उजनीच्या मत्स्यसंपदेचे पुनरुज्जीवन

    21-Nov-2026
 
Ujani Reservoir Fish Biodiversity Restoration
 
उजनी जलाशयातील मत्स्यसंपदेचे बदलते चित्र केवळ माशांच्या प्रजातींच्या घटत्या संख्येपुरते मर्यादित नसून, त्याचा परिणाम संपूर्ण जलपरिसंस्थेवर आणि पारंपरिक मच्छीमारांच्या उपजीविकेवर देखील होत आहे. स्थानिक माशांचे अस्तित्व धोयात आले असताना, परकीय आक्रमक प्रजातींचे वर्चस्व वाढले आहे. या पार्श्वभूमीवर ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS)’ उजनीमध्ये स्थानिक मत्स्यप्रजातींचे पुनरुज्जीवन, अधिवास संवर्धन आणि शाश्वत मत्स्यव्यवसायासाठी एकात्मिक उपक्रम राबवत आहे.
 
उजनी धरणाचे बांधकाम १९७० मध्ये सुरू होऊन १९८०च्या सुमारास पूर्ण झाले. धरण उभारण्यापूर्वी भीमा नदीच्या या परिसरात माशांची समृद्ध विविधता होती. १८३९ मध्ये विल्यम हेन्री सायस यांनी दौंड आणि परिसरातील भीमा नदीत माशांच्या सुमारे ७० ते ८० प्रजातींची नोंद केली होती. त्यापैकी निम्म्याहून अधिक प्रजाती या प्रदेशापुरत्या मर्यादित होत्या. स्थानिक मच्छीमार संस्थांच्या १९९०च्या आसपासच्या नोंदींमध्येही ७० ते ७५ प्रजातींचा उल्लेख आढळतो. मात्र, आज त्यातील ३० ते ४० प्रजाती दिसेनाशा झाल्या आहेत. ‘नीलपंखी दख्खनी महाशीर’, ‘गुगळी’, ‘मुनिया’, ‘नटा’, ‘बोबरी’ आणि ‘तांबडी’ यांसारख्या माशांचे अस्तित्व दुर्मीळ झाले आहे. अहीर मासा म्हणजेच (Anguilla bengalensis) गेल्या १५ वर्षांत मच्छीमारांनी पाहिलेला नाही.
 
आज उजनीच्या मत्स्यव्यवसायात ‘तिलापिया’, ‘आफ्रिकन मांगूर’ आणि ‘सकरमाऊथ कॅटफिश’ या परकीय आक्रमक प्रजातींचे वर्चस्व आहे. बाजारात उपलब्ध होणार्‍या माशांच्या एकूण जैवभारापैकी ९७ ते ९८ टक्के वाटा या प्रजातींचा असल्याचे निरीक्षण आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सांडपाणी भीमा आणि इंद्रायणी नदीतून उजनीत येत असल्याने जलप्रदूषणाचा गंभीर परिणाम जलचर अधिवासांवर होत आहे. त्यात अनियंत्रित मासेमारी आणि अधिवासाचा र्‍हास यांचीही भर पडली आहे. परकीय माशांचे नियंत्रण करण्यासाठी ‘बीएनएचएस’ मच्छीमारांकडून ‘सकरमाऊथ कॅटफिश’चे संकलन करत आहे. संकलित माशांचा उपयोग मत्स्यतेल, मत्स्यखाद्य आणि खतनिर्मितीसाठी केला जातो. या उपक्रमातून मच्छीमारांना अतिरिक्त आर्थिक प्रोत्साहनही दिले जाते. गेल्या वर्षभरात ‘सकरमाऊथ कॅटफिश’ आणि ‘आफ्रिकन मांगूर’ मिळून सुमारे १८२ टन परकीय माशांचे संकलन करण्यात आले आहे.
 
स्थानिक माशांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी १२ प्रजातींच्या संवर्धनात्मक प्रजननाला सुरुवात करण्यात आली आहे. हिरण्यकेशी, पंचगंगा आणि कोयना नद्यांमधून जनक मासे आणून भिगवण येथील प्रजनन केंद्रात त्यांचे संवर्धन करण्यात आले. पहिल्याच वर्षी २२ लाख स्थानिक मत्स्यबीज तयार करण्यात आले. पुढील वर्षी दोन ते तीन कोटी मत्स्यबीज निर्मितीचे उद्दिष्ट आहे. यासोबतच ‘दख्खनी महासीर’ची दहा लाख पिले आणि रोहू, कटला, मृगल यांसारख्या भारतीय प्रमुख माशांचे मत्स्यबीजही जलाशयात सोडण्यात आले.
 
माशांच्या वाढीसाठी अधिवास निर्मितीवरही भर देण्यात आला आहे. उजनीतून सुमारे सहा हजार पाचशे टन आक्रमक वनस्पती काढण्यात आल्या. ‘जलपर्णी’, ‘बेशरम’ आणि ‘प्रोसोपिस’सारख्या वनस्पतींच्या जागी स्थानिक जलवनस्पतींची लागवड करण्यात येत आहे. कमळ, ‘हायड्रिला’ आणि ‘व्हॅलिसनेरिया’ यांसारख्या वनस्पती माशांना अंडी घालण्यासाठी, पिलांना आश्रयासाठी तसेच खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त ठरतात.
 
मच्छरदाणीच्या अतिशय बारीक जाळ्यांचा वापर करून केली जाणारी ‘वडाप’ मासेमारीदेखील जलजीवांसाठी गंभीर धोका आहे. या पद्धतीत माशांची पिले, अळ्या आणि इतर जलचर पकडले जातात. जाळ्या जलाशयाच्या तळाशी ओढल्याने वनस्पती आणि माशांचा अधिवासही नष्ट होतो. या प्रकारावर नियंत्रण आणण्यासाठी ‘बीएनएचएस’ पुणे आणि सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालये, तसेच मत्स्य विभागाच्या सहकार्याने नियम आणि अंमलबजावणीसाठी प्रयत्न करत आहे.
 
स्थानिक माशांचे प्रमाण वाढल्यास मच्छीमारांना आर्थिक लाभही होऊ शकतो. ‘तिलापिया’ला साधारण ६० ते १०० रुपये किलो भाव मिळत असताना, स्थानिक प्रजातींच्या माशांना २०० ते ५०० रुपये किलोपर्यंत भाव मिळू शकतो. प्रकल्पातून सोडलेल्या मत्स्यबीजांमुळे पुढील तीन वर्षांत मच्छीमारांना १७ ते १८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते, असा अंदाज आहे. जलाशयाचे पुनरुज्जीवन, जैवविविधतेचे संवर्धन आणि मच्छीमारांची आर्थिक सुरक्षितता यांचा एकत्रित विचार करणारा हा उपक्रम उजनीसह महाराष्ट्रातील अन्य जलाशयांसाठीही दिशादर्शक ठरू शकतो.
 
या कामात मत्स्य विभाग, सिंचन विभाग, स्थानिक मच्छीमार आणि संशोधन संस्थांचा सहभाग महत्त्वाचा आहे. केवळ मत्स्यबीज सोडून अपेक्षित परिणाम साधता येणार नाही; प्रदूषण रोखणे, अधिवास पुनर्स्थापित करणे आणि मासेमारीचे नियमनही आवश्यक आहे. उजनीत सुरू असलेल्या प्रयोगातून स्थानिक प्रजातींच्या संवर्धनासाठी वैज्ञानिक माहिती, सातत्य आणि विभागीय समन्वयाची गरज अधोरेखित होते.
 
डॉ. उन्मेश कटवटे
(लेखक ‘बीएनएचएस’मध्ये साहा. संचालक पदावर कार्यरत आहेत.)
९६१९५६३०४०




संबंधित मजकूर