संघर्षातून कर्तृत्वाकडे... सहकाराच्या वाटेवरचा एक प्रेरणादायी जीवनप्रवास!

    21-Nov-2026
 
 
Vishnu Bobade
 
‘सहकार भारती’चे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री, राष्ट्रीय महामंत्री, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री म्हणून दायित्व निभावलेल्या विष्णूजी बोबडे यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा आज, दि. २१ नोव्हेंबर रोजी डोंबिवली येथे संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी, ‘समरसता गुरुकुलम’चे संस्थापक ‘पद्मश्री’ गिरीश प्रभुणे, महाराष्ट्र भाजप अध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण आणि ‘अभाविप’चे माजी अध्यक्ष मिलिंद मराठे उपस्थित राहणार आहेत. त्यानिमित्ताने विष्णूजी बोबडे यांचा सहकाराच्या वाटेवरचा प्रेरणादायी जीवनप्रवास उलगडणारा हा लेख...
 
काही माणसांचे जीवन हे केवळ त्यांच्या वैयक्तिक यशापुरतेच नसते, तर त्यांच्या जीवनप्रवासातून अनेकांना प्रेरणा मिळते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, शिक्षणाची जिद्द, कष्ट आणि ध्येयवादाच्या जोरावर स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडविणारी माणसे समाजासाठी आदर्शच. विष्णूजी बोबडे यांचा जीवनप्रवास असाच प्रेरणादायी आहे. त्यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या निमित्ताने, त्यांच्या जीवनप्रवासातील काही महत्त्वाच्या पैलूंचा आढावा घेणे औचित्यपूर्ण ठरेल.
 
साध्या शेतकरी कुटुंबातून घडलेले व्यक्तिमत्त्व 
 
सातार्‍यातील करडफ या छोट्याशा गावात, एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात विष्णूजींचा जन्म झाला. दोन भाऊ आणि दोन बहिणी असे कुटुंब. वडिलांचा शेती हा व्यवसाय. आई-वडील दोघेही अशिक्षित; मात्र कष्ट, प्रामाणिकपणा आणि कौटुंबिक संस्कारांची श्रीमंती त्यांच्या घरात होती. त्याकाळी ग्रामीण भागात शिक्षणाला आजच्या इतके महत्त्व नव्हते. मुलांनी शाळेत जाण्यापेक्षा शेतीची कामे करणे, जनावरे सांभाळणे आणि वेळप्रसंगी मजुरी करणे, यालाच अधिक महत्त्व दिले जाई. गावातील शाळेची परिस्थितीही अत्यंत प्रतिकूलच. शिक्षकांच्या अनियमित उपस्थितीमुळे लहानग्या विष्णूजींनी, मित्रांसह शिक्षकांची बदली होईपर्यंत शाळेत न जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे शिक्षणापासून त्यांना तीन-चार वर्षे दूर राहावे लागले.
 
मात्र, नियतीने त्यांच्या आयुष्यात एक महत्त्वाची व्यक्ती पाठवली. त्यांच्या आजोबांनी नातवाच्या शिक्षणाबाबत घेतलेल्या ठाम भूमिकेने, त्यांच्या जीवनाला कलाटणी दिली. आजोबांच्या आग्रहामुळे त्यांनी पुन्हा शाळेची वाट धरली आणि पुढे शिक्षणाची गोडी निर्माण झाली. या प्रवासात देशपांडे मास्तरांसारखे विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी घेणारे, शिक्षणाविषयी निष्ठा असणारे आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारे शिक्षक लाभले. चौथीत असताना वक्तृत्व स्पर्धेत मिळालेले चार आण्यांचे बक्षीस, हा त्यांच्या वक्तृत्वप्रवासाचा प्रारंभ . पुढे याच कलेने त्यांना विद्यार्थी चळवळीत आणि सार्वजनिक जीवनात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून दिली.
 
शिक्षणासाठी संघर्ष आणि स्वकर्तृत्वाने उभे राहण्याची जिद्द 
 
सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करताना अनेक अडचणी आल्या. पुढे आजोळी बुध आठवी पूर्ण केली. त्यानंतर सातार्‍यातील रयत शिक्षण संस्थेच्या शाहू बोर्डिंगमध्ये प्रवेश मिळाला. प्रतिकूल आर्थिक परिस्थिती, दुष्काळ आणि मर्यादित साधने अशाच वातावरणात त्यांनी अकरावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर वडिलांनी पुढील शिक्षणासाठी नकार दिला. परंतु, शिकण्याची इच्छा प्रबळ होती. पुण्याच्या एस. पी. कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण सुरू ठेवणे अशय झाले. यानंतर मुंबईच्या कीर्ती महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला.
 
धारावीत भावाकडे राहण्याची व्यवस्था होती. मात्र, घर अत्यंत लहान असल्याने, राहण्याची आणि अभ्यासाची स्वतंत्र सोय करावी लागली. एका नातेवाईकांकडे माळ्यावर झोपण्याची व्यवस्था झाली. वीज नसल्याने रॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास करून त्यांनी शिक्षण सुरू ठेवले. या काळात मोठ्या भावाने आणि वहिनींची साथ अत्यंत मोलाचीच. स्वतःची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही, त्यांनी विष्णूजींच्या शिक्षणासाठी शय ते सर्व केले. त्यांच्या ऋणाची जाणीव विष्णूजींच्या जीवनप्रवासात कायम दिसते.
 
विद्यार्थी परिषदेतील जडणघडण आणि सामाजिक जीवनाचा प्रारंभ
 
कीर्ती महाविद्यालयातील शिक्षणाने त्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली. वक्तृत्वाची आवड, सामाजिक विषयांवरील चिंतन आणि सार्वजनिक जीवनात काहीतरी करण्याच्या इच्छेमुळे ते विद्यार्थी चळवळीकडे आकर्षित झाले. १९६९ मध्ये रविंद्र पवार, प्रदीप राणे आणि चंदू चव्हाण यांच्या संपर्कातून, त्यांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत प्रवेश झाला. पुढे जवळजवळ दहा वर्षे त्यांनी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सक्रिय काम केले. याकाळात बाळासाहेब आपटे, यशवंतराव केळकरांसारख्या ज्येष्ठ व्यक्तींचा सहवास लाभला. त्यांचा प्रभाव विष्णूजींच्या व्यक्तिमत्त्वावर पडला. विविध विचारसरणींच्या विद्यार्थ्यांशी चर्चा, सामाजिक विषयांवरील संवाद आणि संघटनात्मक कामामुळे त्यांची वैचारिक बैठक अधिक दृढ झाली. १९७१मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रथम वर्ष प्रशिक्षण पूर्ण केले. विद्यार्थी परिषद आणि संघाच्या संपर्कातून त्यांना राष्ट्रजीवन, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक कार्याचा व्यापक परिचय झाला. याच अनुभवांनी पुढील आयुष्याची दिशा निश्चित केली.
 
पत्रकारितेचा अनुभव आणि आणीबाणीतील संघर्ष
 
विष्णूजींच्या जीवनातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे पत्रकारिता! १९७०-७१ मध्ये त्यांनी पत्रकारितेत प्रवेश केला. ‘समाचार भारती’ या वृत्तसंस्थेत सुरुवातीस उपसंपादक आणि पुढे वार्ताहर म्हणून जबाबदारी सांभाळली. पत्रकार म्हणून काम करताना, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क आला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापासून ते यशवंतराव चव्हाण, अटल बिहारी वाजपेयी, मधु दंडवते, भूपेश गुप्ता यांसारख्या नेत्यांशी संवादाची संधी मिळाली. विधान परिषदेचे वार्तांकन, दिल्लीतील लोकसभा व राज्यसभेचा अभ्यास, विविध पत्रकार परिषदा आणि महत्त्वाच्या घटनांच्या वार्तांकनामुळे त्यांचा अनुभव समृद्ध झाला.
 
पत्रकारिता करतानाच आणीबाणीचा काळ आला. याकाळात पत्रकार म्हणून सत्याग्रह केल्याने त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. पत्रकारितेतील नोकरीही गेली. मात्र, विचार आणि तत्त्वांशी तडजोड न करण्याची त्यांची भूमिका यातून स्पष्ट झाली.
 
बँकिंग क्षेत्रातील कारकीर्द आणि कौटुंबिक जीवन
 
१९७६मध्ये त्यांनी ‘बँक ऑफ इंडिया’मध्ये नोकरी स्वीकारली. या क्षेत्रातील जबाबदार्‍या सांभाळताना, त्यांनी आपले सामाजिक आणि संघटनात्मक कार्य सुरूच ठेवले. १९८१ ते १९८७ याकाळात नोकरीनिमित्त उत्तर प्रदेशात लखनौ आणि ग्रामीण भागात वास्तव्य करण्याची संधी मिळाली. ग्रामीण भागातील बँकिंग व्यवस्था, स्थानिक समाजजीवन आणि विविध प्रकारच्या माणसांशी आलेल्या संपर्कामुळे, त्यांचा अनुभव अधिक समृद्ध झाला. बँकेतील सेवेत प्रगती करुन, अखेरीस ‘बँक ऑफ इंडिया’मधून निवृत्ती घेतली.
या प्रवासात त्यांच्या धर्मपत्नी उषा यांची साथ अत्यंत मोलाची. त्यांनी स्वतः पोलीस विभागात नोकरी केली. नोकरी, कुटुंब आणि मुलांचे संगोपन या सर्व जबाबदार्‍या सांभाळत, विष्णूजींच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याला त्यांनी भक्कम पाठबळ दिले.
 
‘सहकार भारती’तील प्रदीर्घ आणि समर्पित योगदान
 
विष्णूजी यांच्या सार्वजनिक जीवनातील सर्वाधिक महत्त्वाचा आणि प्रदीर्घ काळ व्यापणारा टप्पा म्हणजे, ‘सहकार भारती’तील त्यांचे कार्य. ‘सहकार भारती’च्या सुरुवातीच्या काळात, १९७८-७९मध्ये अनंतराव कुलकर्णी यांच्यासोबत हस्तलिखिताच्या संपादनात त्यांनी सहभाग घेतला. नोकरी निमित्ताने उत्तर प्रदेशात गेल्याने, काही काळ त्यांचा सक्रिय सहभाग मर्यादित राहिला. मात्र, महाराष्ट्रात परतल्यावर ते पुन्हा ‘सहकार भारती’च्या कामाशी जोडले गेले. ‘सहकार सुगंध’च्या माध्यमातून त्यांनी कामाला सुरुवात केली. त्यानंतर ठाणे जिल्ह्याची संघटनात्मक जबाबदारी त्यांच्यावर आली. जवळजवळ दहा वर्षे त्यांनी ती समर्थपणे सांभाळली. १९९८ मध्ये त्यांच्याकडे प्रदेश महामंत्रिपदाची जबाबदारी आली.
 
ठाणे जिल्ह्यातले संघटनात्मक काम, डोंबिवलीत झालेल्या प्रदेश अधिवेशनाचे नियोजन, जळगाव येथील प्रदेश अधिवेशन आणि महाराष्ट्रातील ‘सहकार भारती’चा विस्तारामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. याचकाळात बापूसाहेब मोकाशी, मधुकरराव चक्रदेव, मधुकरराव भागवत यांसारख्या सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभले. तात्या इनामदारांसारख्या अनुभवी संघटनमंत्र्यांसोबत काम करताना, त्यांना संघटनात्मक कामाची शिस्त, कार्यकर्त्यांबरोबरचा संवाद आणि सहकारविषयक विचारांची व्यापकता अनुभवता आली. सूर्यकांत केळकरांकडूनही त्यांना प्रेरणा मिळाली.
 
पुढे त्यांच्यावर बंगाल आणि आसाम या क्षेत्रांची जबाबदारी आली. त्यानंतर राष्ट्रीय महामंत्री आणि पुढे दहा वर्षे सहसंघटक म्हणून त्यांनी काम पाहिले. यानिमित्ताने देशभर ‘सहकार भारती’चे संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी योगदान दिले. एखाद्या संघटनेचा विस्तारासाठी पदाधिकारी संख्येपेक्षा, कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळा, प्रतिकूल परिस्थितीत काम करण्याची वृत्ती आणि संघटनेच्या विचारांवरील निष्ठा आवश्यक असते. विष्णूजींच्या प्रवासात हे गुण प्रकर्षाने दिसतात.
 
तात्या इनामदार यांच्याविषयी आदरभाव आणि विशेष सन्मान
 
‘सहकार भारती’तील प्रवासात, विष्णूजींना स्वर्गवासी तात्या इनामदारांच्यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तिमत्त्वाचा सहवास लाभला. तात्या इनामदार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक. त्यांचे व्यक्तिमत्त्व, विचारांची स्पष्टता, साधेपणा आणि कार्यकर्त्यांशी वागण्याची आत्मीयतेचा विष्णूजींवर विशेष प्रभाव. तात्यांविषयी आदराबरोबरच, एक विशेष जिव्हाळा आणि कृतज्ञतेची भावना त्यांच्या मनात होती. याचीच एक सुंदर पावती म्हणजे, स्वर्गीय तात्या इनामदारांच्या नावे दिला जाणारा ‘मानाचा सहकारी कार्यकर्ता’ हा पहिला पुरस्कार विष्णूजींनाच प्राप्त झाला. हा पुरस्कार विष्णूजींसाठी भावनिक समाधानाचा क्षण ठरला. काही व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात, त्या केवळ आपल्याला घडविण्यासाठीच! तात्या इनामदार हे विष्णूजींच्या जीवनातील असेच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व! त्यांच्या नावे मिळालेला पुरस्कार हा गुरुतुल्य व्यक्तिमत्त्वाने दिलेल्या संस्कारांचा आणि त्यांच्या कार्यातून मिळालेल्या प्रेरणेचा गौरवपूर्ण सन्मानच.
 
माणसांना जोडणारा मिश्कील आणि हसतमुख स्वभाव
 
विष्णूजी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक विशेष पैलू म्हणजे, त्यांचा हसतमुख आणि मिश्कील स्वभाव. त्यांचे हास्य हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे जणू वैशिष्ट्यच. कोणत्याही व्यक्तीशी सहज संवाद साधणे, गप्पांच्या ओघात वातावरण हलकेफुलके करणे आणि प्रसंगानुरूप एखादी समयसूचक कोटी करून उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटविणे, हे त्यांचे खास वैशिष्ट्य. विविध क्षेत्रांतील, विविध स्वभावांची माणसे त्यांच्या संपर्कात आली. माणसांचे स्वभाव बारकाईने टिपण्याची त्यांची नजर आणि ते एखाद्या मिश्कील टिप्पणीमधून नेमकेपणाने व्यक्त करण्याची त्यांची हातोटी विलक्षण. त्यांच्या याच शैलीतून कोणालाही दुखावण्यापेक्षा संवादात सहजता आणि आपलेपणा निर्माण होतो. त्यामुळे त्यांच्याशी एकदा परिचय झाला की, संवादाचे नाते अधिक घट्ट होते त्यांच्या सहवासात कामाचा व्याप आणि प्रवासातील दगदगही हलकी वाटते. त्यांच्या या स्वभावामुळेच त्यांनी, विविध क्षेत्रांतील अनेक मित्र आणि हितचिंतक जोडले. मोठे कार्य करणारी माणसे त्यांच्या पदांमुळे लक्षात राहतात; पण त्यांच्या स्वभावामुळे ती मनात कायमची घर करतात.
 
मुलांच्या यशातून संस्कारांचे प्रतिबिंब
 
विष्णूजी आणि उषावहिनी यांच्या संसारवेलीवर दोन कन्या आणि एक पुत्र अशी तीन अपत्ये फुलली. मुलांना उत्तम शिक्षण आणि संस्कार देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मोठी कन्या डॉ. माधुरी या ‘भूलतज्ज्ञ’ असून, मुंबईत वैद्यकीय व्यवसाय करतात. दुसरी कन्या माधवी ‘इंजिनिअर’ असून, ‘टीसीएस’मध्ये कार्यरत आहे. ‘वेब डिझाईन’पासून व्यावसायिक प्रवासाला सुरुवात करणार्‍या माधवीने, तांत्रिक क्षेत्राबरोबरच कलागुणांचीही स्वतंत्र ओळख निर्माण केली. ती उत्कृष्ट व्हायोलिनवादक असून, चित्रकलेतही विशेष प्रावीण्य मिळवत आहे.
 
पुत्र अभिजीतही ‘इंजिनिअर’ असून, दुबई येथे नोकरी करतो. मुलांनी केलेली प्रगती ही आई-वडिलांच्या संस्कारांचे आणि मार्गदर्शनाचे फलित आहे. आज या तिन्ही अपत्यांच्या संसारवेलीवर पुढची पिढीही बहरली आहे. आजोबा म्हणून विष्णूजी आणि आजी म्हणून उषावहिनी, आयुष्याच्या एका आनंददायी टप्प्यावर पोहोचले आहेत.
 
सहस्रचंद्रदर्शन : अनुभव, कर्तृत्व आणि समाधानाचा उत्सव
 
‘सहस्रचंद्रदर्शन’ हा आयुष्यभराच्या अनुभवांचा, आठवणींचा, कर्तृत्वाचा आणि समाधानाचा उत्सव. चंद्राच्या सहस्रदर्शनांमागे जीवनातील अनेक ऋतू, अनेक चढ-उतार, सुख-दुःखाचे प्रसंग आणि असंख्य माणसांचे सहकार्य दडलेले असते. विष्णूजी यांच्या जीवनप्रवासाकडे पाहिले, तर एका छोट्याशा गावातील रॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास करणारा विद्यार्थी ते राष्ट्रीयस्तरावर ‘सहकार भारती’च्या संघटनात्मक जबाबदार्‍या सांभाळणारा कार्यकर्ता, असा विलक्षण प्रवास दिसतो. या प्रवासात अनेकांनी त्यांना संधी दिली. त्यांनीही त्या संधींचे सोने केले. त्यांच्या जीवनातून तीन गोष्टी विशेषत्वाने शिकण्यासारख्या आहेत. पहिली म्हणजे परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी शिक्षणाची आणि स्वतःला घडविण्याची जिद्द सोडू नये. दुसरी म्हणजे मिळालेल्या संधीचा उपयोग समाजासाठी करावा आणि तिसरी म्हणजे कोणत्याही मोठ्या कार्यामागे कुटुंबाचा विश्वास, सहकार्य आणि त्याग असतो, याची जाणीव कायम ठेवावी.
 
आज सहस्रचंद्रदर्शनाच्या या मंगलमय प्रसंगी विष्णूजी यांच्या प्रदीर्घ जीवनप्रवासाला, त्यांच्या सामाजिक व संघटनात्मक योगदानाला आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सहकार्याला मनःपूर्वक अभिवादन! त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आनंदी जीवन लाभो. त्यांचा अनुभव, मार्गदर्शन आणि सहवास पुढील पिढ्यांना मिळत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! विष्णूजी, आपल्या सहस्रचंद्रदर्शनाच्या मंगल सोहळ्यानिमित्त आपणास आणि उषावहिनींस मनःपूर्वक शुभेच्छा!
 
-शरद जाधव
९४२२७६१६९९
(लेखक ‘सहकार भारती’चे महाराष्ट्र प्रदेश संघटनप्रमुख आहेत.)
 




संबंधित मजकूर