जेएनपीएच्या कॉमन रेल यार्ड संचालनाचा करार गेटवे डिस्ट्रिपार्क्सकडे

न्हावा शेवा येथे ८ वर्षांचा करार; २२५ कोटींच्या डीएफसी-सुसंगत रेल यार्डमुळे कंटेनर वाहतुकीला गती

    22-Nov-2026

JNPA Common Rail Yard Gateway Distriparks
 
नवी मुंबई, (JNPA Common Rail Yard Gateway Distriparks) :जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने (जेएनपीए) न्हावा शेवा येथील डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर सुसंगत कॉमन रेल यार्डच्या संचालन, देखभाल आणि व्यवस्थापनासाठी गेटवे डिस्ट्रिपार्क्स लिमिटेड यांच्याशी आठ वर्षांचा करार केला आहे. या कराराला आणखी दोन वर्षांची मुदतवाढ देण्याची तरतूद आहे. त्यामुळे जेएनपीएच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीला अधिक गती मिळण्यासह कंटेनर वाहतुकीतील लॉजिस्टिक अडचणी कमी होण्याची अपेक्षा आहे.
 
सुमारे २२५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या रेल यार्डचे क्षेत्रफळ १५.९ हेक्टर (१,५९,७३५ चौ.मी.) आहे. येथे १,५०० मीटर लांबीच्या दोन डीएफसी-सुसंगत रेल्वे लाईन्स आणि इंजिन एस्केप लाईन उभारण्यात आली आहे. या सुविधा डबल-स्टॅक कंटेनर ट्रेनच्या संचालनासाठी सक्षम असून, एका रेकमधून ७२० टीईयू कंटेनर वाहून नेण्याची क्षमता आहे.(JNPA Common Rail Yard Gateway Distriparks)
 
जेएनपीएचे अध्यक्ष गौरव दयाल यांनी या कराराला रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक वेगवान आणि विश्वासार्ह करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले. डीएफसी आणि बंदरातील कंटेनर टर्मिनल्सदरम्यान मालाची अखंड वाहतूक सुनिश्चित करण्यावर भर देण्यात येणार असून, अधिकाधिक मालवाहतूक रेल्वेकडे वळविण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
सध्या जेएनपीएमध्ये येणाऱ्या सुमारे ९६ टक्के कंटेनर ट्रेनमध्ये विविध टर्मिनल्ससाठीचा मिश्र माल असतो. त्यामुळे मालाची छाननी आणि संबंधित टर्मिनलपर्यंत वाहतूक करताना लॉजिस्टिक आव्हाने निर्माण होतात. नव्या कॉमन रेल यार्डमुळे जेएनपीएच्या पाचही कंटेनर टर्मिनल्सना समान आणि भेदभावरहित सुविधा उपलब्ध होणार आहे.(JNPA Common Rail Yard Gateway Distriparks)
 
गेटवे डिस्ट्रिपार्क्सकडून ट्रेन प्लेसमेंट, कंटेनर लोडिंग-अनलोडिंग, सिंगल आणि डबल-स्टॅक रेकचे लॅशिंग-अनलॅशिंग, मिश्र कंटेनर ट्रेनची छाननी, यार्डमध्ये कंटेनर स्टॅकिंग तसेच टर्मिनल्सदरम्यान कंटेनर हस्तांतरण अशा सर्व कामांचे व्यवस्थापन केले जाणार आहे.
 
या संचालनासाठी आधुनिक रीच स्टॅकर्स, जीपीएस-सक्षम इंटरनल ट्रान्सफर व्हेईकल्स आणि वेब-आधारित टर्मिनल ऑपरेटिंग सिस्टमचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे बंदर, रेल्वे आणि व्यापाराशी संबंधित घटकांना मालवाहतुकीची रिअल-टाइम माहिती उपलब्ध होईल. कंटेनरचा यार्डमधील मुक्काम कमी करणे आणि ट्रेनच्या टर्नअराउंड टाइममध्ये सुधारणा करणे हेही या व्यवस्थेचे उद्दिष्ट आहे.(JNPA Common Rail Yard Gateway Distriparks)
 
डीएफसीशी पूर्णपणे जोडणी झाल्यानंतर उत्तर भारतातील एनसीआर, पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश या भागांमधून येणाऱ्या कंटेनर मालाची वाहतूक अधिक वेगवान आणि कमी खर्चात होण्याची अपेक्षा आहे. या भागातील कंटेनर बाजारपेठेतील जेएनपीएचा हिस्सा ऐतिहासिक ३० टक्क्यांच्या पातळीवर पुन्हा नेण्याचे लक्ष्यही बंदर प्राधिकरणाने ठेवले आहे. वर्क ऑर्डर जारी झाल्यानंतर एका महिन्याच्या आत ऑपरेटरकडून उपकरणांची तैनाती करून रेल यार्डचे संचालन सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे जेएनपीएच्या रेल्वे-आधारित मालवाहतुकीला नवी गती मिळण्याची शक्यता आहे.(JNPA Common Rail Yard Gateway Distriparks)
 




संबंधित मजकूर