देवतांच्या मूर्ती समजून घेताना...

    22-Nov-2026

Hindu Deity Iconography and Sculpture
 
सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रपर पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी राहुल गांधींच्या "माझी आई माझ्या वडिलांच्या मांडीत बसून दररोज जेवण करत असे” या वक्तव्यामुळे साहजिकच वादंग उफाळून आला. तो खरं तर त्यांचा खासगी विषय. पण, त्यानंतर आपल्या विधानाचे स्पष्टीकरण देण्यासाठी खुद्द राहुल गांधी आणि काही काँग्रेस समर्थकांनी देवीदेवतांचे असेच फोटो शेअर करुन बुद्धिभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानिमित्ताने ज्या देवी-देवता अशा एकत्र दाखवलेल्या असतात, त्या तशा का असतात? याबद्दल मूर्तिशास्त्राचा अभ्यास नेमका काय सांगतो? हे समजून घेण्यासाठी हा विशेष लेखप्रपंच...
 
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या मातोश्रींच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात, त्यांच्या घरात कसे वातावरण होते, कोण कुठे बसायचे, यासंदर्भात भरसभेत काही वक्तव्ये केली. त्यावर नंतर चहुबाजूंनी टीकाही सुरु झाली. या सगळ्या गोष्टींशी माझा तसा काही संबंध नाही आणि या घटनेला महत्त्व द्यावे, अशी ही घटनाही नाही. प्रत्येकाला बोलण्याचे - व्यक्त होण्याचे आपल्या देशात स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाने त्याचा हवा तास वापर करावा. पण, या नंतर जे घडले, तिथे मात्र माझा जवळचा संबंध आहे. तो ‘हुशार नेता’ जे काही बोलला, त्याचे समर्थन करायला हिंदू देवतांचे सपत्नीक, आसनस्थ फोटो सोशल मीडियावर टाकून, ‘बघा हे चालते तुम्हाला!’ पण, त्यांनी जे केले, त्यावर टीका करता असा सूर लागला. आपल्या देवता, मूर्ती आणि त्यांचे असंख्य पैलू यांना अनेक कंगोरे आहेत. त्यांचा वापर करताना, त्यांची विस्तृत माहिती असणे आवश्यक आहे. ज्या लोकांना हे खटकले, त्यांच्यापैकी अनेक मंडळी या संदर्भात व्यक्त झाली. आपल्या देवी-देवता नक्की काय आहेत? हे त्यांना आणि आपल्यालादेखील समजावे म्हणून आजचा हा लेखप्रपंच.
 
माणसाच्या प्रारंभीच्या काळात, काही हजार वर्षांपूर्वी; ज्यावेळी तो भटकत होता, मिळेल ते खात होता, त्याकाळात नदी, वारा, पाऊस, ऊन याच गोष्टी त्याच्या सवंगडीदेखील होत्या आणि याच गोष्टींचा त्रासही होता. हळूहळू त्याची समज वाढत गेली, त्याचा प्रवास स्थिरतेकडे होऊ लागला. ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो, त्याच गोष्टी आपल्यासाठी पूरकदेखील आहेत, याची जाणीव होऊ लागली आणि ही पंचमहाभूते त्याच्या भावविश्वाशी जोडली गेली. त्यांच्याप्रति वाटणारी भीती, आदर यातून तो त्यांची प्रार्थना करू लागला. काही हजार वर्षे या पद्धतीने तो जगला. शेती करायला शिकला, बोलायला शिकला, व्यक्त व्हायला शिकला आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, विचार आणि चिंतन करू लागला. यातूनच सृष्टीविषयी प्रश्न पडू लागले, आपल्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रवास सुरू झाला, गोष्टी तयार कशा होतात, काम कशा करतात, याची उत्तरे शोधण्याचा प्रवास सुरू झाला. याच चिंतनातून साहित्यनिर्मिती झाली. ‘वेद’, ‘उपनिषद’, आगम साहित्य, ‘पुराणे’, टीका ग्रंथ, ‘दर्शने’ यांची निर्मिती झाली.
 
आपल्या लोकांची आस्था अगदी सुरुवातीपासून केवळ ‘शुद्ध शास्त्र’ (pure science) एवढ्यावर न थांबता, ‘उपयोजित शास्त्र’(applied science) याबद्दल पण होती. डॉ. नि. पु. जोशी यांनी लिहिलेल्या ‘भारतीय मूर्तिशास्त्र’ या ग्रंथात त्यांनी या संकल्पनेवर सुंदर विवेचन केले आहे. ते लिहितात, "आपल्या लोकांची केवळ आस्था नाही, तर श्रद्धाच होती की, केवळ ज्ञान हे अंतिम ठरू शकत नाही. ज्ञानाची परिणीती अनुभवात, कर्मात, एका प्रकारच्या शक्तीत झाली पाहिजे, अन्यथा ते ज्ञान व्यर्थ आहे.
याच विचारातून आणि चिंतनातून आपल्या आजूबाजूला असणार्‍या संकल्पना, श्रद्धा यांना सगुण रूप देण्याचे प्रयत्न सुरू झाले. प्रारंभीच्या काळात असणार्‍या लिंग आणि योनी पूजनातून आता दिसणार्‍या मूर्तिपूजेचा पाया रचला गेला. स्त्रीतत्त्वाची योनीरूपी पूजा फक्त भारतातच नाही, तर जगभरातल्या अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये आपल्याला दिसून येते. या मूर्तीपुढे प्रतीके म्हणून वापरल्या जाऊ लागल्या. ‘कमळ’ म्हणजे समृद्धी, ‘हत्ती’ म्हणजे ताकद या पद्धतीने हा विकास घडत गेला. कालांतराने आपण चिंतन करत असलेल्या संकल्पना या प्रतीकांच्या माध्यमातून कोरल्या गेल्या आणि आज आपण जे बघतो, ते ‘मूर्तिनिर्मिती’ हे शास्त्र म्हणून विकसित झाले. ‘ज्ञानेश्वरी’मध्ये माऊलींनी लिहिलेली एक ओवी, प्रस्तुत विषयाबद्दल आपल्याला खूप काही शिकवून जाते.
 
अरुपाचे रूप दावीन|अतींद्रिय ते भोगवीन|
इंद्रियां करवी॥ (ज्ञानेश्वरी ६.३६)
 
अर्थ - जे अरूप आहे, निराकार आहे, ते (शब्दांत) सरूप साकार करून दाखविन, जे इंद्रियांच्या क्षमतेच्या पलीकडे आहेत, ते इंद्रियांनाच साध्य करून देईन. हा विचार डोक्यात ठेवून ज्यावेळी आपण मूर्ती बघतो, त्यावेळी त्या मूर्ती आपल्याशी संवाद साधू लागतात आणि ‘स्थूल’, ‘सूक्ष्म’ आणि ‘परं’ अशा तीन अवस्थितींमध्ये आपण समजून घेऊ शकतो. उदाहरणार्थ- वेरूळमध्ये ‘रामेश्वर लेणी’ बाहेर एक सुंदर स्त्रीशिल्प आहे. मोहित करणारे सौंदर्य त्या स्थपतींनी कोरले आहे. पण, तिच्या पायाशी असणारा प्राणी - ‘मकर’ दिसला की समजते, ती फक्त स्त्री नाही; तर ती गंगा आहे. गंगा आहे म्हटल्यावर आपल्या मनात जो पहिला भाव येतो, तो म्हणजे पावित्र्य. स्त्रीमूर्ती-गंगा-पावित्र्य असा तीन अवस्थितींमध्ये आपला प्रवास होतो. याच पद्धतीने आपल्याला मूर्तींचा अभ्यास करावा लागतो. आता बघूयात आपल्या ज्या देवी-देवता एकत्र दाखवलेल्या असतात, त्या तशा का असतात? हे बघताना ती संकल्पना समजून घेणे गरजेचे आहे.
 
सहा ‘दर्शनां’पैकी एक म्हणजे ‘सांख्य तत्त्वज्ञान’. सृष्टीची निर्मिती हा याचा मुख्य विषय. याबद्दल अनेक चर्चा येतात; पण त्यातली सर्वांत महत्त्वाची म्हणजे, ‘पुरुष’ आणि ‘प्रकृती’, यातून सृष्टीची निर्मिती झाली. अचेतन; पण ‘स्थिर पुरुष’ आणि चेतनामयी; पण ‘अस्थित प्रकृती’ एकत्र येतात, त्यावेळी ही निर्मिती होते. आधुनिक विज्ञानात याला ‘मॅटर’ आणि ‘एनर्जी’ अशा संज्ञा वापरलेल्या आहेत. हेच ‘पुरुष’ आणि ‘प्रकृती’ म्हणजे ‘शिव’ आणि ‘पार्वती’ आणि त्यांचे एकत्र येणे म्हणजे, ज्यातून ‘सृष्टीची निर्मिती’ ही संकल्पना दाखवली आहे, त्या शिल्पाला ‘अर्धनारीश्वर’ असे म्हणतात. या शिल्पात अर्धे शिव आणि अर्धी पार्वती दाखवलेली असते.
याच संदर्भात अजून एक संकल्पना येते, ती म्हणजे आत्म्याचा परमात्म्याकडे सुरू असलेला प्रवास. पार्वती ही हिमवानाची मुलगी, तिला जन्म आहे म्हणजे ती जीव आहे. ती तपश्चर्या करते, कुणासाठी? तर जन्म-मृत्यूची बंधने नसलेल्या शिवासाठी. यांचे एकत्र येणे, हे त्यांच्या लग्नातून दाखवले आहे; ज्याला ‘कल्याणसुंदर मूर्ती’ म्हणतात. पार्वती हा आपला प्रवास दाखवते, तो आपण करतो त्या परमात्म्यापर्यंत जाण्यासाठी. म्हणून पार्वती शिवाच्या मांडीवर बसलेली काही शिल्पांमध्ये दाखवतात. कारण, तो परमात्म्याने केलेला आत्म्याचा स्वीकार आहे.
 
विष्णू याचा अर्थच ‘सर्वव्यापी’, ‘प्रसरण पावणारा’ असा होतो. सृष्टीची स्थिती व्यवस्थित ठेवण्याचे काम हा विष्णू करत असतो. त्याच्या हातात असणारी आयुधे हीपण प्रतीके आहेत. गदा म्हणजे ‘आदिविद्या’, शंख म्हणजे ‘पंचमहाभूते’, चक्र म्हणजे ‘मन’ आणि पद्म म्हणजे सतत वाढत जाणारे ‘ब्रह्माण्ड’. विष्णू बरोबर असते, ती लक्ष्मी - पृथ्वी, भूमी, संपन्नता यांचे लक्षण. तो सृष्टीचा पालक या लक्ष्मीला आपलेसे करतो म्हणजे, आपले अनंत ब्रह्माण्ड या पृथ्वीला, जिथे आपण सगळे सजीव सुखासीन आहोत, तिला स्वीकारतो. आपल्याला वाटतात त्यापेक्षा खूप जास्त काही या मूर्ती सांगून-शिकवून जातात. एक वेगळा संवाद आपल्याशी साधतात.
 
अजून एक आरोप कायम होतो, तो म्हणजे तुमच्या देवतांच्या दोन पत्नी असतात. असे कसे चालते? तत्त्वज्ञान समजून न घेता, फक्त मंदिरात जाऊन ‘हे मिळू दे, ते मिळू दे’ एवढ्यापुरते आपण यांना मर्यादित ठेवल्यामुळे हे परिणाम झालेले आहेत. आपल्या देवतांबरोबर असणार्‍या स्त्रिया या दोन पत्नी नसून, एक पत्नी तर एक शक्ती असते. ब्रह्मदेवाबरोबर आपल्याला ‘सावित्री’ आणि ‘गायत्री’ दिसतात. सावित्री ही पत्नी, तर तो गायत्री मंत्राचा उद्गाता आहे म्हणून तो मंत्र स्त्रीरूपात ब्रह्मदेवाबरोबर दाखवला गेला, ती त्याची शक्ती. कार्तिकेय दाखवताना त्याच्याबरोबर ‘महावल्ली’ ही पत्नी असते, तर असुरांचा संहार करण्यासाठी त्याने देवांच्या सेनेचे नेतृत्व केले, ती ‘देवसेना’ मनुष्य रूपात त्याची शक्ती म्हणून बरोबर दाखवली गेली.
 
अशी आशयघन निर्मिती आपल्या प्राचीन अभ्यासकांनी, वैज्ञानिकांनी आपल्यासाठी मूर्तिरूपात करून ठेवली आहे. ज्याला यातले थोडेफार कळते, तो या गोष्टींचा वापर अत्यंत जबाबदारीने करतो. ही अपेक्षा ज्यांना आपल्या देवी-देवतांशी काही घेणे-देणे नाही, जे निवडणुकांच्या वेळी वापरायला फोटो मिळावेत म्हणून मंदिरात जातात, अशांकडून ठेवणे योग्य नाही. पण, त्याचवेळी हे देखील कळणे गरजेचे आहे की, हिंदू म्हणून आपण खूप सहनशील, समृद्ध आहोत म्हणून या गोष्टी आपल्याकडे खपून जातात. एकच पुस्तक समोर ठेवून जगभरात उच्छाद मांडणार्‍या पंथांच्या बाबतीत बोलल्यावर काय होते, हे ‘चार्ली हेब्दो’ प्रकरणातून आपण सर्वांनी बघितले आहे.
 
याहीपुढे जाऊन, एवढे सगळे समजावून सांगूनदेखील, जर असे वाटत असेल की, जी तुलना आम्ही केली ती बरोबरच आहे; तर तो परमेश्वर अशा सर्वांना सद्सद्विवेकबुद्धी देईल, अशी अपेक्षा!
हरि ॐ!
 
लेखक- इंद्रनील बंकापुरे
७८४१९३४७७४
 




संबंधित मजकूर