समर्पण : रंगांमधून जपलेली महाराष्ट्राची संस्कृती

    22-Nov-2026

Samarpan Art Exhibition Deepak Ramesh Patil 
 
चित्रकला ही संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करणारी, त्याला एकप्रकारे अमरत्वच प्राप्त करुन देणारी दृश्यकला! असाच महाराष्ट्राच्या अभूतपूर्व संस्कृतीचा, संस्कारांचा कलासंगम दीपक पाटील यांच्या ‘समर्पण’ या चित्रकला प्रदर्शनातून दि. २४ ते ३० नोव्हेंबर यादरम्यान वरळी येथील नेहरू सेंटरच्या कलादालनात कलारसिकांना अनुभवता येणार आहे. त्यानिमित्ताने या चित्रप्रदर्शनाचे कलारंग उलगडणारा हा लेख... 
 
चित्रकार दीपक रमेश पाटील यांच्यासाठी चित्रकला म्हणजे केवळ रंग आणि कुंचल्याचा खेळ नाही, तर ती एक उपासना आहे आणि ही उपासना म्हणजेच समर्पण, असे ते स्वतः सांगतात. भारतीय, विशेषतः महाराष्ट्रातील संपन्न संस्कृतीचे दर्शन त्यांच्या चित्रांमधून घडते. भक्ती, मातृत्व, नाती आणि परंपरा या विषयांना त्यांनी आपल्या कलाकृतींमधून जिवंत केले आहे.
 
‘देवघरातली शांत ज्योत’ या पाटील यांच्या एका कलाकृतीत सरस्वती देवीचे देवघर दिसते. नक्षीदार लाकडी देवघर, तेवणारे तेलाचे दिवे आणि देवीला दिवा ओवाळणारी गृहिणी. लाल साडी, केसांतील पांढरी फुले आणि शांत चेहरा, यातून भक्ती आणि स्त्रीत्व यांचा सुंदर संगम साधला आहे. इथे प्रकाश हाच मुख्य नायक आहे. सोनेरी प्रकाश देवघर उजळवतो आणि स्त्रीचा चेहरा हळुवारपणे प्रकाशित करतो. प्रकाश आणि सावलीच्या खेळातून चित्राला गूढ शांतता लाभली आहे. भक्तीचे खरे सार मोठ्या सोहळ्यात नाही, तर मनाच्या प्रामाणिकपणात आहे. छोटीशी ज्योतही आयुष्य उजळवू शकते, हाच या चित्राचा आशय. अशाप्रकारे पाटील यांची प्रत्येक कलाकृती ही आदर्श परंपरेचे मूर्तिमंत उदाहरण वाटते.
 
‘नजरेतून जुळणारे मनोमिलन’ या कलाकृतीत लग्नाआधीचे दिवस म्हणजे लाज, कुतूहल आणि नव्या आयुष्याची स्वप्ने. पिवळी साडी नेसलेली नववधू नक्षीदार लाकडी खिडकीतून आपल्या होणार्‍या जीवनसाथीकडे पाहात आहे. शेजारी तिच्या दोन जिवलग मैत्रिणी आहेत. वधूच्या लाजर्‍या नजरेत ओठांवर न आलेले प्रश्न, आशा आणि स्वप्ने आहेत. मैत्रिणींचे हास्य त्याक्षणाला ऊब देते. लाल, पिवळा, हिरवा, निळा या रंगछटा आणि प्रकाश-सावलीचा खेळ यामुळे रचना उबदार झाली आहे. ही खिडकी म्हणजे केवळ चौकट नाही, तर भूतकाळ आणि भविष्य यांच्यामधील उंबरठा आहे. शब्दांची देवाणघेवाण होण्याआधीच दोन मने जुळू लागतात, तोच मनोमिलनाचा क्षण. ही कलाकृतीदेखील स्मृतिप्रवण आहे.
 
आईकडून मुलीकडे जाणारी श्रद्धा
 
घरचे देवघर म्हणजे श्रद्धा आणि कौटुंबिक मूल्यांचे केंद्र. एका चित्रात आई आणि तिची लहान मुलगी गणपती बाप्पांसमोर हात जोडून बसल्या आहेत. पिढ्यान्पिढ्या संस्कार कसे पुढे जातात, याचे हे चित्रण आहे.
 
पिवळी वस्त्रे आणि फुलांच्या माळा घातलेली गणपतीची प्रतिमा, पितळेची समई, नैवेद्य यामुळे मंगल वातावरण तयार झाले आहे. गुलाबीसर लाल साडीतील आई आणि निरागस भक्तिभावाने बसलेली मुलगी, यामुळे चित्र अधिक जिवंत झाले आहे. मुलगी आईच्या संस्कारातून श्रद्धा आत्मसात करते, हे यातून दिसते. दिवा देवघर उजळवतो, तर आईचे उदाहरण कोवळ्या मनाचा मार्ग प्रकाशित करते.
 
याच आशयाची दुसरी कलाकृती म्हणजे ‘वारशाचे धागे’. गणपतीसमोर आई सुई-दोर्‍याने फुलांची माळ गुंफत आहे, मुलगी फुले धरून शेजारी बसली आहे. आई शब्दांनी नव्हे; तर कृतीतून संयम, समर्पण आणि भक्ती शिकवत आहे. वेगवेगळी फुले एका धाग्याने जोडली जातात, तसेच सामायिक अनुभव कुटुंबाला जोडतात.
 
घरातच अयोध्या आणि बासरीचे प्रेम
 
‘मंगल भवन मंगल हारी’ या चित्रात रामनवमीचा दिवस आहे. पूजा करण्याची तयारी करणारी आई आणि तिची कन्या दिसतात. चौरंगावर श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या प्रतिमा आहेत. धनुष्यधारी राम-लक्ष्मण हे धैर्य आणि कर्तव्याचे प्रतीक, सीता माता कृपा आणि करुणेचे प्रतीक, तर हात जोडलेले हनुमान हे नम्र भक्तीचे प्रतीक आहेत. हनुमानाच्या रूपातील छोटा पितळेचा दिवा अंधार दूर करणार्‍या प्रकाशाचे प्रतीक आहे. पूजेची फुले, साहित्य आणि मुलीचे निरागस कुतूहल, यामुळे साधे देवघर एका क्षणासाठी अयोध्याच बनते.
 
‘मुरलीधर’ या चित्रात कृष्णभक्तीचा वेगळा रंग आहे. ‘मुरलीधर’ म्हणजे बासरी धारण केलेले श्रीकृष्ण. बासरी ही दिव्य प्रेम आणि आंतरिक सुसंवादाचे प्रतीक आहे. तिचे संगीत मनाला भक्ती आणि शांतीकडे नेते. आई कृष्णासाठी नैवेद्य तयार करताना मुलीत सेवाभाव रुजवत आहे. खरी भक्ती केवळ वाहिलेल्या फुलांत नाही, तर ती गुंफणार्‍या प्रेमळ हातांत आणि देण्याचे सौंदर्य शोधणार्‍या निरागस मनांत आहे.
 
बाप्पांची कृपाळू नजर आणि हितगुज
 
‘शुभ नयना करुणामया’ हे चित्र गणेशोत्सवाच्या भावविश्वात नेते. कोकणातील गणेशोत्सव म्हणजे भक्ती आणि कुटुंबाचे एकत्रीपण. आरतीचा नाद, उदबत्तीचा सुगंध, दिव्यांची प्रभा आणि मोदकांचा नैवेद्य, यामुळे घर मांगल्याने भरते. सकाळ-संध्याकाळची आरती म्हणजे सर्वांत जिव्हाळ्याचा क्षण. बाप्पांच्या भावपूर्ण डोळ्यांत करुणा आणि कोमलता दिसते. त्यांची कृपाळू नजर भक्तांना दिलासा आणि आंतरिक शांती देते.
 
‘हितगुज’ या चित्रात वधू आणि तिच्या सखी आहेत. मध्यभागी भावनांच्या विश्वात हरवलेली वधू, तिची लाजरी स्मितहास्य आणि हळुवार वाकवलेली मान तिचे अंतरंग सांगतात. सखी तिला प्रेमाने चिडवत आहेत. पार्श्वभूमीत तीन लहान मुली मंत्रमुग्ध होऊन प्रत्येक शब्द टिपत आहेत. काही नाती शब्दांनी नव्हे; तर एका नजरेने, एका हास्याने किंवा एका कुजबुजीने व्यक्त होतात.
हितगुज म्हणजे मनांची जिव्हाळ्याची देवाणघेवाण, जिथे एक कुजबुज आठवण बनते आणि एक क्षण काळातीत होतो.
 
या सर्व चित्रांमधून एकच सूत्र दिसते. श्रद्धा ही आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. ती देवघरात, आईच्या संस्कारात, वधूच्या नजरेत, मैत्रिणींच्या गप्पांत आणि बाप्पांच्या कृपाळू नजरेत आहे. ही परंपरा कलेच्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे, हेच दीपक पाटील यांच्या चित्रांचे प्रयोजन आहे. त्यांचे समर्पण प्रत्यक्ष पाहण्याची ही पर्वणी आहे.
 
दि. २४ ते ३० नोव्हेंबर या सप्ताहात वरळी येथील नेहरू सेंटरच्या वातानुकूलित कलादालनात त्यांचे ‘समर्पण’ हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. हे प्रदर्शन म्हणजे केवळ चित्रांची मांडणी नाही, तर महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्र संस्कृतीच्या जतनासाठी आयोजित केलेला एक ‘समर्पण सोहळा’ आहे. उद्योजक, संग्राहक, हॉटेलसमूह, वैयक्तिक खरेदीदार, शासनाचे विविध विभाग आणि जाणकार कलारसिकांनी हे प्रदर्शन आवर्जून पाहावे, असे आवाहन चित्रकार दीपक रमेश पाटील आणि त्यांच्या पत्नी यांनी केले आहे.
 
लेखक-डॉ. गजानन शेपाळ
 




संबंधित मजकूर