मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते अजिंय देव सध्या वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांमुळे चर्चेत आहेत. एका बाजूला ‘रामायण’सारख्या भव्य चित्रपटात त्यांनी साकारलेली विश्वामित्रांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली, तर दुसरीकडे ‘प्रहार’ आणि ‘१२० बहादूर’सारख्या चित्रपटांतूनही त्यांनी वेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तेव्हा, ऐतिहासिक, पौराणिक, वास्तववादी आणि समकालीन विषयांवरील चित्रपटांचा अनुभव, अशा विविध विषयांवर अजिंक्य देव यांच्याशी साधलेला हा संवाद.
‘रामायण’सारख्या भारतीय महाकाव्याची जागतिकस्तरावर भव्य ‘सिनेमॅटिक’ मांडणी करण्यात आली. अशा महत्त्वाकांक्षी चित्रपटाचा भाग होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. हा अनुभव कसा होता?
‘रामायण’ चित्रपटाचा भाग होणे, हे मी स्वतःचे भाग्य समजतो. मी प्रचंड हनुमानभक्त आहे. ‘हनुमान चालीसा’ म्हटल्याशिवाय मी घरातून बाहेरही पडत नाही. माझ्या आयुष्यात काही घटना घडल्यानंतर मी ‘हनुमान चालीसा’ म्हणायला सुरुवात केली आणि त्यानंतरच ‘रामायण’ माझ्या आयुष्यात आले. त्यामुळे हा केवळ एक महाकाव्यात्मक चित्रपट नसून, माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे.
गेल्या चार वर्षांपासून या चित्रपटाचा प्रवास सुरू आहे. सुरुवातीला मी ‘दशरथ’ यांच्या भूमिकेसाठी ‘ऑडिशन’ दिले होते. त्यावेळी रामाच्या (रणबीर कपूरच्या) वडिलांची भूमिका करायची, या विचाराने मी थोडा कचरलेलो होतो. त्यावेळी माझे वडील मला म्हणाले, "गपचूप जाऊन ‘ऑडिशन’ दे. दशरथांची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे तुला माहीत नाही.” त्यानंतर काहीकाळाने मला ‘विश्वामित्रां’च्या भूमिकेसाठी विचारणा कण्यात आली. ‘विश्वामित्र’ हे ‘रामायणा’तील अत्यंत सामर्थ्यशाली आणि महत्त्वपूर्ण पात्र. त्यामुळे या भूमिकेचा भाग होता आले, याचा मला आनंद आहे. प्रत्येक पात्राची निवड प्रभू रामचंद्र स्वतः करतात, असे मला वाटते.
‘रामायणा’ची कथा प्रत्येक भारतीयाच्या मनात अगदी खोलवर रुजलेली आहे. त्यामुळे अशा भूमिकेसाठी प्रेक्षकांच्या अपेक्षांचे दडपण जाणवले का?
खरे सांगायचे तर मी याचा फारसा विचार केला नव्हता. आमचा आमच्या व्यक्तिरेखांवर पूर्ण विश्वास होता आणि नितेश तिवारी यांच्यावरही आमचा प्रचंड विश्वास होता. गेली दहा वर्षे ते आणि नमित मल्होत्रा या प्रकल्पावर काम करत आहेत. या चित्रपटासाठी ‘वाल्मीकी रामायणा’ला केंद्रस्थानी ठेवून, त्यानंतर झालेल्या विविध रूपांतरांमधील काही महत्त्वाचे भागही समाविष्ट करण्यात आले आहेत. माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाचे होते, ते म्हणजे ‘विश्वामित्र’ कसे दिसतील आणि त्यांची देहबोली कशी असेल. त्यासाठी मी स्वतःवर खूप शारीरिक मेहनत घेतली.
‘रामायण’मधील जटायू आणि रावणाच्या युद्धाचा शेवटचा ‘सिक्वेन्स’ विशेष चर्चेत आहे. हा ‘सिक्वेन्स’ कसा साकारण्यात आला?
या चित्रपटासाठी कलाकार आणि तंत्रज्ञांव्यतिरिक्त जगभरातील अनेक लोकांनी काम केले आहे. ‘व्हीएफएस’, संगीत आणि इतर तांत्रिक गोष्टींसाठी मोठी टीम कार्यरत होती. हा चित्रपट केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील प्रेक्षकांना आवडावा, यादृष्टीने त्याची निर्मिती करण्यात आली आहे. ‘जटायू’ हे रामाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे पात्र. रामाच्या परिचयापासूनच ‘जटायू’ची व्यक्तिरेखा चित्रपटात उभी केली आहे. त्यामुळे पुढे जेव्हा जटायूचे पंख छाटले जातात, तेव्हा त्या प्रसंगातील भावनिक परिणाम अधिक तीव्र होतो. अनुपम खेर यांनी जटायूसाठी दिलेला आवाज अप्रतिम आहे. संपूर्ण प्रसंग ज्या पद्धतीने चित्रित केला आहे, त्याला दाद द्यावीच लागेल. मी स्वतः तो प्रसंग पाहताना भावूक झालो होतो. या संपूर्ण टीमचे कौतुक करावे तेवढे कमीच.
‘रामायण’च्या आधी ‘प्रहार’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला. ‘२६/११’च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटातील तुमची भूमिका आणि अनुभव कसा होता?
‘प्रहार’चा अनुभव खूप वेगळा होता. दिग्दर्शक अविनाश धर्माधिकारी यांची माझी भेट सिकंदर खेरच्या माध्यमातून झाली. त्यानंतर काही दिवसांनी अविनाश यांचा मला फोन आला आणि त्यांनी या चित्रपटाबद्दल सांगितले. या चित्रपटात मी पोलीस आयुक्त राकेश मारन यांची भूमिका साकारली आहे. मूळ कथानक उज्ज्वल निकम यांच्या व्यक्तिरेखेवर आधारित असले, तरी त्यांच्या आत्मचरित्रपर चित्रपटाचे हक्क आधीच रोहित शेट्टी यांनी घेतल्यामुळे चित्रपटात नाव बदलण्यात आले. माझा एक महत्त्वाचा प्रसंग म्हणजे, कसाबसोबतचा. तो प्रेक्षकांना खूप आवडला. ‘२६/११’च्या घटनेवर याआधी अनेक चित्रपट, ‘डॉयुमेंटरी’ आणि ‘वेबसीरिज’ आल्या आहेत. मात्र, ‘कोर्टरूम ड्रामा’च्या स्वरूपात ही घटना मांडण्याचा प्रयत्न ‘प्रहार’मधून करण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाचा भाग होणे माझ्यासाठी महत्त्वाचे होते.
‘प्रहार’, ‘१२० बहादूर’ आणि ‘रामायण’ या तिन्ही चित्रपटांमधील तुमच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. अशा विविध व्यक्तिरेखा साकारण्याचे आव्हान कसे पेलता?
‘१२० बहादूर’मध्ये मी ‘ब्रिगेडियर’ची भूमिका साकारली, ‘प्रहार’मध्ये पोलीस आयुक्त आणि ‘रामायण’मध्ये ‘विश्वामित्र’. तिन्ही भूमिका अत्यंत वेगळ्या आहेत आणि तिन्ही चित्रपटांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने तयारी करावी लागली. ‘१२० बहादूर’चे शूटिंग लडाखमध्ये प्रत्यक्ष लोकेशनवर झाले. तिथला भूभाग, वातावरण आणि युद्धाचे प्रसंग हे सगळे खूप आव्हानात्मक होते. मात्र, चित्रपटातील भावनिक भागही तितकाच प्रभावी आहे. युद्धाचे प्रसंग अतिशय उत्तम पद्धतीने चित्रित करण्यात आले आहेत. या चित्रपटात फरहान अख्तर यांच्या व्यक्तिरेखेची ओळख करून देण्याचा प्रसंगही माझ्या व्यक्तिरेखेमार्फत येतो. विशेष म्हणजे, ‘प्रहार’मध्ये उज्ज्वल निकम यांची आणि ‘रामायण’मध्ये रामाची ओळख करून देण्याचा महत्त्वाचा भागही माझ्या व्यक्तिरेखेशी जोडलेला आहे. या गोष्टींचा मला अभिमान वाटतो.
मराठी चित्रपटसृष्टीसाठी तुमच्या मनात काही मोठे स्वप्न आहे का?
नक्कीच! माझा प्रयत्न आहे की, पहिला मराठी ‘आयमॅक्स’ चित्रपट करावा. त्या चित्रपटाची कथा अप्रतिम आहे आणि त्यावर सध्या प्रक्रिया सुरू आहे. तो चित्रपट काहीसा देशभक्तीवर आधारित असेल. मला तो करायचा आहे आणि मराठी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जायचे आहे.
ऐतिहासिक किंवा पौराणिक भूमिका साकारणे आणि वास्तववादी व्यक्तिरेखा साकारणे, यात नेमका काय फरक असतो?
ऐतिहासिक आणि पौराणिक व्यक्तिरेखा साकारताना कलाकाराच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते. माझ्या अभिनयप्रवासाची सुरुवातच ‘सर्जा’सारख्या ऐतिहासिक चित्रपटाने झाली. त्यानंतर ‘वासुदेव बळवंत फडके’ यांची भूमिकाही मला साकारता आली. ‘विश्वामित्रां’ची भूमिका करतानाही माझ्या मनात एकच विचार होता की, मला या भूमिकेला न्याय देता आला पाहिजे. मी अनेकदा नितेशजींना विचारायचो, "सर, ठीक आहे ना?” त्यावर ते म्हणायचे, "ठीक हैं तो फिर यों पूछते हो?” एका भूमिकेतून दुसर्या भूमिकेत जाणे, हेही आव्हान असते. ‘रामायण’च्या शूटिंगदरम्यानच्या मोकळ्या वेळेत मी लंडनमध्ये दोन चित्रपटांचे शूटिंग केले. कलाकार म्हणून वेगवेगळ्या भूमिकांमध्ये स्वतःला सामावून घेणे गरजेचे असते. माझ्या आईकडूनही मला हे शिकायला मिळाले. ती स्वतः उत्तम कलाकार होती. एकदा सेटवर गेल्यानंतर ती पूर्णपणे त्या भूमिकेत शिरायची. मीही तिच्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतो.
देव कुटुंबाचा चित्रपटसृष्टीतील वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुम्ही कशी पार पाडत आहात?
आमची नैतिक जबाबदारी आम्ही पार पाडत आहोत. आमच्या वडिलांनी आम्हाला चित्रपटसृष्टीत येण्यासाठी प्रेरित केले; पण आम्ही आमच्या मुलांवर कोणतीही गोष्ट लादलेली नाही. माझा मुलगा आर्य कॅनडामध्ये मानसशास्त्राचे शिक्षण घेऊन आला. त्यानंतर त्याने दिग्दर्शनात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. अभीचा मुलगा युग यालाही कॅमेर्याचे आकर्षण होते. त्याने त्यासाठी शिक्षण घेतले. आज दोघेही आपापल्या आवडीच्या क्षेत्रात काम करत आहेत. आम्ही त्यांना एकच गोष्ट सांगतो की, पैशाच्या मागे धावू नका. महत्त्वाचा चित्रपट बनवा, समाजाला काहीतरी चांगले द्या. तुमच्या कामातून समाजाला काहीतरी मिळाले पाहिजे. चांगला सिनेमा आणि चांगल्या ‘वेबसीरिज’ तयार करणे हेच आमचे ध्येय आहे.
तुम्ही चित्रपटसृष्टीतील पार्ट्या, पुरस्कार सोहळे आणि सोशल मीडियापासून काहीसे अलिप्त असल्याचे दिसते. यामागचे कारण काय?
आमच्या घरात सुरुवातीपासूनच चित्रपटसृष्टीतील पार्ट्यांचे फारसे वातावरण नव्हते. माझे वडील कधीही दारू पीत नसत. आई म्हणायची की, ‘आपले कुटुंब लोण्यासारखे आहे. पाण्यात राहूनही पाण्याचा स्पर्श नाही.’ आम्हाला आमचे कुटुंब, मित्र आणि ठरावीक जागा यांच्यात राहायला आवडते. मी, माझा भाऊ आणि माझी मुलेही ‘फॅमिली पर्सन’ आहोत. कारण
नसताना वादविवाद किंवा वादग्रस्त गोष्टींमध्ये पडण्याची आम्हाला गरज वाटत नाही. सोशल मीडियाच्या काळात कोणत्याही गोष्टीचा विपर्यास होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहण्यापेक्षा आपले काम चांगले करणे मला महत्त्वाचे वाटते. एखाद्या सामाजिक विषयावर मला प्रश्न विचारला, तर मी नक्कीच उत्तर देतो. पण, प्रत्येक गोष्टीवर व्यक्त झालेच पाहिजे, असे मला वाटत नाही.
अभिनयाबरोबरच सामाजिक कार्यातही तुम्ही योगदान देता. याबद्दल काय सांगाल?
सामाजिक जबाबदारी पार पाडणे, ही आमची जबाबदारी आहे. माझी मुलगी ‘ऑटिस्टिक’ आहे. तिच्या संगोपनात माझ्या पत्नीचा खूप मोठा वाटा आहे. तिच्या प्रयत्नांतून आम्ही विशेष मुलांसाठी शाळा सुरू केली. ‘स्टॅलियन ऑटिस्टिक स्कूल अॅकेडमी ऑफ लर्निंग अॅण्ड डेव्हलपमेंट फॉर चिल्ड्रन’ या माध्यमातून विशेष मुलांसाठी काम केले जाते. देवाच्या आशीर्वादाने आम्हाला ही संधी मिळाली आहे. समाजाला काहीतरी परत देणे महत्त्वाचे आहे. केवळ स्वतःचे नाव मोठे करण्यापेक्षा आपल्या कामातून इतरांना मदत झाली पाहिजे, असे मला वाटते.
तुमच्या हातून एखादी महत्त्वाची भूमिका निसटली आणि ती दुसर्या अभिनेत्याला मिळाली, अशी खंत कधी वाटली का?
असे अनेक प्रसंग घडले आहेत. साधारण ३५-४० वर्षांपूर्वी सावन कुमार टाक यांच्या एका चित्रपटासाठी मी ‘ऑडिशन’ दिले होते. त्या भूमिकेसाठी अनिल कपूरही ‘ऑडिशन’ द्यायला आले होते. नंतर ती भूमिका अनिल कपूर यांनी केली. आणखी एक चांगली भूमिका यश चोप्रांच्या चित्रपटात होती; पण तीही मला मिळाली नाही. मात्र, मी या गोष्टी सकारात्मकतेने घेतो. माझा एक विश्वास आहे की, जे तुमचे आहे, ते गोल फिरून तुमच्याकडे येणारच! जे तुमच्या नशिबात नाही, ते कितीही प्रयत्न केले तरी मिळणार नाही. त्यामुळे आपल्या हातात असलेली गोष्ट म्हणजे स्वतःला तयार ठेवणे.
-कपिल देशपांडे