
राजकोट, (Rahul Gandhi Hindu Religion Controversy): लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांच्या चित्रासह केलेल्या समाजमाध्यमांवरील पोस्टवरून वाद निर्माण झाला आहे. या चित्रणाचा अर्थ केवळ प्रेम किंवा एकमेकांवरील स्नेह एवढाच मर्यादित नसून त्यामागे सखोल आध्यात्मिक आणि तात्त्विक संदर्भ आहेत, असे हिंदू धर्माचार्य सभा संयोजक स्वामी परमत्मानंद सरस्वती यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उद्देशून लिहिलेल्या खुल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर ते राजकोट येथे बोलत होते. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात १६ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांनी आई-वडिलांच्या नात्यातील जिव्हाळ्याचा उल्लेख केला होता. बालपणी घरात जेवताना वडील राजीव गांधी यांच्या मांडीवर आई सोनिया गांधी बसलेल्या असायच्या, अशी आठवण त्यांनी सांगितली. आपल्या मित्रांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांमध्ये असे प्रेमळ वर्तन दिसत नसल्याने आपण मित्रांना त्याबाबत प्रश्न विचारत असल्याचेही राहुल यांनी सांगितले होते.(Rahul Gandhi Hindu Religion Controversy)
या वक्तव्यावर टीका झाल्यानंतर १७ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांनी भगवान शिव यांच्या मांडीवर विराजमान असलेल्या माता पार्वतीचे मंदिरातील शिल्पचित्र समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केले. राहुल गांधी यांच्या पोस्टनंतर स्वामी परमत्मानंद सरस्वती यांनी त्यांना खुले पत्र लिहिले. शिव-पार्वतीच्या चित्राकडे केवळ बाह्य स्वरूपातून पाहून त्याचा प्रेम किंवा डेटिंग असा अर्थ लावणे चुकीचे आहे. शिव हे ब्रह्माचे साकार रूप, तर पार्वती या शक्तीचे प्रतीक आहेत. शक्तिमान आणि शक्ती यांच्यातील संबंध या चित्रातून व्यक्त होतो. त्यामागे उपनिषदांमधील ब्रह्म, माया आणि शक्ती यासंबंधीचे तत्त्वज्ञान आहे, असे त्यांनी पत्रात स्पष्ट केले. राजकोटमधील संवादात स्वामींनी अर्धनारीश्वर रूपाचाही संदर्भ दिला. देवतांच्या चित्रणाचा अर्थ लावताना संपूर्ण शास्त्रीय परंपरा आणि आध्यात्मिक संदर्भ समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.(Rahul Gandhi Hindu Religion Controversy)
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या काही विधानांमुळेही आपण व्यथित झाल्याचे स्वामींनी नमूद केले. मुस्लिमांच्या सभेत हिंदूंविषयी सर्वसाधारण विधान करणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या प्रकरणामुळे तीन दिवस मन अस्वस्थ राहिल्यानंतर खुले पत्र लिहिल्याचेही त्यांनी सांगितले.(Rahul Gandhi Hindu Religion Controversy)