बुलेट ट्रेनच्या मार्गावर विजेचा ‘वेग’! सुरत–बिलिमोरा सेक्शनमध्ये ओव्हरहेड विद्युत प्रणाली कार्यान्वित

मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा; पुढील चाचण्यांचा मार्ग मोकळा


Mumbai Ahmedabad Bullet Train OHE System
 
मुंबई, (Mumbai Ahmedabad Bullet Train OHE System) : भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. मुंबई–अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमधील सुरत–बिलिमोरा सेक्शनवर २० नोव्हेंबर रोजी ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशन (OHE) प्रणाली यशस्वीपणे ऊर्जीकृत करण्यात आली. यामुळे या मार्गावरील पुढील तांत्रिक चाचण्यांच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे.
 
सुरक्षा नियम आणि निर्धारित प्रक्रियांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी तांत्रिक पथकांच्या देखरेखीखाली टप्प्याटप्प्याने आणि छोट्या सेक्शनमध्ये विद्युत प्रणाली ऊर्जीकृत केली जाणार आहे. या सेक्शनमध्ये उन्नत मार्गावर अप आणि डाउन अशा दोन्ही रेल्वे मार्गांचा समावेश आहे.(Mumbai Ahmedabad Bullet Train OHE System)
 
मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये अत्याधुनिक २ × २५ केव्ही ओव्हरहेड ट्रॅक्शन प्रणाली बसवण्यात आली आहे. जगातील अनेक हायस्पीड रेल्वे प्रणालींमध्ये वापरल्या जाणाऱ्या या प्रगत तंत्रज्ञानामुळे बुलेट ट्रेनच्या संचालनासाठी आवश्यक विद्युत पुरवठा उपलब्ध होणार आहे.
 
५०८ किलोमीटर लांबीच्या संपूर्ण कॉरिडॉरवर एकूण १४ ट्रॅक्शन सब-स्टेशन्स (TSS) उभारण्यात आली आहेत. ही सब-स्टेशन्स राष्ट्रीय विद्युत ग्रिडमधून वीज घेऊन ओव्हरहेड ट्रॅक्शन प्रणालीला पुरवठा करतील. गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील बिलिमोरा येथे उभारण्यात आलेल्या पहिल्या ट्रॅक्शन सब-स्टेशनमध्ये कंट्रोल पॅनेल, चेंजओव्हर स्विच, ट्रान्सफॉर्मर आणि सर्किट ब्रेकर्सची इमारतीमधील स्थापना पूर्ण झाली आहे.(Mumbai Ahmedabad Bullet Train OHE System)
 
गुजरातमधील ट्रॅक्शन सब-स्टेशन्सना गुजरात एनर्जी ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (GETCO) २२० केव्ही अंबेठा ग्रिड सब-स्टेशनमधून वीजपुरवठा केला जाणार आहे. संपूर्ण विद्युत नेटवर्कचे नियंत्रण आणि निरीक्षण केंद्रीकृत कंट्रोल सेंटरमधून केले जाणार असून, यामुळे सुरक्षित आणि विश्वासार्ह संचालन सुनिश्चित होईल.
 
सुरत–बिलिमोरा सेक्शनमध्ये दोन्ही स्थानकांदरम्यान सुमारे ५० किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग आहे. या मार्गावर चार नद्यांवरील पूल आणि राष्ट्रीय महामार्ग-५३ वरील स्टील ब्रिजचा समावेश आहे. परिसरातील ध्वनी प्रदूषणाचा प्रभाव कमी करण्यासाठी या व्हायाडक्टवर सुमारे ९४ हजार नॉइज बॅरिअर्स बसवण्यात आले आहेत.(Mumbai Ahmedabad Bullet Train OHE System)
 
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
 
ओव्हरहेड विद्युत प्रणाली ऊर्जीकृत झाल्यानंतर या मार्गाच्या परिसरातील नागरिक, प्रवासी, बांधकाम कामगार आणि सर्वसामान्यांनी विद्युत उपकरणांपासून दूर राहावे. ओव्हरहेड वायर किंवा विद्युत उपकरणांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नये तसेच परिसरात कोणतेही अनधिकृत काम करू नये, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.(Mumbai Ahmedabad Bullet Train OHE System)
 





गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर