काही दिवसांपूर्वीच तामिळनाडूच्या सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये ‘एआय’निर्मित पुस्तकांचा घोटाळा उघडकीस आला. त्या पार्श्वभूमीवर पुस्तकनिर्मिती आणि विक्रीशी संबंधित प्रकाशक आणि लेखकांनी ‘एआय’चा वापर करताना नेमकी काय खबरदारी घ्यावी, याविषयी...
कोईम्बतूर (तामिळनाडू) मधील नव्याने सुरू झालेल्या सार्वजनिक वाचनालयाला चोरट्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)निर्मित बनावट पुस्तके विकून १ कोटी ७४ लाख रुपयांना फसवल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. एका तामिळ लेखकाने ही बाब उजेडात आणल्यानंतर साहजिकच त्याचे वृत्त माध्यमांतही प्रसिद्ध झाले. त्यानंतर तेथील १६० तामिळ लेखक, समीक्षक, प्रकाशक यांनी ही बाब सरकारच्या निदर्शनाला आणल्यावर सरकारने कारवाई करून अनेक शहरांतील ग्रंथालयांतून हजारो अशा तर्हेने निर्मिती केलेली सर्व पुस्तके जप्त केली आहेत.
अशा छापलेल्या पुस्तकांमध्ये अनेक त्रुटी आढळल्या.उदा. लेखकांची नावे बदलून मूळचे प्रकाशित साहित्य ‘एआय’ वापरून छापले होते. बहुसंख्य पुस्तकांत अनेक चुका होत्या आणि त्यातील संदर्भदेखील चुकीचे होते. प्रसिद्ध लेखकांच्या नावावर त्यांनी कधीच न लिहिलेली पुस्तकेही होती. त्याची भाषा निकृष्ट दर्जाची होती. ‘आयएसबीएन’ क्रमांकाचे तपशील जुळत नव्हते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, हे सर्व ‘एआय’ वापरून खोटे तयार केले होते. ‘भारतीय न्याय संहिता’, ‘इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी कायदा’ आणि ‘कॉपीराईट कायद्या’अंतर्गत वरील सर्व गोष्टी कायदेशीर कारवाईस पात्र आहेत आणि त्याअंतर्गत दोषी लोकांना दंड आणि कारावासदेखील होऊ शकतो.
कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या तंत्रज्ञानाने सर्व जग ज्ञानाच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहे. त्यामुळे साहजिकच कामाचा वेग आणि अचूकता वाढवत आहे. या तंत्रज्ञानामुळे चुका होण्याची शक्यता कमी असणार आहेत. जे लोक हे तंत्रज्ञान शिकणार नाहीत असे लोक, तंत्रज्ञान शिकलेल्या लोकांच्या मागे पडतील. आतापर्यंत सायबर गुन्हेगारी ही चोरट्यांच्या वैयक्तिक हुशारीवर होती. त्यात भाषा, उच्चारपद्धती (रललशपीं) आणि उपलब्ध माहिती-तंत्रज्ञानाच्या मदतीने चोरटे हात मारत होते. आता ‘एआय’ची अनेक टूल्स चोरट्यांच्या हाताशी आहेत. ही सर्व टूल्स फुकट आहेत, ती वापरायला काहीही जास्त डोके लागत नाही आणि ती निनावी पद्धतीनेही वापरता येतात. या सर्व तंत्रज्ञानाचा वापर चोरटे मोठ्या प्रमाणात करून आधीच प्रचंड प्रमाणात चालू असलेले सायबर गुन्हे आणखी वाढवत आहेत.
‘एआय’च्या मर्यादा
मात्र, ‘एआय’ तंत्रज्ञानालाही मर्यादा आहेत. ‘एआय’कडे जगातून आलेली माहिती ही खरी, खोटी किंवा मुद्दाम घुसवलेली असू शकते. त्यातील फुकट उपलब्ध माहिती आणि पैसे भरून घेतलेली माहिती यात फरकही असू शकतो. त्यातील काही माहिती ही काही काळापूर्वीची असू शकते. थोडक्यात असे की, त्यावर पूर्णपणे अवलंबून निर्णय घेण्याऐवजी, मूळच्या माहितीकडे किंवा मूळ माहितीचा स्रोत, याची खातरजमा करणे गरजेचे आहे. हे तंत्रज्ञान निश्चितच उपयोगी असणार आहे. पण, त्यात माणसाचा ‘टच’ (र्कीारप) असणार नाही, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
प्रकाशक आणि लेखक यांनी घ्यावयाची दक्षता
प्रकाशकांसाठी आणि लेखक यांच्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञान साधन (Tool) म्हणून लेखननिर्मिती, लेखनातील त्रुटी शोधणे (Editing), एखाद्या लेखाचा सारांश काढणे, भाषांतर करणे, ही कामे निश्चितच सोपी करू शकते. तसेच आपल्याला काही संशोधन करावयाचे असेल, तर ते खूप उपयुक्तही ठरू शकते. त्यामुळे लेखननिर्मिती आणि त्यातील क्रयशक्ती याच्यात भरपूर सुधारणा होऊ शकणार आहे. ‘एआय’च्या या वापराने चुका निश्चित कमी होतील. हे तंत्रज्ञान २४ तास उपलब्ध असणार आहे. त्यामुळे कार्यक्षमता वाढेल आणि वेळेची बचत होऊ शकणार आहे.
‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करत असताना, संपादक आणि लेखक म्हणून आपली जबाबदारी तसूभरही कमी होणार नाही, हेही लक्षात ठेवणे गरजेचे आहे. काळजी घेतली नाही, तर कायदेशीर कारवाईला आणि मनस्तापाला तोंड द्यावे लागेल.
‘एआय’कडे प्रचंड प्रमाणावर माहिती असणार आहे. ती माहिती काही सेकंदांमध्ये तुम्हाला हव्या असलेल्या प्रश्नासंबंधात अवलोकन करून त्यातून त्याला वाटते ते योग्य उत्तर देणार आहे. मात्र, अंतिम सारासार विचार करण्याची क्षमता माणसात आहे. मनुष्याच्या बुद्धीला पर्याय नाही, हे लक्षात असू द्या.
‘एआय’च्या माध्यमातून संपूर्णपणे तयार झालेला लेख, कोणतेही प्रकाशक अथवा वर्तमानपत्र छापणार नाही. त्यांच्याकडे असलेली ‘एआय टूल्स’ ते ओळखू शकतात. हे तंत्रज्ञान त्याच्याकडे असलेल्या किंवा दिल्या गेलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला मदत करत असते. मात्र, यावर ‘जिओ पॉलिटिक्स’ म्हणजेच, भूराजकीय स्थितीचाही परिणाम होऊ शकतो. प्रकाशन आणि लेखन यासाठी खूप प्रकारची ‘टूल्स’ उपलब्ध आहेत, त्याची माहिती करून घ्यावी आणि मगच वापरावीत. अतिमहत्त्वाचे प्रोजेक्ट असेल, तर त्यातील काही ‘टूल्स’ वर्गणी भरून घ्यावीत.
नुसते कॉपी-पेस्ट करू नये. मिळालेल्या माहितीवर आपल्याकडून ‘व्हॅल्यू अॅडिशन’/मूल्यवाढ जरूर करावी.
‘कॉपीराईट’ असलेले ‘मटेरियल’ हे त्या व्यक्तीच्या हयातीत आणि मृत्यूनंतर ६० वर्षांनी मुक्त होते. असे कोणतेही ‘मटेरियल’ आपण वापरणार असाल, तर मालकाची परवानगी घेणे हे उत्तम. आपण काही त्यातील भाग आपल्या लेखनात किंवा प्रकाशनात करणार असाल, तर मूळ स्रोत आहे, त्याचा संपूर्ण उल्लेख करावा.
‘एआय’ तंत्रज्ञान वापरताना अतिवापर करणे आणि अजिबात वापर करायचाच नाही, याचा सुवर्णमध्य काढावा आणि ५०:५० धरावे. म्हणजेच ‘एआय’ला घाबरून न जाता, त्याला अंतरावरून पारखून वापर करावा.
सारांश
आगामी काळात माहिती घेतलेले आणि माहिती नसलेले असे दोन प्रकारचे लेखक आणि प्रकाशक असतील. दोघांनाही तंत्रज्ञान जेवढ्या प्रकारात वापराल, त्या-त्या प्रमाणात कामे करावी लागतील. उदाहरणार्थ, तुम्ही ‘एआय’चा योग्यप्रकारे वापर करून सेवा देऊ शकला, तर त्याच्या बाजूला ओढला जात असलेला समाज आणि त्याच्या गरजा भागवू शकाल, अन्यथा पूर्वापार चालत असलेल्या व्यवसायापुरते मर्यादित राहाल.
‘एआय’च्या वापराचे खासगी माहिती, गोपनीय माहिती यासंबंधित कायदेशीर मुद्दे आणि त्याचे नियम याबाबतीत सर्व जग ‘एआय लीगल फ्रेमवर्क’ (कायद्यांची चौकट) बनवण्यात प्रयत्नशील आहे. मात्र, त्यानंतरही आगामी काळात त्याच्या संबंधात कायदेशीर केसेस कोर्टामार्फत चालून त्याचे निष्कर्ष बाहेर येईपर्यंत आपण सर्वांनीच जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. थोडक्यात, आपण याबाबतीत शंका असेल, तर आधीच कायदेशीर सल्ला जरूर घ्यावा.
-शिरीष देशपांडे
(‘सीए’ आणि संगणक कंट्रोल, सायबर गुन्हेविषयक अभ्यासक, सायबर गुन्हेगारी आणि स्व-संरक्षण पुस्तकाचे लेखक)