मुंबई, (Powai Lake Musical Fountain Show) :मुंबईच्या पर्यटन वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार असून, पवई तलावाच्या सौंदर्यात भर घालणारा अत्याधुनिक म्युझिकल फाउंटन आणि लाईट अँड साउंड शो लवकरच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. सुमारे ३० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेला हा १८० मीटर लांबीचा म्युझिकल फाउंटन देशातील सर्वात मोठ्या फाउंटन्सपैकी एक ठरणार आहे. विशेष म्हणजे, या शोच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या पराक्रमाची गौरवगाथा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक भव्य स्वरूपात सादर केली जाणार आहे.
कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते पवई तलाव येथील गणेश घाट येथे 'लाईट, साउंड आणि संगीतमय कारंजे शो' चे उद्धाटन होणार आहे. रविवारी, सायंकाळी ७ वाजता या म्युझिकल फाउंटनचे उद्घाटन होईल. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांमुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मुंबई उपनगर जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला. तर, म्हाडाच्या माध्यमातून या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली असून, मुंबईच्या पर्यटन विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे.(Powai Lake Musical Fountain Show)
म्युझिकल फाऊंटनचे वैशिष्ट्य काय?
या प्रकल्पांतर्गत जागतिक दर्जाचा मल्टिमीडिया लाईट अँड साउंड शो साकारण्यात येत आहे. यामध्ये म्युझिकल फाउंटन, वॉटर स्क्रीन आणि फायर जेट्स यांचा समावेश आहे. विशेष दृश्य परिणामांच्या (स्पेशल इफेक्ट्स) माध्यमातून तीन वेगवेगळे चित्रपट सादर केले जाणार असून, त्यामध्ये मराठ्यांचा देदीप्यमान इतिहास व पराक्रम, महाराष्ट्राची संस्कृती आणि वैभव तसेच मुंबईची गौरवशाली कहानी उलगडणार आहे. या म्युझिकल फाउंटनमुळे तलावातील पाण्याचे एरेशन होण्यास मदत होणार असून, दररोज सुमारे ३० लाख लिटर पाण्यात हवा मिसळण्याची प्रक्रिया होईल. त्यामुळे पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास मदत होऊ शकते. तसेच परिसरातील तापमान कमी होणे, बाष्पीभवनामुळे थंडावा निर्माण होणे आणि हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होणे असे संभाव्य पर्यावरणीय फायदे अपेक्षित आहेत. तब्बल ४० मीटर उंचीपर्यंत झेपावणारे वॉटर जेट्स आणि २७ फायर जेट्स हे या शोचे प्रमुख आकर्षण असणार आहेत. याशिवाय रनिंग फाउंटन चेसर्स, थ्रीडी स्विंग नॉझल्स आणि फॅन जेट्स यांमुळे पाण्याच्या विविध आकर्षक रचना साकारल्या जाणार आहेत. संगीताच्या तालावर नृत्य करणारे पाण्याचे कारंजे, आगीच्या ज्वाळा आणि वॉटर स्क्रीनवरील प्रोजेक्शन व लेझर प्रतिमा यांचा सुरेख संगम प्रेक्षकांना एक अविस्मरणीय दृक्-श्राव्य अनुभव देणार आहे.(Powai Lake Musical Fountain Show)
पर्यटकांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा
या प्रकल्पाच्या संचालनासाठी आवश्यक प्रशिक्षित कर्मचारी, स्वतंत्र कंट्रोल रूम, सीसीटीव्ही यंत्रणा, अग्निशमन उपकरणे, अखंड वीजपुरवठ्यासाठी डीजी सेट, सुरक्षा रक्षक, प्राथमिक उपचार सुविधा, प्लास्टिक खुर्च्या आणि व्हीलचेअर यांसारख्या सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. दररोज सुमारे तीन तासांच्या कालावधीत तीन शो आयोजित करण्याचे नियोजन आहे. प्रकल्पाच्या निविदेत तीन वर्षांच्या सर्वसमावेशक देखभाल व दुरुस्तीची तरतूद असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षांच्या संचालनाची तरतूद करण्यात आली आहे.(Powai Lake Musical Fountain Show)
जलचरांच्या सुरक्षेची काळजी
फाउंटनमध्ये केवळ एलईडी दिव्यांचा वापर करण्यात येणार असून, प्रकाश पाण्याच्या पृष्ठभागावरून वरच्या दिशेने दिला जाणार आहे. जलचरांना हानी पोहोचू नये, याची काळजी घेण्यात येणार आहे. तसेच ध्वनीची तीव्रता निर्धारित डेसिबल मर्यादेत ठेवण्यात येणार असल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली. पर्यावरणीय नियमांचे पालन करून हा प्रकल्प पर्यावरणपूरक पद्धतीने विकसित करण्यात आला आहे.(Powai Lake Musical Fountain Show)
"छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास आणि मराठ्यांचा पराक्रम आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. पवई तलावाच्या सौंदर्यात भर घालतानाच मुंबईच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे मुंबईच्या पर्यटनाला चालना मिळून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. मुंबईला जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळक स्थान मिळवून देण्यासाठी असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत."
- कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा