मुंबई (Mercedes-Benz Classic Car Rally 2026): मर्सिडीज-बेंझ इंडिया आणि ऑटोकार इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘मर्सिडीज-बेंझ क्लासिक कार रॅली २०२६’चा शुभारंभ रविवार दि. २२/११/२०२६ रोजी वांद्रे येथे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष मा. प्रताप सरनाईक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.
यावेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, सुरक्षितता आणि आरामदायी प्रवास ही मर्सिडीज-बेंझची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. मर्सिडीज-बेंझ ही केवळ एक आलिशान मोटारगाडी नसून सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाचे प्रतीक आहे. अशा प्रकारचा सुरक्षित आणि सुखकर प्रवास हे आपल्या देशातील सर्वसामान्य नागरिकांचेही स्वप्न आहे. आधुनिक तंत्रज्ञानासोबतच वाहनांचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
या रॅलीमध्ये देशभरातील दुर्मीळ, आकर्षक आणि ऐतिहासिक मर्सिडीज-बेंझ मोटारगाड्यांचे प्रदर्शन करण्यात आले होते. (Mercedes-Benz Classic Car Rally 2026)
विशेष म्हणजे, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रवासासाठी वापरलेल्या ऐतिहासिक मर्सिडीज-बेंझ मोटारगाडीने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. या ऐतिहासिक गाडीला पाहताच तिच्यासोबत फोटो काढण्याचा मोह परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनाही आवरता आला नाही. (Mercedes-Benz Classic Car Rally 2026)
यावेळी मंत्री सरनाईक यांनी रॅलीतील विविध क्लासिक कार मॉडेल्सची आवर्जून पाहणी केली. प्रत्येक गाडीची निर्मिती, तिची वैशिष्ट्ये, तांत्रिक रचना आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी याबाबत त्यांनी संबंधितांकडून माहिती जाणून घेतली. जुन्या काळातील मोटारगाड्यांची कलात्मकता, अभियांत्रिकी कौशल्य आणि काळानुसार विकसित होत गेलेले ऑटोमोबाईल तंत्रज्ञान याबद्दलही त्यांनी उत्सुकता व्यक्त केली. (Mercedes-Benz Classic Car Rally 2026)
सन २०१४ पासून आयोजित करण्यात येणारी ही क्लासिक कार रॅली यंदा मर्सिडीज-बेंझच्या १४० वर्षांच्या गौरवशाली ऑटोमोबाईल इतिहासाचे औचित्य साधून विशेष स्वरूपात आयोजित करण्यात आली होती. जुन्या आणि दुर्मीळ मोटारगाड्यांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबतच ऑटोमोबाईल क्षेत्रातील ऐतिहासिक प्रवासाचे दर्शन घडविणारा हा उपक्रम ठरला.
या कार्यक्रमाला मर्सिडीज-बेंझ इंडिया, ऑटोकार इंडिया यांचे प्रतिनिधी, ऑटोमोबाईल क्षेत्रातील मान्यवर, क्लासिक कारप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Mercedes-Benz Classic Car Rally 2026)