण्याचा निर्णय घेताना, त्यातून मिळणार्‍या वैज्ञानिक माहितीचे महत्त्व आणि उर्वरित ऊर्जेची उपलब्धता यांचा विचार केला जातो.
 
या मोहिमेचे संचालन करणे, हेही मोठे आव्हानच आहे. यानातील संगणक, विद्युत व्यवस्था किंवा संदेशवहन यंत्रणेत बिघाड झाल्यास, पृथ्वीवरून त्वरित दुरुस्ती करणे शक्य नाही. रेडिओ संदेशाला एका दिशेनेच एक दिवस लागतो. त्यामुळे अभियंत्यांना समस्येचे निदान करणे, आदेश तयार करणे आणि त्याचा परिणाम तपासणे, यासाठी अनेक दिवस किंवा आठवडे लागू शकतात. याचेच ताजे उदाहरण म्हणजे, दि. १४ नोव्हेंबर २०२६ पासून ‘व्हॉयेजर-१’कडून वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी माहिती पृथ्वीवर येणे थांबले. ‘नासा’च्या ‘डीप स्पेस नेटवर्क’ला यानाचा वाहक रेडिओ संकेत मिळत होता. मात्र, त्यासोबत अपेक्षित माहिती मिळत नव्हती. याचा अर्थ, यानाशी संपर्क पूर्णपणे तुटलेला नव्हता. ‘नासा’ अभियंते या समस्येचे कारण शोधत असून, यानाचे अंतर आणि प्रवासाचा मार्ग यावर आधारित गणनेतून प्रकाशदिनाचा टप्पा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे अंतराचा ऐतिहासिक टप्पा आणि यानाकडून नियमित वैज्ञानिक माहिती मिळण्याची स्थिती, या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत.
 
पृथ्वीचा संदेश घेऊन जाणारी ‘सुवर्ण ध्वनिमुद्रिका’
 
‘व्हॉयेजर-१’च्या प्रवासातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्याच्यासोबत पाठवलेली ‘सुवर्ण ध्वनिमुद्रिका’. पृथ्वीवरील जीवन आणि मानवसंस्कृतीची ओळख भविष्यात कधीतरी एखाद्या परग्रहावरील बुद्धिमान जीवसृष्टीला व्हावी, या कल्पनेतून ही ध्वनिमुद्रिका तयार करण्यात आली. यामध्ये पृथ्वीवरील विविध भाषांमधील अभिवादन, संगीत, नैसर्गिक आवाज, मानवी जीवनाची छायाचित्रे आणि पृथ्वीविषयीची माहिती समाविष्ट आहे. प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ कार्ल सेगन यांच्या नेतृत्वाखालील समितीने, तिच्या आशयाची निवड केली होती. यात समुद्राच्या लाटा, पक्ष्यांचे आवाज, वार्‍याची सळसळ, मानवी हृदयाचे ठोके आणि विविध संस्कृतींचे संगीत यांचा समावेश आहे. ही ध्वनिमुद्रिका म्हणजे, मानवाने विश्वाला पाठवलेले एक सांस्कृतिक पत्र आहे. त्यातून आपण कोण आहोत, आपली पृथ्वी कशी आहे आणि आपल्या संस्कृतीत किती विविधता आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात, एखाद्या परग्रहावरील संस्कृतीला ती सापडेल किंवा तिचा संदेश समजेल, याची खात्री नाही.
 
पुढचा प्रवास किती दूर?
 
‘व्हॉयेजर-१’चा प्रवास अजूनही सुरू आहे. त्याचा जुळा सहप्रवासी ‘व्हॉयेजर-२’देखील आंतरतारकीय अवकाशात कार्यरत आहे. मात्र, तो ‘व्हॉयेजर-१’पेक्षा पृथ्वीच्या जवळ आहे. ‘व्हॉयेजर-२’ला पृथ्वीपासून एक प्रकाशदिन अंतर गाठण्यासाठी, नोव्हेंबर २०३५ पर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. ‘व्हॉयेजर-१’ने हा टप्पा दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी गाठला. या यानांचा वेग प्रकाशाच्या वेगाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यामुळे जवळच्या तारकांपर्यंत पोहोचण्यासाठीच त्यांना हजारो वर्षे लागतील.
 
एका यानाची गोष्ट, संपूर्ण मानवजातीचा अभिमान
 
‘व्हॉयेजर-१’चा एक प्रकाशदिनाचा टप्पा हा केवळ अंतराचा विक्रम नाही. तो मानवी बुद्धिमत्ता, विज्ञान, अभियांत्रिकी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचा गौरव आहे. १९७७ मध्ये पृथ्वीवरून निघालेले एक छोटेसे अंतराळयान आज इतक्या दूर पोहोचले आहे की, त्याच्याशी संवाद साधण्यासाठी प्रकाशालाही पूर्ण दिवस लागतो. त्याने ग्रहांचे रहस्य उलगडले, सूर्याच्या प्रभावक्षेत्राच्या बाहेरील अवकाशाची माहिती दिली आणि पृथ्वीवरील जीवनाचा सांस्कृतिक ठेवा सोबत नेला. आज आपण पृथ्वीवरून पाठवलेला संदेश ‘व्हॉयेजर-१’पर्यंत पोहोचण्यासाठी एक दिवस घेतो आणि त्याचे उत्तर मिळण्यासाठी आणखी एक दिवस वाट पाहावी लागते. पण, या दीर्घ प्रतीक्षेतही विज्ञानाचा प्रवास थांबलेला नाही. यानाची ऊर्जा कमी होत आहे, उपकरणे एकेक करून बंद होत आहेत; तरी त्याने मानवाला विश्वाविषयी विचार करण्यासाठी नवे प्रश्न दिले आहेत. आकाशाकडे पाहताना आपल्याला तारे दूर दिसतात; पण ‘व्हॉयेजर-१’ने त्या अंतरांचा अर्थ प्रत्यक्ष प्रवासातून समजावून दिला आहे. पृथ्वीपासून निघालेला हा छोटासा दूत आता एका प्रकाशदिनाच्या अंतरावर पोहोचला आहे. त्याच्या प्रवासातून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की, विश्व कितीही विशाल असले, तरी त्याचा शोध घेण्याची मानवी जिज्ञासा त्याहूनही मोठी आहे.
 
-सुजाता बाबर
 




संबंधित मजकूर