प्रमोद महाजन : डिजी क्रांतीचा प्रणेता, एक द्रष्टा नेता

    21-Nov-2026

Pramod Mahajan
 
२२ नोव्हेंबर १९९९. हा दिवस भारतीय राजकारणात आणि तंत्रज्ञानाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात प्रमोद महाजन यांनी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. सोबत संसदीय कार्यमंत्री पदही त्यांच्याकडेच होते. जानेवारी २००३ पर्यंत ते या पदावर होते. तेव्हा अनेकांना वाटले, माहिती तंत्रज्ञान म्हणजे काय? संगणक म्हणजे श्रीमंतांची चैन. पण महाजन यांना मात्र त्यात जणू भविष्य दिसत होते.
 
महाराष्ट्राच्या मातीत अशी काही माणसे जन्माला येतात, जी केवळ राजकारण करत नाहीत, तर काळाच्या पुढे जाऊन विचार करतात. प्रमोद महाजन हे त्यातील एक नाव. त्यांचे नाव घेतले की आजही जुन्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक येते. कारण महाजन हे फक्त मंत्री नव्हते, ते भाजपचे वैचारिक ऊर्जास्रोत होते. पक्षाला दिशा देणारे, कार्यकर्त्याला घडवणारे आणि देशाला नव्या युगात नेणारे एक द्रष्टा नेता होते.
 
प्रमोद महाजन यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९४९ रोजी महबूबनगर येथे झाला. त्यांचे वडील व्यंकटेश महाजन हे एक साधे शिक्षक होते. घरात संस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे होते. लहानपणापासूनच शिस्त, देशभक्ती आणि संघटन कौशल्य हे त्यांच्या रक्तात भिनले होते. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना त्यांनी विद्यार्थी परिषदेच्या कामात पूर्णपणे झोकून दिले. तिथूनच त्यांच्या नेतृत्वाचा प्रवास सुरू झाला.
 
खरे सांगायचे तर प्रमोदजींचे मोठेपण हे फक्त त्यांच्या वक्तृत्वात नव्हते, तर त्यांच्याकडे गुण हेरेण्याचे कौशल्य होते. ते माणसे ओळखायचे. कोणता कार्यकर्ता कुठे काम करेल, कोणाला कोणती जबाबदारी दिली की पक्ष वाढेल, हे त्यांना अचूक कळायचे. १९८० च्या दशकात जेव्हा भाजप अगदी लहान पक्ष होता, तेव्हा अटलजी आणि अडवाणीजी यांच्या सोबत पक्षाला उभे करण्याचे काम महाजन यांनी केले. लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा असो, किंवा १९९५ साली महाराष्ट्रात युतीचे सरकार आणणे असो, प्रत्येक मोठ्या निर्णयामागे महाजन यांची रणनीती असायची.
 
त्यांना उगाचच राजकारणातील चाणक्य म्हटले जात नाही. ते विरोधकांशीही मैत्री ठेवायचे. संसदेत सर्व पक्षांचे नेते त्यांचा आदर करायचे. कारण महाजन कधीच वैयक्तिक टीका करायचे नाहीत. ते मुद्द्यावर बोलायचे, पण माणूस जपायचे. हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य होते. ते म्हणायचे, राजकारणात शत्रू नसतात, फक्त मतभेद असतात. आणि हा विचार आजच्या राजकारणात हरवत चालला आहे, हेच खरे दु:ख आहे.
 
त्यांनी सगळ्यात आधी भारताला मोबाईल क्रांतीकडे नेले. तेव्हा मोबाईलवर येणारा कॉल महाग होता, जाणारा कॉल महाग होता. सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर होते ते सगळे. महाजन यांनी दूरसंचार धोरण बदलले. परवाना शुल्काची पद्धत बदलून महसूल वाटपाची पद्धत आणली. त्याचा परिणाम असा झाला की कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढली आणि कॉलचे दर धाडकन खाली आले. आज आपल्या हातात जो मोबाईल आहे, आज आपण व्हॉट्सअॅपवर बोलतोय, तो पाया महाजन यांनीच घातला,असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
 
त्याच काळात त्यांनी आयटी अॅक्ट २००० आणला. डिजिटल सहीला कायदेशीर मान्यता दिली. ई-गव्हर्नन्सची संकल्पना मांडली. त्यांना माहिती होते की येणारा काळ हा इंटरनेटचा आहे. भारताचा तरुण जर तंत्रज्ञानात पुढे गेला, तर भारत जगावर राज्य करेल. म्हणून त्यांनी बंगळुरू, हैदराबाद, पुणे या शहरांना आयटी हब बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले. आज भारत जगाला सॉफ्टवेअर पुरवतोय, याची बीजे महाजन यांच्या काळातच रोवली गेली.
 
त्यांच्या कामाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ते फाईलवर सही करणारे मंत्री नव्हते, ते जमिनीवर उतरून काम करणारे नेते होते. अधिकाऱ्यांना ते म्हणायचे, मला अडचण नको, मला उपाय सांगा. त्यांच्या मंत्रालयात निर्णय वेगाने व्हायचे. कारण त्यांना माहिती होते की तंत्रज्ञानात एक दिवसाचा विलंब म्हणजे एक वर्ष मागे जाणे.
 
प्रमोदजी फक्त तंत्रज्ञानापुरते मर्यादित नव्हते. ते एक उत्तम संघटक होते. महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेची युती टिकवणे, दिल्लीत एनडीएचे मित्रपक्ष सांभाळणे, हे काम त्यांनी लीलया केले. ते प्रत्येकाला आपलेसे करायचे. कार्यकर्त्याच्या घरी जाऊन जेवायचे, त्याच्या सुखदु:खात सहभागी व्हायचे. त्यामुळे कार्यकर्ता त्यांच्यासाठी जीव द्यायला तयार असायचा. नेता तेव्हाच मोठा होतो, जेव्हा कार्यकर्ता त्याला आपला मानतो. महाजनांची लोकप्रियता सर्वश्रुत आहे.
 
त्यांचा स्मृतीगंध आजही रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये जाणवतो. जेव्हा जेव्हा मी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये जाते, तेव्हा त्यांच्या प्रतिमेपुढे नतमस्तक होऊन मी प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करते. प्रबोधिनी एक तपोभूमी आहे. तिथल्या प्रत्येक भिंतीत प्रमोदजींसारख्या नेत्यांचे विचार, त्यांची दूरदृष्टी आणि कार्यकर्ता घडवण्याची तळमळ अजूनही जाणवते. तिथे गेल्यावर माणूस आपोआपच नम्र होतो, आणि राष्ट्र हितासाठी काम करण्याची नवी ऊर्जा घेऊनच बाहेर पडतो. बरेचदा फिनिक्स पक्ष्याप्रमाणे समर्पणाच्या आहुतीतून अजून प्रखर आणि ज्वलंत ध्येय घेऊन येतो.
 
३ मे २००६ रोजी त्यांचे अकाली निधन झाले. अवघा देश हळहळला. अटलजींनी तर त्यांना आपला मुलगाच मानले होते. त्यांच्या जाण्याने भाजपने एक पिढी घडवणारा नेता गमावला. आजही जेव्हा आपण मोबाईलवर बोलतो, जेव्हा आपण ऑनलाइन फॉर्म भरतो, जेव्हा आपण डिजिटल इंडियाचे स्वप्न बघतो, तेव्हा त्या स्वप्नाचे खरे जनक प्रमोद महाजनच होते, हे विसरता येणार नाही.
प्रमोद महाजन यांनी आपल्याला एकच शिकवण दिली, स्वप्न मोठे बघा, पण पाय जमिनीवर ठेवा. राजकारण हे सत्तेसाठी नाही, तर देश घडवण्यासाठी आहे.
 
"मी राजकारणात सत्तेसाठी आलो नाही, मी व्यवस्था बदलण्यासाठी आलो आहे."
 
प्रमोदजी आज आपल्यात नाहीत, पण त्यांची स्वप्नं आज प्रत्येक हातातल्या मोबाईलमध्ये जिवंत आहेत.
जोपर्यंत भारताचा तरुण तंत्रज्ञानाने पुढे जात राहील, तोपर्यंत प्रमोद महाजन अमर राहतील.
आधुनिक तंत्रप्रगत भारत हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
 
लेखिका- प्रिया सावंत, नेतृत्व विकास तज्ञ आणि उपाध्यक्ष, विश्व हिंदू परिषद 9004060353
 




संबंधित मजकूर